Join us  

बिगीनर्स प्रॉब्लेम; व्यायामाला सुरुवात तर करायची पण कशी? रोज किती आणि कसा व्यायाम करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2021 5:34 PM

व्यायामाला तर सुरुवात करायची आहे. पण सुरूवातीला कसा आणि किती व्यायाम करायचा हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून शरीराला व्यायामाची व्यवस्थित सवय लागेल आणि कंटाळाही येणार नाही.

ठळक मुद्देसुरुवातीलाच एकदम जास्त व्यायाम करू नका.हलक्या- फुलक्या व्यायामांनी सुरूवात करा.

अशा प्रकारची समस्या जवळपास सर्वच बिगीनर्सला जाणवते. इतरांचं पाहून आपण व्यायाम करण्यासाठी जबरदस्त चार्ज होते. पण नेमकी कशी सुरुवात करायची हेच कळत नाही. व्यायाम करायचा आहे मग झुंबा करू की ॲरोबिक्स करू, वॉकिंगला जाऊ की रनिंग करू, जीम जॉईन करू की योगा क्लास करू असे एक ना अनेक प्रश्न बिगीनर्सच्या मनात असतात. शिवाय अमूक एक मैत्रीण किंवा माझी शेजारीण एवढा व्यायाम करते, माझ्या एवढीच आहे ती वयाने मग आपणही तिच्या एवढाच व्यायाम केला पाहिजे, असं देखील अनेक जणींना वाटतं आणि त्यातूनच मग सुरुवात होते चुकीच्या व्यायामाच्या सवयींची. म्हणूनच मैत्रिणींनो आधी व्यायाम, वेळ आणि तुमची प्रकृती यांचं गणित व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर व्यायामाला लागा. जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही.

 

धावणे, सायकलिंग, योगा, स्विमिंग असा कोणताही व्यायाम आरोग्यासाठी फायदेशीरच असतो. परंतु रोज किती धावायचे, सायकलिंग किती करायचे, व्यायाम किती आणि कोणता करायचा, याच्या काही मर्यादा असतात. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि हृदयाची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. 

 

धावण्याचा व्यायाम देखील प्रकृतीसाठी अतिशय चांगला आहे. यामुळे व्यक्तीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. याशिवाय या व्यायामासाठी पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहजपणे धावण्याचा व्यायाम करू शकते. परंतू धावण्यास सुरुवात करण्यापूर्वी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा धावणे हानिकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे इतर व्यायाम सुरू करण्यापूर्वीही काळजी घेणे आवश्यक ठरते. 

 

धावण्याचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी ही काळजी घ्या- कालपर्यंत तुम्ही काहीही व्यायाम करत नव्हतात. पण आजपासून तुम्हाला एकदम धावण्याचा व्यायाम सुरू करायचा आहे, असे चालणार नाही. कारण एकदम धावायला सुरूवात केली तर निश्चितच त्रास होऊ शकतो.- धावण्याचा व्यायाम सुरू करण्याआधी काही दिवस चालण्याची, मग त्यानंतर काही दिवस वेगाने चालण्याची सवय करा. त्यानंतर थोडे थोडे अंतर धावायला लागा. एकदम धावू नका. त्रास झाला की लगेच थांबा. त्रास होत असताना अजिबात धावू नका.

 

सायकलिंग सुरु करण्यापूर्वी......- कोणत्याही व्यायाम आणि अगदी सायकलिंग सुरु करण्यापूर्वीही वॉर्म- अप करणे फायद्याचे ठरते.- सायकलिंगच्या पहिल्याच दिवशी अधिक अंतर जाणे टाळले पाहिजे. रनिंगप्रमाणे रोज थोडे सायकलिंग करावे. सराव वाढल्यानंतर अंतर वाढवीत गेले पाहिजे.

 

हृदयाची क्षमता पहाप्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीची, हृदयाची क्षमता ही वेगवेगळी असते. तरूणांची क्षमताही अधिक असते. त्या तुलनेत महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या हृदयाची क्षमता तुलनेत कमी असते. विशेषत: ज्येष्ठांनी कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी स्वत:च्या हृदयाची क्षमता तपासून घेतल्यानंतरच सोयीचे व्यायाम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

 

सोप्या व्यायामांनी सुरुवात करा....- सुरुवातीलाच एकदम जास्त व्यायाम करू नका. - हलक्या- फुलक्या व्यायामांनी सुरूवात करा.- चालणे, वॉर्मअप, स्ट्रेचिंग या प्रकारांनी तुम्ही व्यायामाला सुरूवात करू शकता.- यामुळे अंग दुखणार नाही आणि त्यामुळे व्यायामाचा कंटाळाही येणार नाही. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स