सध्या सगळीकडे ज्या चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे सैयारा. तरुण-तरुणींना या चित्रपटाने पार येडं केलं आहे. चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणार्या अहान पांडेवर तर तरुणी जामच फिदा झाल्या आहेत. अहान दिसायला तर हॅण्डसम आहेच पण तो एकदम फिट आहे. (Fitness Tips, Saiyaraa star Ahaan Pandey's mother is a fitness expert-style icon, her special mantra for staying fit)अहान एवढा फिट असल्याचे कारण फक्त जीमच नाही तर त्याची आई आहे. आहानची आई फक्त एका अभिनेत्याची आई म्हणून प्रसिद्ध नसून ती तिच्या फिटनेस आणि डाएट टिप्ससाठी प्रसिद्ध आहे.
डीन पांडे की एक नामवंत लेखिका आहे. तिची पुस्तके मोठ्या प्रमाणावर विकली जातात. व्यायाम, आहार, फिटनेस या विषयांवरील तिचे लेखन फार लोकप्रिय आहे. अनेक मोठ्या बॉलिवूडसेलिब्रिटींची ती फिटनेस ट्रेनर आहे. प्रिती झिंटा, बिपाशा , जॉन इब्राहम आदी अनेक जणांची फिटनेस ट्रेनर म्हणून डीनने काम केले आहे. आहानच्या यशानंतर डीन त्याची आई म्हणून चर्चेत आली असली तरी ती स्वत: एक एक्सपर्ट आणि यशस्वी उद्योजक आहे. वयाच्या ११ व्या वर्षीच आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवून त्या दिशेने वाटचाल करत तिने योग अभ्यास केला. इतरही अनेक गोष्टी शिकून घेतल्या.
हिंदूस्तान टाइम्ससोबतच्या एका मुलाखतीत डीनने फिटनेस टिप्स शेअर केल्या. सगळ्यांनी करायला हव्या अशा काही गोष्टी तिने सांगितल्या. डीनने सांगितले काहीही फार वेगळे करायची गरज नसते. आपल्या भारतीय सवयी, आहार, व्यायाम प्रकार नियमित करा तेवढे पुरेसे असते. डीनने सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवायला सोप्या आहे.
१. रोज सकाळी उठल्यावर अर्धा लिटर पाणी प्यायचे. नंतर सुकामेवा खा. तसेच नाश्त्याला इडली सारखे पचायला हलके असणारे पदार्थ खावेत. ओट्स खाणे फायद्याचे ठरते.
२. परदेशातून येणाऱ्या भाज्यांना नको तेवढे महत्व दिले जाते. त्याऐवजी आपल्या जवळपास ज्या भाज्या पिकतात त्या ताज्याच खाव्यात. हंगामी भाज्या, फळे खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. ताजे पदार्थ खा.
३. घरचा वरण भात, भाज्या, इतर पदार्थ खावेत. आहार घरातलाच असावा. विकतचे खाऊ नका. पचेल असा तांदूळ वापरा. पौष्टिक पदार्थ घरी करुनच खा. कडधान्ये आहारात असावीत.
४. दह्यासारखे पदार्थ आहारात असावेत. डीन सांगते, एकदाच भरपूर खाण्याऐवजी थोडे थोडे खावे. दिवसातून काही तासांनी थोडे खावे. त्यामुळे पोट रिकामे राहत नाही आणि काही अरबटचरबट खाण्याची इच्छाही होत नाही.
५. योगासन करणे यासारखा दुसरा छान व्यायाम नाही असे डीन सांगते. साधी सोपी योगासने जर नित्यनियमाने केली तर आरोग्य एकदम छान राहील.
डीन पांडेने सांगितलेल्या या टिप्स लक्षात ठेवा. अगदी सोप्या आहेत आणि आरोग्य चांगले राहावे यासाठी वेळ काढून नक्कीच सगळे काही नियम पाळू शकतात.