Join us  

चालायला सकाळी जावं की सायंकाळी? जेवल्यावर की जेवणापूर्वी? कोणती वेळ 'योग्य' कोणती फारच 'चुकीची'?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 11:14 AM

चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी चांगला असला तरी कोणत्या वेळी चालायला हवे याबाबत माहित असणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देचालायचा व्यायाम करत असाल तर योग्य वेळ निवडणे गरजेचे दिवसाच्या ठराविक वेळेत चालण्याचा व्यायाम ठरु शकतो आरोग्यासाठी घतक

चालणे हे आपल्याला अगदी साधे वाटत असले तरी हा अतिशय साधा आणि सोपा व्यायामप्रकार आहे. ठराविक वेळ नियमितपणे चालल्याने शरीराची एका लयीत हालचाल होते आणि शरीराला व्यायाम होतो. सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी चालणे हा एक चांगला व्यायाम ठरु शकतो. केवळ वजन कमी करण्यासाठी नाही तर आपल्यातील उत्साह, ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी हा व्यायाम अतिशय चांगला ठरतो. ३० मिनीटे ते १ तास दररोज नियमितपणे चालणे आरोग्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरते. चालण्याच्या व्यायामामुळे पचक्रिया तर सुधारतेच पण रक्तप्रवाह सुरळीत होण्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि दिवसभरासाठी तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. तसेच रात्री शांत झोप लागण्यासही चालण्याच्या व्यायामाचा फायदा होतो. प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार, आपल्या सोयीनुसार हा व्यायाम करत असतो. पण या व्यायामाच्या वेळेबाबत तुम्ही काही चुका करत असाल तर ते मात्र आरोग्यासाठी घातक ठरु शकते. आता या चुका कोणत्या ते जाणून घेऊया...

(Image : Google)

चालण्याची 'ही' वेळ चुकीची

चालण्याचा व्यायाम चांगला असला तरी त्यासाठी योग्य वेळ निवडणे अतिशय गरजेचे असते. चुकीच्या वेळी चालायला गेल्याने त्याचा शरीराला फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. आकाशात सूर्य नसताना चालायला जाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण यावेळी वातावरणातील प्रदूषणाची पातळी जास्त असते. काही जण व्यायाम करायचा म्हणून भल्या पहाटे उठून बाहेर चालायला जातात. पण यावेळी प्रदूषण हे जमिनीच्या स्तरावर असते ज्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. यामुळे श्वासाचे किंवा फुफ्फुसाशी निगडीत तक्रारी उद्भवू शकतात. 

मग चालायला जाण्याची योग्य वेळ कोणती? 

सकाळी ७ ते १० ही चालायला जाण्यासाठी अतिशय योग्य वेळ आहे. या वेळातील ऊन हे कोवळे असते. असे कोवळे ऊन अंगावर घेणे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असते. त्यामुळे भल्या पहाटे उठून जाण्यापेक्षा ७ नंतर चालायला जाणे केव्हाही चांगले. तसेच सायंकाळी ४ ते ६ या वेळीही तुम्ही घराबाहेर जाऊल चालण्याचा किंवा इतर प्रकारचा व्यायाम करु शकता. तुम्ही दिवसभराचे काम करुन थकले असाल तर सूर्यास्तापूर्वी चालण्याने तुम्हाला नक्कीच एनर्जेटीक वाटू शकते. 

(Image : Google)

दुपारी आणि संध्याकाळनंतर चालणे घातक

काही महिला आपली घरातील सगळी कामे आटोपल्यावर सोसायटीच्या आवारात किंवा रस्त्यावर, बागेत चालायला जातात. पण सकाळी ११ ते ४ या वेळात सूर्य आपल्या डोक्यावर असतो, अशावेळी व्यायाम म्हणून चालणे आरोग्यासाठी चांगले नाही. या तीव्र उन्हामुळे केवळ थकवाच येत नाही तर तुम्हाला त्वचेच्याही तक्रारी उद्भवू शकतात. तसेच सूर्यास्तानंतर चालणेही आरोग्यासाठी फारसे चांगले नसते. अनेकजण रात्रीच्या जेवणानंतरही वेळ असतो म्हणून चालायला जातात. पण यावेळी शतपावली करणे ठिक आहे. त्याहून जास्त चालण्याचा व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले नाही. कारण रात्रीच्या वेळी चालण्याचे दृष्टीवरही वाईट परिणाम होऊ शकतात. रात्री उशीरा चलल्यामुळे पचनशक्ती क्षीण होते.  

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य