कंबर आणि पोट मस्त आकारात दिसावे यासाठी शेपवेअर वापरतात. आता असा शेपर वापरणे अगदी कॉमन आहे. कपड्यांखाली शरीराला सुंदर आकार देण्यासाठी ते मदत करते आणि आत्मविश्वास वाढवते. मात्र याचा योग्य वापर केल्यासच फायदा होतो. चुकीच्या पद्धतीने किंवा अति वापर केल्यास त्याचे दुष्परिणामही जाणवू शकतात. शेपवेअर वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
शेपवेअर वापरताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य साइज निवडणे. खूप घट्ट साईज घेतल्यावर पोट एकदम आत जाते दिसते छान मात्र श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो आणि पोटावर अनावश्यक ताण पडतो. यामुळे ऍसिडिटी, पोटफुगी किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढू शकतात. दीर्घकाळ सतत असा शेपर वापरल्यास कंबर आणि पाठीच्या स्नायूंवरही फारच ताण येतो आणि त्यामुळे पाठदुखी सारखे त्रास सुरु होतात.
शेपवेअर हा केवळ तात्पुरता उपाय आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सतत वापर करून शरीराचा आकार बदलत नाही, फक्त फॅट्स दाबले जातात. त्यामुळे तो फिटनेसचा पर्याय मानता येत नाही. दिवसातून काहीच तास शेपवेअर वापरावा. कायम घालून ठेवण्याची चूक अजिबात करु नका. झोपताना तर चुकूनही शेपवेअर घालू नका. त्वचेवर त्याचा फार भयंकर परिणाम होतो. त्वचा खेचली जाते त्यामुळे त्वचेला इजा होते. तसेच शेपवेअर एकदम घट्ट असल्याने आलेला घाम साचतो आणि त्यामुळे त्वचेला पुरळ किंवा खाज सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शेपर वापरुन झाल्यावर त्वचा स्वच्छ धुणे आणि आरामदायी कपडे घालणे गरजेचे आहे.
एखाद्या खास प्रसंगी साडी, गाऊन किंवा फिटिंग कपडे घालायचे असतील तेव्हा शेपवेअरचा वापर नक्कीच आकर्षक दिसण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण त्याला रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवणे योग्य नाही. शरीराला वेळोवेळी विश्रांती देणे, योग्य व्यायाम आणि संतुलित आहार यांवर भर देणे अधिक फायदेशीर ठरते. योग्य प्रमाणात योग्य वेळेस वापरले तर शेपवेअर हा आत्मविश्वास वाढवणारा सुंदर पर्याय आहे, मात्र अतिरेक टाळल्यासच त्याचा खरा फायदा होतो. नाहीतर शरीराला त्रास होतो.