Join us  

दिवाळीत अति काम झाल्याने पाठ-कंबर दुखतेय? ही ४  योगासनं करा, दुखणं पळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2021 4:57 PM

दिवाळीची तयारी करण्यासाठी कंबर कसून काम केलं आणि आता ऐन दिवाळीत कंबरेने दुखणं काढलं? चिंता करू नका. फक्त ही ४ योगासने करा. पाठ- कंबरेचं दुखणं कुठल्याकुठे पळून जाईल.

ठळक मुद्देही आसने केल्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या तक्रारी तर दूर होतीलच पण त्यासोबतच तुमचं बॉडी पोश्चर सुधारेल.

दिवाळीच्या साधारण १० ते १५ दिवस आधीपासून महिलांची प्रचंड गडबड सुरू होते. अगदी अंगणाच्या पहिल्या पायरीपासून ते अडगळीच्या खोलीपर्यंत सगळं काही धुवून, पुसून स्वच्छ केलं जातं. घरातले सगळे माळे एकेक करून आवरायला खाली येऊन बसतात. माळ्यावरच्या वस्तू खाली काढणे आणि पुन्हा स्वच्छ झालेल्या वस्तू माळ्यावर ठेवणे, यात कमालीची दमछाक होते. याशिवाय घरातले पंखे, दिवे यासारख्या उंचावरच्या वस्तू साफ करण्याचा त्रास तर आणखीनच वेगळा. एवढं सगळं करून पुन्हा दररोजची शॉपिंग आणि फराळ या गोष्टी तर ठरलेल्याच असतात. आता एवढं सगळं जेव्हा आटोपत येतं, तेव्हा साहजिकच कंबर आणि पाठ असहकार पुकारतात आणि आतापर्यंत त्यांच्या झालेल्या सगळ्या कष्टाचा वचपा काढतात. 

 

तुमच्या बाबतीतही असंच झालं असेल, दिवाळीत अति काम केल्यामुळे पाठ, कंबर अगदी गळून गेली असेल, तर दुखणाऱ्या पाठीला आणि कंबरेला आराम देण्यासाठी ही काही सोपी योगासने करा. बॉलीवूड अभिनेत्री फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी हिने ही काही योगासने सांगितली आहेत. शिल्पा म्हणते ही योगासने तुमच्या मणक्यासाठी अतिशय चांगली आहेत. ही आसने केल्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या तक्रारी तर दूर होतीलच पण त्यासोबतच तुमचं बॉडी पोश्चर सुधारेल आणि मणक्याचा चांगला व्यायाम होऊन बॉडी टोनसाठी ही आसने मदत करतील. 

मणक्यासाठी ही चार आसने आहेत फायदेशीर

१. विपरित शलभासनहे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी पोटावर झोपा. त्यानंतर दोन्ही हात समोर करा. दोन्ही हात आणि दोन्ही पाय ३० डीग्री अंशात वर उचला. चेहरा आणि मान देखील वर उचला आणि या अवस्थेत १० ते २० सेकंद थांबा. - हे आसन केल्यामुळे पाठीचं दुखणं कमी होतं.- पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

- पाठीचा कणा मजबूत होण्यासाठी हे आसन नियमितपणे करावं.- हे आसन केल्यामुळे पचनाच्या समस्या कमी होतात.- मांसपेशींच्या मजबूतीसाठी हे आसन उपयुक्त आहे. 

 

२. अर्ध शल्भासनहे आसन करण्यासाठी पोटावर झोपा. यानंतर दोन्ही हात मांड्यांखाली ठेवा. हनुवटी जमिनीवर टेकवा. यानंतर एक पाय गुडघ्यात न वाकवता ३० डीग्री अंशावर उचला. १५ ते २० सेकंद ही आसनस्थिती राहू द्या आणि त्यानंतर पाय खाली करा. हीच कृती दुसऱ्या पायाने करा. - हे आसन नियमितपणे केल्यामुळे गुडघे, नितंब, कंबर, आणि पोटावर वाढलेली चरबी कमी होते.- कंबरदुखीचा त्रास कमी करण्यासाठी हे आसन उत्तम आहे. - पोटावरची चरबी कमी होते.- हृदयाचे कार्य सुधारते.- पचनासंदर्भातले आजार दूर होतात. 

 

३. धनुरासनहे आसन करण्यासाठी पोटावर झोपा. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि मांड्यांपासून वर उचला. आता दोन्ही हात मागे न्या आणि दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करा. चेहरा, मान आणि छाती उचलण्याचाही प्रयत्न करा.- धनुरासन केल्यामुळे मान, पाठ आणि कंबरेचे दुखणे कमी होते.- वेटलॉससाठी हे आसन फायदेशीर मानले गेले आहे.- यामुळे पोट, पाठ, मांड्या, दंड यांंच्यावरची चरबी कमी होते.- मणक्याची लवचिकता वाढविण्यासाठी हे आसन नियमित करावे.- या आसनामुळे स्नायुंना बळकटी मिळते. 

 

४. बालासनहे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनात बसा. यानंतर दोन्ही जमिनीवर ठेवून सरळ रेषेत पुढे न्या. डोके जमिनीवर टेकवा आणि १५ ते २० सेकंद ही आसनस्थिती टिकवून ठेवा.- बालासन केल्यामुळे पाठदुखी कमी होते.- मन शांत ठेवण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.- या आसनामुळे मज्जा संस्थेचा व्यायाम होतो. त्यामुळे ताणतणाव कमी करण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.- बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी बालासन करावे.- निद्रानाशाचा त्रास या आसनामुळे कमी होतो.   

टॅग्स :फिटनेस टिप्सशिल्पा शेट्टीयोगासने प्रकार व फायदेपाठीचे दुखणे उपायआरोग्य