Join us  

बाळ होण्यासाठी झगडताय? न चुकता करा ३ आसनं, गर्भाशयाचे त्रास होतील कमी-वाढेल ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 3:57 PM

3 Exercises for healthy uterus : गर्भाशयाशी निगडीत समस्या उद्भवू नयेत किंवा नियंत्रणात याव्यात यासाठी योगासनांचा अतिशय चांगला फायदा होतो.

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव अतिशय महत्त्वाचा असून तो त्याला नेमून दिलेले काम योग्य पद्धतीने करत असतो. पण त्या कार्यात अडथळा निर्माण झाला की मग आपल्याला त्या अवयवाकडे आपण लक्ष द्यायला हवं हे लक्षात येतं. मात्र अशाप्रकारे काही झाल्यावर जागे होण्यापेक्षा आधीपासूनच योग्य ती काळजी घेतल्यास आरोग्याच्या समस्या दूर राहण्यास मदत होते. गर्भाशय ही महिलांना नैसर्गिकरित्या लाभलेली एक अतिशय सर्वोत्कृष्ट अशी देणगी आहे. गर्भधारणा करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम या गर्भाशयाद्वारे केले जाते. मात्र गेल्या काही वर्षात गर्भाशयाशी निगडीत समस्यांमध्ये वाढ झाली आहे (3 Exercises for healthy uterus).

मासिक पाळीशी निगडीत समस्या, गर्भाशयाला होणारे विविध इन्फेक्शन, गर्भधारणा होण्यात येणाऱ्या अडचणी यांसारख्या समस्यांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ होताना दिसत आहे. गर्भधारणा होत नसल्याने विविध प्रकारच्या ट्रिटमेंटस घेत असलेली बरीच जोडपी आपल्या आजुबाजूला असतात. अनियमित जीवनशैली आणि वाढते ताणतणाव हेच यामागील महत्त्वाचे कारण असल्याचे दिसते. गर्भाशयाशी निगडीत समस्या उद्भवू नयेत किंवा नियंत्रणात याव्यात यासाठी योगासनांचा अतिशय चांगला फायदा होतो. प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी गर्भाशयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ३ महत्त्वाचे व्यायामप्रकार सांगतात. ते व्यायामप्रकार कोणते आणि ते कसे करायचे पाहूया...

(Image : Google)

१. मालासनात चालणे

मालासन म्हणजे आपण भारतीय शौचालयात ज्या पद्धतीने बसतो ती पोझ. या पोझिशनमध्ये चालायचे, म्हणजेच डक वॉकप्रमाणे चालायचे. दोन्ही हात पुढे ठेवून साधारण १ ते ३ मिनीटे इतका वेळ या आसनात चालल्यास गर्भाशयाची ताकद वाढण्यास मदत होते.

२. चक्की चालासन

जातं ज्याप्रमाणे फिरतं त्याप्रमाणे पाय लांब करुन पोटाच्या भागाची हालचाल केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. हे आसन करताना तुम्ही गुडघे थोडे वाकवले तरी चालते. दोन्ही बाजुने १० वेळा असे एकूण २० वेळा हे आसन केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

३. बद्धकोनासन 

हे आसन आपण बटरफ्लाय पोझ म्हणून ओळखतो. गर्भाशयाचे स्नायू बळकट होण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. दिसायला अतिशय साधे वाटत असले तरीही हे आसन सलग काहीवेळा केल्यानंतर मांड्यांवर ताण येण्याची शक्यता असते. सुरुवातीला १५ सेकंद आणि नंतर हळूहळू वाढवत हे आसन ३ मिनीटांपर्यंत करायला हवे.नंतर त्याच आसनात मागे पाठीवर झोपायचे.  

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामआरोग्ययोगासने प्रकार व फायदे