Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेड मिलवर धावणं फायद्याचं की खुल्या हवेत? तुम्ही कसे धावता, त्याचे फायदे- तोटे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 13:37 IST

धावणं हा एक उत्तम व्यायाम आहे. पण धावायचं कसं आणि कुठे हा प्रश्न असतोच की. खुल्या मैदानात धावणं चांगलं की ट्रेडमिलवर धावणं चांगलं?

ठळक मुद्देधावणे आरोग्यासाठी चांगलेच आहे. प्रत्येकाचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. त्यामुळे आपल्यासाठी नेमके काय चांगले आहे, आपल्याला कशाची गरज आहे, हे ओळखावे आणि धावावे.

कोरोनामुळे घराबाहेर पडून व्यायाम करणं, योगा, जीमला जाणं असं सगळंच मधल्या काळात बंद झालं होतं. मग व्यायाम कसा करावा, म्हणून अनेक जणांनी मग घरी ट्रेडमिल आणून त्यावर धावायला सुरुवात केली. कोरोनाच्या भीतीमुळे मधले एक- दिड वर्ष तर जणू असे होते की घरच्याघरी तुम्हाला जो व्यायाम करता येईल, ताे सर्वोत्तम मानला जायचा. पण आता कोरोनाची धास्ती कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा जुनीच चर्चा नव्याने रंगू लागली आहे. ती म्हणजे धावण्याचा व्यायाम नेमका कुठे करणे अधिक चांगले, ट्रेडमिलवर धावावे की खुल्या मैदानात जाऊन पळावे, कुठे धावल्याने काय फायदे होतात आणि काय तोटे ?

 

काही तज्ज्ञांच्या मते ट्रेडमिलवर धावण्यापेक्षा खुल्या हवेत धावणे अधिक चांगले. कारण बाहेरची फ्रेश हवा जेव्हा तुम्हाला मिळते, तेव्हा तुम्ही अधिक उत्साही आणि तजेलदार होता. पण बऱ्याचदा बाहेर धावायला जाणे, हेच अनेकांसाठी कंटाळवाणे असते. कारण बाहेर जायचे म्हणजे चांगली ड्रेसिंग हवी, धावण्याचा मार्ग कमीतकमी प्रदुषण असणारा हवा, बाहेर धावायला जायचे म्हणजे ज्या वेळी वाहने जास्त नसतील, अशा वेळा निवडाव्या लागतात. अशा वेळा मिळणं आणि शहरात असे रस्ते मिळणं, एकंदरीतच आता अवघड झालं आहे. त्यामुळे अशी सगळी कारणं जर तुम्हाला खुल्या हवेत धावण्यापासून रोखत असतील, तर सरळ मनातले सगळे विचार थांबवा आणि अगदी बिनधास्तपणे ट्रेडमिलवर धावणे सुरू करा. 

 

काही धावपटूंचे असे म्हणणे आहे, की ट्रेडमिल आणि खुले मैदान असे कुठेही तुम्ही धावलात, तरी तुम्ही तुम्हाला हवे ते ध्येय गाठू शकता. खुल्या मैदानात धावणे हे तुम्हाला किती थकवणारे आहे, हे बाहेरच्या वातावरणावर अवलंबून असते. जर उन्हाळ्याचे दिवस असतील, तर कमी अंतर गाठूनही तुम्हाला थकवा येतो, जो पावसाळी हवेत जाणवत नाही. असा प्रश्न ट्रेडमिलच्या बाबतीत जाणवत नाही. ही ट्रेडमिलची एक सकारात्मक बाजू असली तरी त्याची दुसरी बाजू म्हणजे मग बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेत धावण्याचा सराव तुमच्या शरीराला राहत नाही.

 

जेव्हा तुम्ही खुल्या हवेत धावायला जाता, तेव्हा तुम्हाला अनेक नवनवीन गोष्टी, माणसं दिसतात. निसर्गाची वेगवेगळी रूपे पाहायला, अनुभवायला मिळतात. वेगवेगळे रस्ते निवडून तुम्ही त्यावर धावू शकता. अशी परिस्थिती जर तुम्ही एन्जॉय करत असाल, तर मात्र तुमच्यासाठी ट्रेडमिलवर धावणे कंटाळवाणे होऊ शकते. 

खुल्या मैदानात धावताना समाेरचा रस्ता प्रत्येकवेळी सारखा नसतो. त्यामुळे तोल सांभाळत धावणे हे खुल्या मैदानात धावूनच आपण शिकत जातो. पण याची दुसरी बाजू अशीही आहे की खुल्या मैदानात धावताना कधी खड्डे, कधी चांगला रस्ता तर कधी आणखी काही, यामुळे तोल जाऊन काही दुखापत होण्याचीही शक्यता असते. ट्रेडमिलचे शॉकअप्स खूप चांगले असतात, त्यामुळे ट्रेडमिलवर धावल्याने गुडघेदुखी, घोटेदुखीचे प्रमाण कमी असते. हा त्रास खुल्या हवेत धावणाऱ्यांना जाणवू शकतो. 

 

दोन्हीही प्रकारचे धावणे आरोग्यासाठी चांगलेच आहे. प्रत्येकाचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. त्यामुळे आपल्यासाठी नेमके काय चांगले आहे, आपल्याला कशाची गरज आहे, हे ओळखावे आणि धावावे, असे फिटनेसतज्ज्ञ सांगतात. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स