Join us

दिसायला स्लिम, पण चाललं की दम लागतो, दोन किलो वजन उचलवत नाही! मग उपयोग काय बारीक असण्याचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:23 IST

व्यायाम करायचा तो बारीक असण्यासाठी, मी तर बारीक आहे मी कशाला व्यायाम करू, असं म्हणणं म्हणजे स्वत:ला फसवणं.

ठळक मुद्देव्यायाम हा गप्पा मारत, टंगळमंगळ करत करायचा नसतो.

गौरी पटवर्धन

व्यायाम का करायचा?- तर उत्तर हेच की मला बारीक व्हायचं आहे. पोट किती सुटलं ते कमी करायचं आहे. मुळात व्यायामाचा फक्त बारीक होण्याशी संबंध नसतो. आणि बारीक व्हायचं, वजन उतरणं यासाठी मुख्यतः आहार सांभाळायला लागतो. आपण आपल्या आजूबाजूला हेही बघत असतो की नुसता व्यायाम करून कोणी फारसं बारीक झालेलं दिसत नाही. मग आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो, की आपण बारीक होण्यासाठी व्यायाम करायचाच कशाला? कशाला? एवढा घाम गाळायचा? एवढे कष्ट घ्यायचे? खाणंच कमी करु ना. नो कार्ब डाएट करु, कशालाा उगीच शरीराला व्यायाम करण्याचा त्रास द्या.तर त्याचं कारण असं, की व्यायाम केल्याने मेटॅबॉलिझम किंवा चयापचय क्रिया सुधारते. म्हणजे काय?

तर थोडक्यात सांगायचं म्हणजे डाएट करून जे वजन कमी होणार असतं, त्याचा वेग वाढतो. अन्नाचं पचन अधिक चांगल्या पद्धतीने होतं. व्यायाम केल्याने होणारी दुसरी गोष्ट म्हणजे मसल टोन सुधारतो. स्नायूंमध्ये ताकद येते. स्नायूंमध्ये ताकद येणं हे एरवीही महत्वाचं असतं, पण डाएट करणाऱ्यांसाठी तर ते विशेष महत्वाचं असतं. कारण डाएट केल्याने शरीरातील फक्त चरबी जळत नाही, तर त्यात स्नायूसुद्धा वापरले जातात. त्यामुळे डाएटच्या जोडीने जर व्यायाम केला नाही, तर वजन उतरतं, पण त्याबरोबर अंगातली ताकदही कमी होते. आणि आपण सुरुवातीला बघितलं, तसं वजन कमी, बांधा शिडशिडीत पण चार किलो भाजीसुद्धा उचलता येत नाही या अवस्थेला काही आपण फिटनेस म्हणू शकत नाही. आणि आपलं ध्येय आहे ते फिटनेस कमावणं. म्हणून व्यायाम करायचा. फिटनेस साधता साधता वजन आपोआप कमी होतंच.पण मग स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम करायचा तरी कुठला? वजनं उचलायची का? का चालायचं? त्यामुळे सुटलेलं पोट कमी होतं का? का पोट कमी करण्यासाठी पोटाचे व्यायाम करायचे? का बेंडिंग आणि स्ट्रेचिंग करायचं? तर फिटनेस साठी हे सगळं करायचं.आणि मग आपल्याला जो रिझल्ट हवा असेल त्यानुसार यातला कुठला व्यायाम किती करायचा ते ठरवायचं. वजन कमी करण्यासाठी मुख्यतः एरोबिक व्यायाम करायचा. म्हणजे जो व्यायाम बराच वेळ सलग करता येतो आणि ज्यातून हृदयाची गती वाढते असा व्यायाम. असे अनेक व्यायाम असतात. चालण्यापासून ते हिमालय चढून जाण्यापर्यंत. पण नवीन व्यायाम सुरु करणाऱ्या कुणालाच काही डायरेक्ट मॅरॅथॉन पळता येत नाही, किंवा पाचशे सिटअप्स मारता येत नाहीत.नवीन व्यायाम सुरु करणाऱ्या कुणाहीसाठी सगळ्यात सोयीचा व्यायाम म्हणजे चालणं. हा व्यायाम करण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी लागत नाही, नवीन कपडे विकत घ्यायला लागत नाहीत, हा व्यायाम कुठेही करता येतो, कधीही करता येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्यायाम करतांना दुखापत होण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. आणि खरं सांगायचं तर वर्षाचे झाल्यापासून आपण सगळे कायम चालतच असतो.पण तरीही व्यायाम म्हणून चालतांना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम हा गप्पा मारत, टंगळमंगळ करत करायचा नसतो. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करतो त्या वेगाने चालून व्यायाम होत नाही. व्यायाम होण्यासाठी किमान तरातरा चालणं आवश्यक असतं.मग काय जास्त विचार न करता, चालायला लागा..

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्य