Join us  

दिवससभर स्क्रीनसमोर बसून पाठ आणि खांदे आखडलेत? दुखणं कमी करायचे तर करा सोपे 3 स्ट्रेचेस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 12:00 PM

आहार आणि व्यायाम यांच्या उपयुक्त टिप्स देणाऱ्या आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर सांगताहेत अगदी सोपे व्यायामप्रकार, नक्की करुन बघा आणि पाठीवरचा ताण घालवा...

ठळक मुद्देसतत बसून पाठ, मान अवघडून गेल्यावर हे व्यायाम नक्की करापाच मिनिटात होणारे हे व्यायाम तुम्हाला पाठ आणि खांदेदुखीपासून नक्की आराम देतीललठ्ठपणा आणि इतरही अनेक समस्यांसाठी उपयुक्त स्ट्रेचेस

दिवसभर ऑफीसचे काम, त्यामुळे एकाच जागी, एका पोझिशनमध्ये बसल्यामुळे मान, खांदे आणि पाठदुखीचा त्रास उद्भवतो. सतत लॅपटॉप, किंवा कॉम्प्युटर आणि मोबाईल यांच्या वापरामुळे खांदा आणि मानेचा भाग तर कधी कधी अक्षरश: बधिर होतो. यासाठी कामाच्या मधे उठून काही सोपे व्यायाम करणे गरजेचे आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी खांदे, पाठ आणि मान यांच्यासाठी काही सोपे व्यायामप्रकार नुकतेच एका व्हिडियोच्या माध्यमातून सांगितले आहेत. हा व्हिडियो त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तुम्ही घरच्या घरी अगदी सहज करु शकता असे व्यायामप्रकार त्यांनी सांगितले आहेत. स्ट्रेचिंग प्रकारातील हे व्यायाम करण्याची नेमकी पोझिशनही त्यांनी करुन दाखवली आहे. 

ऋजूता दिवेकर नेहमी वेगवेगळ्या व्हिडियोच्या माध्यमातून नेटीझन्सचे प्रबोधन करताना दिसते. यामध्ये ती आहाराबरोबरच व्यायााबाबतही महत्त्वाच्या टिप्स देत असते. सोशल मीडियावर तिला हजारोंनी फॉलोअर्स असून ते तिच्या या टिप्स नियमित पाहतात आणि वेगवेगळे प्रश्नही विचारतात. इतकेच नाही तर तिने आणखी काय सांगावे याबाबतही सूचना करतात. आताच्या व्हिडियोबाबत त्या म्हणतात, चुकीच्या पद्धतीने खूप वेळ बसल्याने खांदे आणि पाठीचे दुखणे सुरु होते. हे दुखणे कमी करायचे असल्यास बसून बसून कंटाळा आल्यावर सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा काही सोपे व्यायाम करा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल असेही त्या सांगतात. पाहूयात या स्ट्रेचिंगच्या व्यायामप्रकारांविषयी...

१. खांद्याचा व्यायाम - यामध्ये दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ पुढे करुन खांदे मागच्या बाजूला ओढा. यावेळी खांदे कानाकडे वर घेऊ नका. नुसते हात वर न घेता कोपर खांद्याच्या रेषेत सरळ राहील याची काळजी घ्या. असेच हात वरच्या दिशेला घेऊनही करा. हे व्यायाम तुम्ही खुर्चीवर बसल्या बसल्या करु शकता. तसेच तुम्हाला भिंतीचा आधार हवा असेल तर भिंतीला टेकूनही तुम्ही हे व्यायाम करु शकता. हे साधारण ५ ते १० आकडे होईपर्यंत करा. 

२. पाठीसाठी स्ट्रेचिंग - आपण काम करताना खुर्चीत बसून कंटाळलो तर पुढे वाकतो. त्यामुळे पाठीच्या मणक्याला आणखी ताण येतो. अशावेळी खुर्चीतच ताठ बसून कंबरेतून एका बाजूला वळावे. पाच मिनीटे होल्ड करुन ठेवावे. यावेळी गुडघ्यातून न हलता कंबर आणि पोटाच्या भागातून हलावे. त्यामुळे सतत एकाच पोझिशनमध्ये असणाऱ्या पाठीला थोडी हालचाल होते. असे दोन्ही बाजूला ५ आकडे होईपर्यंत करावे. हे करताना मान, पाठ ताठ ठेवावी. 

( Image : Google)

३. पायाचा व्यायाम - अनेकदा आपल्याला असे वाटते की खांदे, मान आणि पाठ दुखते म्हणजे हे त्याच अवयवांचे दुखणे आहे. पण अनेकदा एका अवयवाचा ताण दुसऱ्या अवयवावर येऊ शकतो. या सगळ्यामध्ये आपल्या पायांचीही महत्त्वाची भूमिका असते. सतत बसून शरीराचा खालचा भाग म्हणजेच पाय आखडल्यासरखे होतात. यासाठी दोन्ही पायांवर एकसारखे वजन देऊन उभे राहावे. एक पाय गुडघ्यातून वर उचलून काटकोनात ठेवावा. पाच आकडे होईपर्यंत आपले पूर्ण वजन खालच्या एका पायावर घेण्याचा प्रयत्न करावा. तसेच दुसऱ्या पायाचेही करावे. हे करताना पाठ मान सरळ ठेवावी. तुमचे वजन एकेका पायावर घेण्यामुळे तुमच्या शरीराच्या खालच्या भागाची ताकद वाढण्यास मदत होते. असे पूर्णपणे पाय हवेत ठेवणे जमत नसेल तर पाय एखाद्या कठड्यावर, खुर्चीवर ठेवा. 

तुम्हाला लठ्ठपणाशी निगडित कोणतेही आजार असतील आणि तुम्ही सतत बसून काम करत असाल तर हे साधे सोपे व्यायाम तुम्ही करायलाच हवेत. यामुळे तुम्ही मधुमेह, हृदयाशी निगडित समस्या आणि वेगवेगळे कर्करोग यांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स