Join us  

वर्कआऊट केल्यानंतर पुरेसं पाणी पिताय ना ? नाहीतर या ५ समस्या हमखास छळतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 7:51 PM

फिट राहण्यासाठी वर्कआऊट तर करताय, पण पुरेसे पाणी प्यायले जात नाहीये... असं तर तुमचं होत नाही ना ? कारण यामुळे वर्कआऊटचा फायदा तर सोडाच पण आरोग्यावर भलताच परिणाम होऊ शकतो बरं का...

ठळक मुद्देव्यायाम झाल्यानंतर भूक लागल्यासारखे वाटत असेल, तर तुमचे शरीर पाणी पातळी कमी झाल्याबद्दल सुचवते आहे, हे लक्षात घ्या.वर्कआऊटनंतर एक ग्लास पाणी प्या आणि त्यानंतरच तुमचा डाएट घ्या. पाणी न पिता थेट खाण्यास सुरूवात करू नका. 

आरोग्य राखण्यासाठी जसे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे, तेवढेच आवश्यक आहे योग्य प्रमाणात पाणी पिणे. बऱ्याच जणांना असे वाटत असते, की वर्कआऊट करताना किंवा वर्कआऊट झाल्यानंतर लगेचच पाणी पिणे गैर आहे. परंतू काही अभ्यासकांचे असे मत आहे, की वर्कआऊट करताना आणि त्यानंतरही तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे, अयोग्य आहे. त्यामुळे वर्कआऊट करताना जर तहान लागली असेल, तर थोड्या प्रमाणात का होईना, पण पाणी प्यायलाच हवे. पाणी न पिता वर्कआऊट करणे म्हणजे शरीरावर अन्याय करण्यासारखे आहे.

 

वर्कआऊटनंतर पुरेसे पाणी नाही प्यायले तर...१. शरीरातील पाणी पातळी कमी होतेवर्कआऊट दरम्यान किंवा त्यानंतर लगेचच पाणी प्यायले तर फॅट बर्न होणार नाहीत, असा अनेकांचा समज असतो. पण असे समजणे चुकीचे आहे. वर्कआऊट दरम्यान किंवा वर्कआऊटनंतर पाणी पिणे आणि फॅट कमीजास्त होणे, याचा काहीही संबंध नसतो. पाणी पिणे टाळले, तर तुमच्या शरीरातील पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ शकते आणि त्यातून डिहायड्रेशनसारखा त्रास होऊ शकतो. शरीरातील पाणी कमी झाले तर त्याचा परिणाम रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात मिसळल्या जाणाऱ्या ऑक्सिजनवरही होऊ शकतो.

 

२. त्वचेवर येतील सुरकुत्यापाणी आणि त्वचेचे सौंदर्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिलेच पाहीजे. जेव्हा आपण वर्कआऊट करतो, तेव्हा घाम येतो आणि आपोआपच शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते. ती भरून काढण्यासाठी पुरेसे पाणी घेणे गरजेचे असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर त्वचा कोरडी होत जाते आणि त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत जातात. त्यामुळे अकाली वय वाढल्यासारखे दिसून लागते. म्हणून भरपूर वर्कआऊट करा आणि भरपूर पाणी पिऊन सुंदर दिसा.

 

३. कार्डियाक ताण वाढतोजर आपण पुरेश्या प्रमाणात पाणी घेतले नाही, तर आपले रक्त घट्ट होत जाते. तसेच कोशिका शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित होण्यासाठी संकुचित होऊ लागतात. त्यामुळे हृदयावर अधिकाधिक ताण येत जातो. रक्त घट्ट होण्याचे प्रमाण असेच वाढत गेले तर बीपी, हृदयविकार, श्वास लागणे, दम लागणे असे आजारही मागे लागू शकतात.

 

४. स्नायू दुखू लागतातपाणी कमी प्रमाणात घेतल्याचा त्रास सगळ्याच अवयवांना सोसावा लागतो. वर्कआऊट केल्यानंतर पुरेसे पाणी प्यायले तर मांसपेशी म्हणजेच स्नायूु दुखत नाहीत. अन्यथा पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायूंचे दुखणेही कायमसाठी मागे लागू शकते. 

 

५. शरीरात टॉक्झिन्स तसेच राहतातआपल्या शरीरात जे काही विषारी पदार्थ तयार होतात, ते शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात पिणे गरजेचे असते. जर पाण्याची मात्रा कमी पडली, तर टॉक्झिन्स शरीरातच अडकून पडतात. विषारी पदार्थांचे शरीरात राहणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते.  

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सपाणी