Experience taste before the rains! | पावसाळ्याच्याआधी जरा चवीची हौस् पुरवा!

पावसाळ्याच्याआधी जरा चवीची हौस् पुरवा!

- कांचन बापट

जू न लागला की डोळे आपोआपच आकाशाकडे जातात. पावसाच्या आगमनाचा महिना. कुठे कुठे पावसाचे हलके रंग दिसायला लागतात, तर कुठे कुठे ऊन अधिकच तीव्र होतं. एकूणच हवा गरमच असली तरी पावसाचे आतुरतेने वाट पाहण्याचे हे दिवस आहेत. अनेक गोष्टी पाऊस सुरू झाल्या की मिळत नाही. त्यामुळे खाऊन घेऊया आता असं म्हणत अनेक पदार्थ केले जातात. असे  काही पदार्थ तुमच्या यादीतही असतील तर आताच करून घ्या.

या आठवडय़ात काय करणार?
मंगळवार
नास्ता- बटाटा पोहे
दुपारचं जेवण- डाळ वांगं, पोळी, भात
रात्रीचं जेवण- ताकातले पोळे
बुधवार
नास्ता- उपरपेंडी
दुपारचं जेवण- पालक पराठे, लसूण रायता
रात्रीचं जेवण- राजमा-भात
गुरुवार 
नास्ता- आंब्याचा शिरा
दुपारचं जेवण- आलू मेथी भाजी, फुलके
रात्रीचं जेवण- साधं वरण-भात, तूप, मीठ, लिंबू, पापडय़ा
शुक्रवार
नास्ता- चटणी सॅण्डविच
दुपारचं जेवण- ज्वारीचे फुलके आणि पिठलं
रात्रीचं जेवण- हिरव्या मुगाची पातळ खिचडी अन् कढी
शनिवार
ब्रंच- मसाला पानगी आणि चटणी
रात्रीचं जेवण- उकडलेले वडे, सांबार आणि चटणी
रविवार
ब्रंच- आलू पनीर पराठा, आंब्याच्या फोडी
रात्रीचं जेवण- कांदाभजी आणि दही-भात
सोमवार 
नास्ता- रवा डोसा
दुपारचं जेवण- पाटवडी रस्सा, पोळ्या अन् भात
रात्रीचं जेवण- भाजणीचं थालीपीठ

हे करून पाहा

ताकातले पोळे
साहित्य : तांदूळ, मेथ्या, मूठभर पोहे, दही/ताक, साखर, मीठ 
कृती : तांदूळ, मेथ्या आणि पोहे, घट्टसर ताकात चार-पाच तास भिजवावेत. बारीक वाटून त्यात मीठ, साखर घालून आठ-दहा तास झाकून ठेवावं. पीठ फुगून आलं की जाडसर पोळे घालावेत. कोणत्याही ओल्या चटणीबरोबर खाता येतात.

डाळ वांगं
खमंग फोडणीत वांग परतून थोडं शिजवून त्यावर मऊ शिजलेलं वरण घालून परतावं. त्यात जिरं, खोबरं, काळा मसाला, गूळ आणि चिंच घालून थोडं गरम पाणी घालावं. मीठ, कोथिंबीर घालावं. डाळ वांगं आमटीसारखं पातळ  नको. जरा दाटच असावं. 

उपरपेंडी
जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात कढीलिंब, दाणे , मिरच्या, भरपूर कांदा परतावा. त्यावर आधी थोडी कोरडी भाजलेली कणीक घालून परतावं. पाणी, थोडं दही, मीठ, साखर, कोथिंबीर घालून शिजवून घ्यावं. वरून किसलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालून खावं. 

आंब्याचा शिरा
नेहमीप्रमाणो शिरा करावा. शेवटी शिरा अर्धवट शिजत आल्यावर त्यात मिक्सरवर फिरवलेला रस घालून पूर्ण शिजवून मग साखर घालून शिजवावं. 

चटणी सॅण्डविच
पुदिना, कोथिंबीर, लसूण घालून हिरवी चटणी करावी. ब्रेडला बटर आणि हिरवी चटणी लावून सॅण्डविच करावं. आवडीप्रमाणे  त्यात काकडी, टोमॅटो, कांदा, बटाटा, टोमॅटो सॉस, चीझ घालता येईल. 

आलू पनीर पराठा
मऊ उकडलेला बटाटा, किसलेलं पनीर, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर अन् मीठ घालून सारण तयार करावं. त्याचे जाडसर पराठे करून तुपा-तेलावर भाजावेत.

रवा डोसा
रवा, थोडीशी तांदूळपिठी, थोडं बेसन, जिरं अन् मीठ घालून पातळ पीठ भिजवावं. थोडय़ा वेळानं अगदी पातळ डोसे घालावेत. 

मसाला पानगी
तांदूळपिठात कसुरी मेथी, लसूण काप, मीठ, कलोंजी घालून पीठ पातळसर भिजवून केळीच्या पानावर पानगी थापून, तव्यावर भाजून नंतर थेट गॅसवर भाजावी. 

वाफवलेले किंवा उकडलेले उडदाचे वडे
उडदाची डाळ 4-5 तास भिजवून अगदी बारीक वाटून घ्यावी. वाटलेल्या डाळीत जिरं घालून त्यावर अगदी कडकडीत गरम तेलाचं मोहन घालून खूप फेटून घ्यावं. आप्पेपात्रत थोडं तेल घालून त्यात हे पीठ घालून त्याचे आप्पे करून घ्यावेत. कमी तेलकट वडे बनतात. यासाठी पीठ मात्र घट्ट असायला हवं. असे वडे  नको असतील तर हे वडे थेट तेलात तळून घ्यावेत.
एखाद्या दिवशी अगदी साधा बेत दिला आहे. छान घोटलेलं साधं वरण, गरम गरम भात, त्यावर तूप, मीठ, लिंबू, एखादं लोणचं आणि बरोबर  कोणतेही तळलेले पापड, पापडय़ा किंवा भाजलेला पापड. असा मेनू सहसा केला जात नाही; पण खूप छान वाटतो.

(लेखिका इंटेरिअर डिझायनर आहे. स्वयंपाक ही त्यांची आवड असून, यू-टय़ूबवर त्यांचं  रेसिपीचं चॅनल आहे.)

kanchan0605@gmail.com

 

 

Web Title: Experience taste before the rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.