Join us  

Animal Walk: झरझर वजन कमी करण्याचा सोपा उपाय, सांगतोय स्वप्नील जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 4:14 PM

वजन कमी करण्याचे अनेक उपाय करून थकला असाल, तर आता हा एक मस्त उपाय करून बघा. ॲनिमल वॉक. यामुळे वजन तर कमी होतेच पण फिटनेससाठी देखील ॲनिमल वॉक अतिशय उपयुक्त ठरतो.

ठळक मुद्दे श्वसन यंत्रणेचा व्यायाम होण्यासाठी आणि फुफ्फुसाची शक्ती वाढविण्यासाठी ॲनिमल वॉक फायद्याचे ठरते. 

वाढलेले वजन कंट्रोल करण्यासाठी आपण अनेक उपाय करून बघत असतो. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळे उपाय फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्याचा आणि फिटनेस मेंटेन करण्याचा एक मस्त उपाय म्हणजे दिवसातून १० मिनिटांचा ॲनिमल वॉक. लहानपणी आपण सगळ्यांनी हा खेळ खेळलेला असतो. पण लहानपणीचा हाच खेळ वजन कमी करण्यासाठी आणि तब्येत चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल, हे आपल्या ध्यानीमनीही नसते. त्यामुळे लहानपणीचा हा खेळ पुन्हा एकदा खेळा आणि आता खेळण्यासाठी नाही, तर तब्येतीसाठी ॲनिमल वॉक करा.

 

मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने नुकताच त्याचा एक व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये स्वप्निल आपल्या चाहत्यांना फिटनेसबाबत मोटीव्हेट करत आहे. यामध्ये स्वप्निल ॲनिमल वॉक करताना दिसत असून या वॉकचे फायदेही त्याने चाहत्यांना सांगितले आहे. ॲनिमल वॉक हा वर्कआऊटचा एक भन्नाट प्रकार आहे. यामध्ये दोन्ही हात जमिनिवर टेकवायचे. दोन्ही हातांचे तळवे आणि दोन्ही पाय यांच्यावर शरीराचे संतूलन राखण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर चार पायांचे जनावरे जसे चालतात, तशा पद्धतीने चालायचे. म्हणजेच उजवा पाय आणि उजवा हात एकसाथ पुढे घ्यायचा आणि त्यानंतर डावा पाय आणि डावा हात एकसाथ पुढे घ्यायचा. अशा चालण्याच्या पद्धतीला ॲनिमल वॉक म्हणतात.

 

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ॲनिमल वॉक म्हणजे जनावरांसारखे चालणे. हा व्यायाम प्रकार मस्त एन्जॉय करत करता येतो. लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हा खेळ खेळला असेलच. पण तेव्हा शरीरावर कुठेही अतिरिक्त चरबी साचलेली नसायची. त्यामुळे आपण पटापट कसा हा खेळ खेळत चालायचो, हे देखील कळायचे नाही. पण जेव्हा प्रौढपणी तुम्ही ॲनिमल वॉक करता तेव्हा अतिरिक्त चरबीमुळे ते खूप सहजपणे करता येत नाही. त्यामुळे सुरुवातीला काही काळ ५ मिनिटांसाठीच हा व्यायाम करा. त्यानंतर वेळ वाढवत न्या आणि जसे झेपेल तसे १० ते १५ मिनिटांसाठी ॲनिमल वॉक करा.

 

ॲनिमल वॉक करण्याचे फायदे१. ॲनिमल वॉक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेटलॉस करण्यासाठी हा व्यायाम खूप उपयुक्त ठरतो.२. ॲनिमल वॉक केल्यामुळे मेंदू आणि हात- पाय यांच्यात सुसूत्रता राखण्यास मदत होते.३. ॲनिमल वॉक केल्यामुळे मनाची एकाग्रता खूप वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी देखील हा वर्कआऊट अतिशय उपयुक्त ठरतो.४. जी लहान मुले खूप चंचल आहेत, त्यांच्या स्वभावात थोडी स्थिरता येण्यासाठी ॲनिमल वॉक करण्याचा सल्ला दिला जातो.५. शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी ॲनिमल वॉक उपयुक्त ठरते.६. श्वसन यंत्रणेचा व्यायाम होण्यासाठी आणि फुफ्फुसाची शक्ती वाढविण्यासाठी ॲनिमल वॉक फायद्याचे ठरते. ७. स्टॅमिना वाढविण्यासाठी ॲनिमल वॉक हा अतिशय चांगला व्यायाम आहे.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स