Join us  

व्यायाम करायचा तर जिम कशाला? घरच्याघरी करा इनोव्हेटिव-इंटरेस्टिंग-भन्नाट व्यायाम, ही घ्या यादी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 6:18 PM

व्यायाम करायलाच हवा हे आपल्याला कळतं, पण मग लगेच जिम लावा, पैसे खर्च करा, महागडे बूट आणा हे सारं कशाला?

ठळक मुद्देव्यायाम व्यायाम असा बाऊ न करता जे आपल्या घरात, हातात असेल, त्यापासून सुरुवात करायची.

प्राची पाठक

व्यायाम हा एक गुळगुळीत झालेला शब्द आहे. व्यायामाचं नाव काढलं की एखादा "कधीही पूर्ण न झालेला संकल्प" अशीच माहिती आपण या शब्दाला जोडून ठेवली आहे. त्यामुळे व्यायाम म्हटलं की एक तर अपूर्ण संकल्पांचे जोक्स सुरू होतात, नाहीतर कुणीतरी भन्नाट फिगर असलेलं एकदम आदर्श होतं. मग जीम लावावं वाटतं. पण हवं ते जिम कधी आपल्या घराजवळ नसतं.  कधी आपलं आणि जिमचं टायमिंग जुळून येत नाही. मग परत दांड्या. अचानक व्यायामाचं भूत डोक्यावर बसल्याने आणि एकदम जास्तीचा व्यायाम सुरू केल्याने चार आठ दिवसांतच तो सगळा प्रकार अत्यंत दमवणारा आणि रटाळ होऊन जातो. आपल्याला त्यात काही इंटरेस्ट उरत नाही. मग सुरू होते ती जिमची फी वसूल करण्यासाठीची धडपड! इतके पैसे आपण जिममध्ये भरले आहेत, तर ते वसूल होण्याइतपत तरी त्याचा लाभ घ्यावा, असे डायलॉग आपल्यावर येऊन आदळतात. या सगळ्या सीनमध्ये अधून मधून "योगा", सूर्य नमस्कार, प्राणायाम वगैरे देखील ट्राय करून झालेलं असतं. त्याने थोडीच सिक्स पॅक बनणार आहेत, अशी आपली खात्रीही झालेली असते. कोणी सांगतं, तुम्ही वेट ट्रेनर लावून घ्या. पर्सनल कोच तर हवाच. कोणी म्हणतं, गाई गुरं कुठे व्यायाम करतात? व्यायाम हे तर माणसांचं फॅड आहे. कोणी म्हणतं आमच्या वेळी कुठे असे जिम होते? गेलंच ना आमचं आयुष्य? ह्या सगळ्या मतांवर देखील बरा टाईमपास होऊन जातो. व्यायाम परत मागे पडतो. सगळ्यांची व्यायामाची गाडी अशीच कुठेतरी अडकलेली असते. एकदम खूप काही सुरू करायचं किंवा काहीच करायचं नाही. बराचसा काळ तर मनातच मांडे खाण्यात गेलेला असतो. 

 

म्हणून मग आपण घरच्या घरी व्यायाम करुन पाहू.

तो पण कल्पक, इनोव्हेटिव आणि जवळपास फुकट. आणि इंटरेस्टिंगही.

१.  आपली लाइफस्टाइल आपण थोडी लक्षात घेतली तर? आपण उठतो केंव्हा, झोपतो केंव्हा, कितीवेळ झोपतो, दिवसातून किती वेळा आणि काय खातो, असे प्रश्न स्वतःलाच विचारायचे. आपला दिवसातला किती वेळ बैठं काम करण्यात, मोबाईल, टॅब हातात घेऊन बसण्यात जातो? शरीराची काही हालचाल होईल, अशी किती कामं आपण दिवसभरात करतो? घरकामात आपला कसा आणि किती सहभाग असतो? दिवसभर आपण किती धावपळ करतो, हे सर्व जीवनशैलीशी संबंधित प्रश्न स्वतःलाच विचारायचे. त्यातून आपलं एक हेल्थ प्रोफाइल तयार होईल. एक रेकॉर्ड बनेल.२. व्यायामासाठी नेहमीच महागड्या जिमला जायची गरज नसते.  घरच्या घरी काही व्यायाम प्रकार सुरू करू शकतो. त्यात पिंग पॉंग हा खेळ, म्हणजे एखादा लहानसा चेंडू टेबल टेनिस सारखा भिंतीवर खेळायचा. कोणाला आवाजाचा त्रास होऊ नाही, म्हणून चक्क हलका, छोटासा चेंडू घ्यायचा आणि भिंतीवर टेबल टेनिस खेळतोय अशा प्रकारे खेळायचा. त्याने कमरेचा, हाता पायांचा खूपच छान व्यायाम होतो. एखाद दोन गाणी हेडफोनवर ऐकत देखील हा व्यायाम करता येतो. दिवसातून दहा दहा मिनिटांचे ब्रेक घेत असा व्यायाम चार, सहा वेळा करता येतो.३. घरात, घराबाहेर एखादा कापडी हँगिंग बॉल टांगून ठेवून त्यावर व्यायाम सुरू करता येतो. किक बॉक्सिंग घरीच सुरू करता येतं. ती बॅग देखील घरीच बनवून घेता येते. आपल्याला आवडतील आणि कुठेही खेळता येतील, विशेष आवाज होणार नाही, इतरांना त्रास होणार नाही, असे खेळ खेळत व्यायामाला सुरुवात करता येते. व्यायाम व्यायाम म्हणून न करता शारीर हालचाली वेगात होतील, अशा गेम्सच्या माध्यमातून सुरू करता येतो. हळूहळू वेळ वाढवत नेता येतो. त्यात गेम्स खेळायच्या आधी, मधल्या वेळात काही वॉर्म अप प्रकार, रनिंग वगैरे जोडत जाता येतं.

४. एकट्याने बॅडमिंटन खेळून बघा. दोन्ही हातात दोन रॅकेट्स घेऊन आपणच खेळायचं. जाम घाम निघेल. तसंच एखादी डिश, एखादी रिंग हवेत उडवत खेळता येतं. एकातून अनेक छोटे मोठे गेम्स आपले आपल्याला सापडत जातात. ते खेळायच्या निमित्ताने आपण बसून राहणं कमी करतो. शरीर हालचाली सुरू करतो. हळूहळू त्यात इतर मुख्य व्यायाम प्रकार जोडत जाता येतात. व्यायामाचा कंटाळा येत नाही. तासंतास आपण ह्या गेम्समध्ये रमून जातो, ते वेगळंच. हे गेम्स घरच्या घरी तयार करता येऊ शकतात. अमुक गोष्ट विकत मिळाली, तरच माझं तमुक सुरू होईल, असं अडून बसायची गरज नसते. आपला स्टॅमिना वाढत गेला की रेग्युलर व्यायाम करायला, शिकायला आपल्याला आवडायला लागतं, हा फायदाही असतोच.५. तर, व्यायाम व्यायाम असा बाऊ न करता जे आपल्या घरात, हातात असेल, त्यापासून सुरुवात करायची. एकात एक अशा अनेक शरीर हालचाली त्यात जोडत जायचं. त्यातून उत्साह वाढतो. तो वाढला की व्यायाम आपोआपच होत जातो.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स