Join us  

ग्रीन टी पिण्याचे परफेक्ट टायमिंग कोणते? वाट्टेल तेव्हा ग्रीन टी पिऊ नका, हे घ्या वेळेचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 3:55 PM

आरोग्यासाठी पौष्टिक असणारा ग्रीन टी आज जगभरात लाखो लोक रोज आवडीने पितात. पण ग्रीन टी कधी प्यावा, याचे देखील एक परफेक्ट टायमिंग असते. हे परफेक्ट टायमिंग साधता आले, तर निश्चितच आरोग्याला अधिकाधिक लाभ होऊ शकतात.

ठळक मुद्देएक कप ग्रीन टीमध्ये ३५ एमजी कॅफिन असते. हेच प्रमाण एक कप कॉफीमध्ये तब्बल ९६ एमजी एवढे वाढलेले असते. झोपण्यापुर्वी साधारण ४ ते ५ तास आधी ग्रीन टी घेतलेला असावा.

चहा, कॉफी, ग्रीन टी किंवा मग हर्बल टी ही सगळीच पेयं पिण्याची ठराविक वेळ असते आणि त्याचे योग्य प्रमाणही ठरलेले असते. पण चहा- कॉफीप्रेमी असणारे आपण भारतीय लोक मात्र या कोणत्याच बंधनात स्वत:ला अडकून घेत नाही. त्यामुळेच तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.

सकाळी ग्रीन टी घ्यावा का ?

  • सकाळी झोपेतून उठले की, गरमागरम चहा घ्यावा, ही अनेकांची वर्षानुवर्षांची सवय असते. जोपर्यंत चहा घेत नाही, तोपर्यंत दिवस सुरू झाल्यासारखेच वाटत नाही, असेही अनेकांचे म्हणणे असते. त्यामुळे ग्रीन टी पिण्यासाठीही अनेक जण सकाळचीच वेळ निवडतात. 
  • तुम्हालाही अशी सवय असेल, तर ती योग्य आहे. ग्रीन टी मध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे शरीराला उर्जा मिळते, मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते आणि नवे काम करण्यासाठी उत्साह येतो. 
  • ग्रीन टी मध्ये एल थॅनिन हे ॲमिनो ॲसिड असते. यामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होते. तसेच कॅफिन आणि थॅनिन यांचा एकत्रित परिणाम होऊन मेंदूचे कार्यही सुधारते आणि मुड स्विंग होण्याचा त्रास कमी होतो. 

 

एक्सरसाईज नंतर ग्रीन टी घ्यावा का ?

  • धावणे, पळणे, सायकलिंग किंवा जीम असा व्यायाम केला की अनेक जण ग्रीन टी घेण्यास उत्सूक असतात. पण असे करणे टाळा. कारण याविषयी झालेल्या एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, ग्रीन टी हे एक्सरसाईज केल्यानंतर किंवा एक्ससाईज करताना घेणे चूकीचे आहे. 
  • त्याउलट जर व्यायाम करण्यापुर्वी ग्रीन टी घेतला तर त्याचे अधिक उपयोग होऊ शकतात. संशोधनानुसार, जर ग्रीन टी व्यायामाला सुरूवात करण्यापुर्वी घेतला तर त्यामुळे शरिरातील फॅट बर्न होण्याचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढते. व्यायामाला सुरूवात करण्याच्या दोन तास आधी ग्रीन टी घेतलेला असावा. 
  • व्यायाम करण्यापुर्वी जर ग्रीन टी घेतला असेल तर खूप हेवी वर्कआऊट केल्यानंतर शरीराच्या स्नायूंचे होणारे नुकसान भरून काढण्याची ताकदही ग्रीन टीमध्ये असते. 

 

जेवण झाल्यानंतर आणि झोपण्यापुर्वी ग्रीन टी नको

  • जेवण झाल्यानंतर ग्रीन टी घेण्याची अनेकांची आवड आणि सवयही असते. पण ही सवय अत्यंत चुकीची आहे. ग्रीन टी मध्ये कॅफिन असते. जर जेवणानंतर ग्रीन टी घेतला तर आपण जी काही पोषकमुल्ये जेवणातून घेतली आहे, ती शरीरात बांधून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे ही पोषक मुल्ये रक्तात मिसळत नाहीत आणि त्याचा शरीराला फायदा होत नाही.
  • तसेच झोपण्यापुर्वीही ग्रीन टी घेतला तर यामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास उद्भवू शकतो.  
टॅग्स :आरोग्यफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स