Join us  

व्यायाम करताना अंग दुखलं, अशक्तपणा आला तर समजा, आपलं काहीतरी चुकतंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 3:51 PM

व्यायाम करताना दुखापत होऊ शकते, ती टाळण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या ठरतात.

ठळक मुद्देआपलं शरीर आपल्याला विविध प्रकारच्या सूचना देत असतं. त्याकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे, त्या सूचना समजून घेता आल्या पाहिजेत.

गौरी पटवर्धन

व्यायामाचा  आधीच कंटाळा. त्यात सुरुवात केली की हातपाय अंगदुखी असा त्रास होतोच. पण तो नंतर जातो. पण नेमकी दुखापतच झाली तर? व्यायाम करतांना हळूहळू करणं महत्वाचं असतं, कारण तसं केलं नाही तर? दुखापत होण्याचा संभव असतो. सांधे दुखणं, स्नायू दुखणं याकडे सुरुवातीला बारीक लक्ष ठेवावं लागतं. सुरुवातीला शरीराला व्यायामाची सवय नसते त्यावेळी काही प्रमाणात स्नायू दुखणं नॉर्मल आहे. पण काही दिवस व्यायाम केल्यावर ते दुखणं कमी होत थांबायला पाहिजे. आणि व्यायामाने सांधे मात्र दुखायला नकोत. व्यायाम करतांना किंवा व्यायाम करून झाल्यावर जर फार वेदना होत असतील तर? याचा अर्थ असा की आपलं काहीतरी चुकतं आहे. अशा वेळी, कुठल्याही तज्ज्ञाला भेटण्यापूर्वी त्याबद्दल घेण्याची खबरदारी म्हणजे तो व्यायाम, ती हालचाल, ती कृती करणं लगेच बंद करून टाकायचं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. जे करून दुखतं, ते करायचं नाही. त्यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवू..

 

१. दोन तीन प्रकारचे व्यायाम बदलून बदलून करणं यामुळे अजून एक महत्वाचा फायदा मिळतो, तो म्हणजे दुखापती कमी होतात. रोज एकाच प्रकारचा व्यायाम केला म्हणजे त्याच त्याच स्नायूंना आणि सांध्यांना काम करावं लागतं. त्याऐवजी वेगवेगळे व्यायाम केले तर आलटून पालटून वेगवेगळे स्नायू काम करतात, किंवा तेच स्नायू पण कमी जास्त काम करतात आणि एका दिवशी दमलेल्या स्नायूंना विश्रांती मिळते, व्यायामाने झालेली झीज भरून काढायला वेळ मिळतो.

२. आलटून पालटून व्यायाम करण्याचा याच संदर्भातला अजून एक फायदा म्हणजे वेगवेगळे स्नायू बळकट होतात. अर्थात फक्त एकसुरी एरोबिक व्यायाम करण्याबरोबर इतर व्यायामही करणं महत्वाचं असतं. कारण बहुतेक सगळ्या एरोबिक प्रकारच्या व्यायामांमध्ये फक्त पायाचे किंवा शरीराच्या खालच्या अर्ध्या भागातलेच स्नायू वापरले जातात. त्यामुळे हाताचे, खांद्यांचे, पाठीचे, मानेचे व्यायाम वेगळ्याने करावेच लागतात.

३. या सगळ्याच्या बरोबरीने व्यायामातला महत्वाचा भाग असतो तो म्हणजे विश्रांती. आठवड्यातले सहा दिवस रोज व्यायाम केल्यानंतर एक दिवस व्यायामाला सुट्टी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. इन फॅक्ट जेव्हा आपण व्यायाम नव्याने सुरु करतो तेव्हा सुरुवातीला जास्त पाय दुखतात. ते दुखणं व्यायामाची सवय झाल्यावर हळू हळू कमी व्हायला पाहिजे तसं होत नाही. त्यावेळी दोन तीन-चार दिवसांनी एक दिवस पूर्ण विश्रांती घ्यायलाही हरकत नसते. किंवा एक दिवस व्यायाम एक दिवस विश्रांती अशीही सुरुवात करायला हरकत नसते.

४. व्यायाम आणि डाएट या दोन्हीमध्ये आपला आपल्या शरीराशी चांगला संवाद असणं महत्वाचं असतं. आपलं शरीर आपल्याला विविध प्रकारच्या सूचना देत असतं. त्याकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे, त्या सूचना समजून घेता आल्या पाहिजेत.

५. आपला व्यायाम योग्य मार्गावर आणि योग्य प्रमाणात चालू आहे हे ओळखण्याची सगळ्यात सोपी खूण म्हणजे व्यायाम करून झाल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे. व्यायाम केल्याचा थकवा अर्थातच येऊ शकतो. पण त्या थकव्याने गळून जाणं, अशक्तपणा वाटणं हे बरोबर नाही. व्यायाम करून झाल्यावर अजून थोडासा व्यायाम करावासा वाटला पाहिजे, आणि नेमकं त्यावेळी थांबता आलं पाहिजे. तरच दुसऱ्या दिवशीच्या व्यायामाला उत्साह शिल्लक राहतो.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स