Lokmat Sakhi >Fitness > International Yoga Day: प्रत्येक महिलेनं करायला हवी ६ आसनं, रोजची तब्येतीची कुरकूर होईल कायमची बंद!

International Yoga Day: प्रत्येक महिलेनं करायला हवी ६ आसनं, रोजची तब्येतीची कुरकूर होईल कायमची बंद!

International Yoga Day: Must yoga for women : महिलांसाठी योगाभ्यास जास्त आवश्यक असतो, तब्येतीच्या अनेक समस्या त्यामुळे राहतात दूर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 14:04 IST2025-06-20T14:01:55+5:302025-06-20T14:04:08+5:30

International Yoga Day: Must yoga for women : महिलांसाठी योगाभ्यास जास्त आवश्यक असतो, तब्येतीच्या अनेक समस्या त्यामुळे राहतात दूर.

international yoga day 2025: Best yoga for women, yoga for mental health and physical health, flexibility and fitness | International Yoga Day: प्रत्येक महिलेनं करायला हवी ६ आसनं, रोजची तब्येतीची कुरकूर होईल कायमची बंद!

International Yoga Day: प्रत्येक महिलेनं करायला हवी ६ आसनं, रोजची तब्येतीची कुरकूर होईल कायमची बंद!

Highlightsपाठदुखी, डोकेदुखी, गर्भाशयाचे विकार, सतत आजारी पडणे, टेंशन अश्या अनेक आजारांवर फायदेशीर असणारे काही आसनं आपण बघणार आहोत. 

वृषाली जोशी-ढोके (योगशिक्षक-वेलनेस ट्रेनर)

एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री खंबीर पणे उभी असते असं म्हणतात पण त्याहूनही अधिक सत्य म्हणजे एका खंबीर महिलेच्या पाठीशी कायम योगाभ्यास असू शकतो. घरातली महिला आजारी पडली की तर तिचं सारं घरच आजारी पडते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला फिट रहायचे असेल आणि चिरतरुण दिसायचे असेल तर रोजचा योगाभ्यास गरजेचा आहे. एक स्त्री अनेक भूमिका बजावत असते तिच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे टप्पे तिला पार करायचे असतात. मातृत्व ही सगळ्यात मोठी निसर्गाची देण. त्यासाठी अगदी वयात आल्यापासून मासिक पाळी आणि अनेक शारीरिक बदलांना सामोरे जावे लागते. प्रसूती पूर्व आणि नंतर अनेक बदलांना तोंड द्यावे लागते. या सगळ्या प्रवासात फक्त शारिरीकच नाही तर मानसिक चढ उतार देखील होत असतात. म्हणजेच फक्त शरीर कणखर असून चालणार नाही तर मनही तेवढेच खंबीर असणे गरजेचे आहे. योग ही एक जीवनशैली आहे. ज्यामध्ये शरीराबरोबरच मनाचाही विचार केला गेला आहे.  म्हणूनच प्रत्येकीनं योग शिकून घेणं गरजेचं आहे.


आसन, प्राणायाम यांच्या रोजच्या अभ्यासामुळे शरीर अतिशय लवचिक बनते. हाडांना स्नायूंना बळकटी मिळते. घरच्याघरी किमान एक तास तरी स्वतः चा योगाभ्यास केला तरी अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात. या एक तासात 45 मिनिट आसनांचा अभ्यास आणि १५ मिनिटं प्राणायाम असे विभाजन करू शकतो. आसनांचा अभ्यास करण्यापूर्वी काही पूरक हालचाली आणि सूर्यनमस्कार करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्याने ताठर झालेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. त्यातही काही दुखणी महिलांना कायमच छळतात. पाठदुखी, डोकेदुखी, गर्भाशयाचे विकार, सतत आजारी पडणे, टेंशन अश्या अनेक आजारांवर फायदेशीर असणारे काही आसनं आपण आज बघणार आहोत. 

६ आसनं कायम ठेवतील ठणठणीत

 

१. पवनमुक्तासन - अतिशय सोपे परंतु तितकेच अधिक फायदे असणारे हे आसन. आपण रोज केल्यास गॅसेस, अपचन, करपट ढेकर, पचनाच्या अनेक तक्रारी दूर होण्यासाठी करू शकतो.


२. सर्वांगासन - या आसानमध्ये पाय जमीनीपासून वर उचलेले असतात म्हणजेच खाली डोकं वर पाय. या अवस्थेमुळे अशुद्ध रक्त पायाकडून हृदयाकडे वाहते, शरीरात रक्त संचार चांगला सुधारतो आणि ऑक्सिजन पातळीत वाढ होण्यास मदत होते.


३. भुजंगासन - पोटावर झोपून मान मागे टाकण्याच्या या आसानामध्ये पाठीच्या शेवटच्या मणक्यावर दाब निर्माण होतो. त्यामुळे मणक्याचे विकार, पाठ दुखी, ताठरलेले पाठीचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते.


४. धनुरासन - महिलांना हे आसन केल्याने मासिक पाळीचे विकार दूर होण्यास मदत होते. मल, अपचन आणि पचनाशी संबंधित विकार दूर होतात. पाय आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात. पचनसंस्था मजबूत होते.


५. शशांकासन - हे आसन नियमित केल्याने शरीर मजबूत आणि लवचीक बनते. पचनसंस्था सक्रिय होऊन बद्धकोष्ठता दूर होते.काम विकार दूर करते.राग, भीती, दु:ख इत्यादी, उत्कटता आणि भावनिक असंतुलन कमी करते. हृदयविकार, दमा, मधुमेह अशा अनेक आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तीसाठी योगासने उपयुक्त आहेत.


६. वृक्षासन - शरीरातील आळस, तणाव दूर करण्यासाठी तसेच लहान वयात या आसनाचा अभ्यास केल्यास उंची वाढण्यास चांगली मदत होते. संपूर्ण शरीर ताणले गेल्यामुळे हाता पायांच्या नाड्या शिरा मोकळ्या होण्यास मदत होते.

श्वसनाचाही अभ्यास
योगाभ्यासात श्वसनाचा अभ्यासही आवश्यक असतो.

 

1. जलद श्वसन - नासिका मार्गाची शुद्धी आणि स्वच्छता करण्यासाठी तसेच फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.


2. नाडी शुद्धी प्राणायाम - नावाप्रमाणेच शरीरातील असंख्य नाड्या शुद्ध करण्यासाठी, तणाव मुक्तीसाठी, मन शांती साठी तसेच थकवा आणि आळस दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

काळजी काय घ्याल?
गर्भधारणेदरम्यान किंवा कोणताही गंभीर आजार असल्यास, प्रशिक्षित योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. टीव्ही किंवा इंटरनेट पाहताना कधीही योगाभ्यास करू नका, त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. आरोग्याबाबत जागरुक असणं हे महिलांसाठी जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे जीवनशैली सांभाळणं, तरच तुम्हाला आसनांचा लाभ मिळेल.

(लेखिका योगशिक्षक-वेलनेस ट्रेनर आहेत.)

Web Title: international yoga day 2025: Best yoga for women, yoga for mental health and physical health, flexibility and fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.