Join us  

व्यायामाला वेळ नाही म्हणता? पाहा फक्त १५ मिनीटांत करता येणारे ५ झटपट व्यायाम ; सोपे आणि इफेक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2022 5:54 PM

१५ मिनीटांत झटपट होतील असे काही व्यायमप्रकार आपण आज पाहणार आहोत. ज्यामुळे आपल्याला फिट राहायला तर मदत होईलच पण आपण दिवसभर मनाने आणि शरीरानेही नक्कीच फ्रेश राहू.

ठळक मुद्देआपल्या रोजच्या रुटीनमध्ये झटपट करता येतील असे व्यायामप्रकार आपणच शोधून काढायला हवेतपाहूयात कमीत कमी वेळात होणारे पण तरीही भरपूर उपयुक्त व्यायामप्रकार कोणते...

आपण दिवसभर भूक लागली की खातो, ऑफीसचे घरातले काम करतो, घराची आणि स्वत:ची स्वच्छता अशा असंख्य गोष्टी करत असतो. पण व्यायाम करण्याची वेळ आली की मात्र आपण वेळ नाही अशी सबब सांगून मोकळे होतो. असे करणे सोपे वाटत असले तरी ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. जीमला किंवा इतर कोणत्याही व्यायामाला घराबाहेर पडायचे म्हणजे दिड तास नक्की जातो. ऑफीस, घरातली आणि बाहेरची कामे सांभाळून दिवसातला इतका वेळ आपण देऊ शकत नाही हे मान्य आहे. मग घरच्या घरी एकट्याने व्यायाम करायचा आपण कंटाळा करतो. पण आपण दिवसभरातील १५ मिनीटे तर व्यायामासाठी नक्कीच काढू शकतो. १५ मिनीटांत झटपट होतील असे काही व्यायमप्रकार आपण आज पाहणार आहोत. ज्यामुळे आपल्याला फिट राहायला तर मदत होईलच पण आपण दिवसभर मनाने आणि शरीरानेही नक्कीच फ्रेश राहू. पाहूयात असे व्यायामप्रकार कोणते...

(Image : Google)

१. सूर्यनमस्कार 

पारंपरिक व्यायामप्रकार म्हणून ओळखले जाणारे सूर्यनमस्कार हे सर्वांगाचा व्यायाम होण्याचा एक महत्त्वाचा व्यायामप्रकार आहे. शरीराच्या सर्व स्नायूंना यामध्ये ताण पडत असल्याने हा व्यायाम अतिशय उत्तम आहे. सुरुवातीला थोडे स्ट्रेचिंग करुन मग १२ किंवा आपल्याला जितके जास्त शक्य होतील तितके सूर्यनमस्कार घातले तर शरीर फिट राहायला मदत होते. यासाठी फारसा वेळ लागत नसल्याने हा सर्वोत्तम व्यायामप्रकार आहे.

२. जिने चढउतार 

आपण राहतो त्या इमारतीला किंवा आपल्या ऑफीसच्या इमारतीला जीने असतातच. मात्र आपण सोप्या पर्यायांचा स्वीकार करतो आणि लिफ्ट वापरतो. पण न चुकता आपण सगळ्या ठिकाणी जीन्याचा वापर केला तर नकळत आपला व्यायाम होतो. यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता नसते. फक्त आपण जीथे कुठे जाऊ तिथे लिफ्टने न जाता जिन्याने जायचे. यामुळे आपल्याला साहजिकच दम लागतो, पण आपले स्नायू या प्रक्रियेत तुटतात आणि शरीराला ताण पडतो. 

३. दोरीच्या उड्या 

दोरीच्या उड्या आपण सगळ्यांनीच लहानपणी मारलेल्या असतात. पण जसे मोठे होतो तशा य गोष्टी मागे पडतात. पण दोरीच्या उड्या हा अतिशय सोपा आणि कुठेही करता येणारा व्यायामप्रकार आहे. यामध्येही सरळ उड्या, उलट्या उड्या, एका पायाने उड्या असे बरेच प्रकार करता येतात. दोरीच्या उड्यांमध्ये केवळ हात आणि पायालाच व्यायाम होतो असे नाही तर संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. त्यामुळे दिवसातल्या कोणत्याही वेळी १५ ते २० मिनीटे दोरीच्या उड्या मारल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते.

४. चालणे

दिवसातील किमान अर्धा तास चालायला हवे असे आपण नियमीत वाचतो किंवा ऐकतो. पण अर्धा तास शक्य नसेल तर किमान १५ मिनीटे तरी चालायला हवे. मात्र आपण कमी चालत असू तर आपला चालण्याचा वेग निश्चितच जास्त असायला हवा. त्यामुळे कमी वेळात आपल्या जास्त कॅलरीज जळतील आणि व्यायाम झाल्यासारखेही वाटेल. वेगाने चालण्यामुळे सगळ्या स्नायूंना चांगला ताण पडेल आणि आपली तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.

(Image : Google)

५. सायकलिंग

पेट्रोलच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना सायकल वापरणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. सकाळी १५ मिनीटांत सायकलवर एखादी राऊंड मारुन आल्यास आपल्याला फ्रेश वाटू शकते. ऑफीस जवळ असेल तर ऑफीसला किंवा लहानमोठी कामे करण्यासाठी घराच्या आजुबाजूच्या भागात आपण सायकलने नक्कीच फइरु शकतो. यामुळे व्यायाम होईल आणि ट्रॅफीकमध्ये थांबावे न लागल्याने वेळही बराच वाचेल. सायकल हा अतिशय उत्तम व्यायाम असून यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सलाइफस्टाइलआरोग्यहेल्थ टिप्स