दरवर्षी जेव्हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतो, तेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष सरकारच्या आर्थिक धोरणांकडे आणि मोठ्या निर्णयांकडे लागलेलं असतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून बजेटच्या दिवशी आणखी एक गोष्ट लोकांचं लक्ष वेधून घेते, ती म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची साडी. बजेट भाषणापूर्वीच त्यांच्या पेहरावाची चर्चा सुरू होते. बजेटमध्ये काय घोषणा होणार, हे जाणून घेण्यासोबतच अर्थमंत्री कोणत्या राज्याची पारंपारिक साडी नेसून संसदेत पोहोचल्या आहेत, हे पाहण्यासाठीही लोक उत्सुक असतात.
निर्मला सीतारामन यांची 'बजेट डे साडी' आता केवळ फॅशन उरली नसून ती भारताची समृद्ध हातमाग परंपरा, कारागिरांचे कष्ट आणि सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक बनली आहे. दरवर्षी त्यांची साडी देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यातील कला आणि विणकाम जगासमोर आणते. म्हणूनच त्यांचा बजेट लूक सामान्य लोकांपासून फॅशन तज्ज्ञांपर्यंत चर्चेचा विषय ठरतो. चला तर मग जाणून घेऊया, यंदा निर्मला सीतारामन यांनी कोणत्या राज्याची साडी नेसली आहे आणि तिचे वैशिष्ट्य काय आहे?
'कांजीवरम सिल्क'
बजेट २०२६ च्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन तमिळनाडू राज्याची पारंपारिक 'कांजीवरम सिल्क' साडीमध्ये दिसल्या. ही साडी तमिळनाडूच्या प्रसिद्ध हातमाग वारशाचा भाग आहे आणि ती भारतातील सर्वात शाही आणि टिकाऊ साड्यांपैकी एक मानली जाते. यंदा त्यांनी मॅजेंटा आणि जांभळ्या रंगाची हाताने विणलेली कांजीवरम सिल्क साडी नेसली आहे, ज्यावर सोनेरी जरीचे सुंदर काम करण्यात आले होते. साडीचा पदर आणि बॉर्डर अत्यंत आकर्षक होती, ज्यामुळे त्यांना एक प्रतिष्ठित लूक मिळत आहे. अर्थसंकल्पासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रसंगासाठी हा पेहराव अत्यंत समर्पक वाटत आहे.
कांजीवरम साडीचं वैशिष्ट्य काय आहे?
कांजीवरम साड्या त्यांच्या मजबुतीसाठी, जड पोतासाठी आणि शुद्ध रेशमासाठी ओळखल्या जातात. तमिळनाडूतील कांचीपुरम भागात या साड्या हाताने विणल्या जातात. या साड्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्या तयार करण्यासाठी शुद्ध 'मलबेरी सिल्क' आणि सोन्या-चांदीच्या जरीचा वापर केला जातो. एक कांजीवरम साडी तयार करण्यासाठी अनेक दिवस लागतात आणि काही वेळा ती पूर्ण होण्यासाठी दोन आठवड्यांचा काळही लागतो. यामध्ये 'कोरवाई' तंत्राचा वापर केला जातो, ज्यामध्ये साडीची बॉर्डर आणि मुख्य भाग स्वतंत्रपणे विणला जातो, तर पदर 'पेटनी' पद्धतीने जोडला जातो. यामुळेच या साड्या अत्यंत मजबूत असतात आणि अनेक वर्षे टिकतात.
दरवर्षी 'बजेट डे साडी' का खास असते?
निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत आणि या काळात त्यांची साडीची निवड ही एक परंपरा बनली आहे. यापूर्वी २०२५ मध्ये त्यांनी बिहारची लोककला दर्शवणारी 'मधुबनी पेंटिंग' असलेली साडी नेसली होती. ती साडी त्यांना प्रसिद्ध मधुबनी कलाकार आणि पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी भेट दिली होती. दरवर्षी त्यांची साडी भारतातील कोणत्या ना कोणत्या राज्याची कला, विणकाम आणि कारागिरांच्या कष्टाला राष्ट्रीय व्यासपीठावर ओळख मिळवून देते. याच कारणामुळे त्यांच्या साड्या केवळ एक पेहराव नसून भारताच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक बनल्या आहेत.
