An experience about netak | नेटकं नेटक

नेटकं नेटक

- हिमानी नीलेश

 स्थळ : दिवाणखाना, वेळ साधारण रात्री आठची.  मी संपूर्ण तयारी करून माझ्या आवडत्या नाटय़गृहात कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसले होते.  शेवटी एकदाचे 8चे टोले पडतात आणि तो रंगीत पडदा हळूहळू बाजूला सरकू लागतो आणि सुरू होतं  ‘नेटक’.   नेटक हे नेटक म्हणूनच पाहिले पाहिजे. एखादं नाटक कधी प्रोसिनिअम रंगमंचावर होतं तर कधी अंगणमंचावर. कधी कुणाच्या बागेत होतं तर कधी घराच्या इवल्याशा खोलीतही सादर होतं; पण नेटक   हे नाटक नव्हे तर नेटकच आहे हे लक्षात घेऊनच पाहिलं पाहिजे. तीन कॅमे-याचा सेटअप लावून एखाद्या नाटकाचं यच्चयावत तंत्रज्ञांसोबत स्टुडिओमध्ये शूटिंग करणं वेगळं आणि ब्लू टूथ, नेटवर्क, मोबाइल कॅमेरा सेटअप आणि त्यांना जोडणारे एडिटर्स यांच्या बळावर  दोनअंकी नेटक करणं हे वेगळं. विविध शहरात आपापल्या घरात एकाच वेळेस लाइव्ह येऊन विविध  अभिनेत्रींनी हा प्रयोग एकसंधपणे पार पडला हे याच वैशिष्टय़ आहे. या आधीही  अनेक झूम वरील कार्यक्रम आतापर्यंत झाले आहेत.  परंतु झूम वरचा सादरीकरणातील अनौपचारिकपणा काढून व्यावसायिक दर्जाचा नाट्यानुभव डिजिटली देण्याचा प्रयोग हे नेटकचे  वैशिष्ट्य आहे.  
 नेटकची संहिता तेजस रानडे यांची असून ती अतिशय ओघवती आहे. प्रत्येक प्रसंगातले रंग इतके गहिरे आहेत की, कुठलीही अभिनेत्री या संहितेच्या चटकन प्रेमात पडेल. आपसातच त्या अभिनेत्रीची ही भूमिका करू का ती, अशी चढाओढ लागली तरी नवल नाही! इतक्या अभिनयाच्या सढळ आणि काळजाला हात घालणा-या  जागा लेखकानं यात खुबीनं पेरलेल्या आहेत. स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, गौरी देशपांडे यांनी त्या पात्रांना तितकाच न्याय दिला आहे हेही खरंच. त्यातही वंदना गुप्ते या  ‘आणि वंदना गुप्ते’  का आहेत  ते शेवटी दिसतच दिसतं.
आजकाल दुरापास्त झालेलं अस्खलित मराठी ऐकताना, अनुभवताना कान तृप्त होतात. स्रीचे वेगवेगळ्या कालखंडातले प्रश्न नि त्याकडे बघण्याचा सामाजिक नि घरच्यांचा दृष्टिकोन आपल्याला अंतर्मुख करायला लावतो. ते प्रश्न कोणते नि या सर्व गुणी अभिनेत्रींनी ते कसे उलगडले आहेत यासाठी हे नेटक पाहावं लागेल. समोर प्रत्यक्ष प्रेक्षक नसताना किंवा मालिकेच्या शूटिंगसारखा सेटही नसताना समोरच्या कॅमे-यालाच प्रेक्षक मानून, घरालाच रंगमंच मानून कानातल्या ब्लू टूथचं भान ठेवून (रिटेकची संधी नाही हे माहीत असताना) घरातच चोख संवाद म्हणत भावनांचे आलेख चितारत पात्र उभं करणं मुळीच सोपं नाही. घरात उपलब्ध असलेलं नेपथ्य आणि वेशभूषेचा सुयोग्य वापर त्यांनी केला आहे. त्यांना सुयोग्य रीतीने दाखवणा-या महेश लिमये या एडिटरचीपण कमालच. अजित परब यांचं पाश्र्वसंगीत अत्यंत पूरक आहे. मुळात हा घाट घालणंच मला क्रांतिकारी वाटतं. या अशा नव्या आणि क्रांतिकारी प्रकारची रु जवात हृषीकेश जोशींनी केली आहे. हृषीकेश जोशींनी   ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची पुण्याई जशी ‘नांदी’  या नाटकात वापरली होती तशी ती इथेही प्रत्ययास येते. मोग-याचं प्रत्येक फूल त्यानं गज-यात नेटकं ओवून गुंफल्यानं तो मोगरा अधिकच सुगंधित झालाय हे निश्चित. हे मोगरा-गजरा घासून गुळगुळीत झालं असलं तरी लिहायचा मोह आवरला नाहीये. 
पहिल्या आणि दुस-या महायुद्धानंतर नवकाव्य  जन्माला आलं. चित्रं, शिल्पकलेत नव्यानं प्रयोग केले गेले. त्याचं धर्तीवर सध्याच्या कोरोनाच्या काळात मोबाइल रेंज, बॅण्डविड्थ, इलेक्ट्रिसिटी इत्यादी तांत्रिक आव्हानं असताना नेटकने हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी घेतली.


नेटक हा प्रकार यापुढे काय काय वळणं घेईल? नेटकानंतर नाटकाचं समीकरण, अर्थकारण बदलेल का? हे काळच ठरवेर्ल पण नेटक आणि नाटक हे स्वतंत्र कलाप्रकार म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे? नाटकासारखं; ते प्रत्यक्ष नाही! म्हणून जिवंत नाही. तसंच रेकॉर्डेड नाही म्हणून घिसंपिटं किंवा शिळंही नाही. घरातून स्क्रीनवर घडत असल्यानं   त्याच्या मर्यादा अन् बलस्थानंही वेगळी आहेत, हे स्वीकारायला हवं. नाटय़गृहात तिकीट काढून नाटक बघणारी मी एकनिष्ठ मराठी प्रेक्षक आहे. त्या प्रत्यक्ष  अनुभवाची मज्जाच काही और असते हे मला मान्यच आहे. नव्हे, मी त्याची पुरस्कर्ती आहे. रेकॉर्डेड नाटक मला मुळीच आवडत नाही; पण नेटकं, हे या दोहोंच्या मधलं आहे! ते पूर्वमुद्रित नाही किंवा ते प्रत्यक्षही घडत नाही; पण तरीही जिवंतसदृश अनुभव ते तुम्हाला देतं. ते नेमकं कसं होतं? हे अधिकाधिक प्रेक्षकांनी आणि रंगकर्मीनी तिकीट काढून बघायला हवं! 


  मी पाहिलेल्या प्रयोगात तांत्रिक बिघाड झाल्यानं एकदा सोडून दोनदा रसभंग झाला हे खरंच! काहीवेळा पार्श्व्संगीताचा आवाजही मोठा होता. तरी तांत्रिक त्रुटी नसलेला प्रयोग किती भारणारा असू शकतो याची मी कल्पना निश्चितपणे करू शकते; पण प्रयोग एकासारखा दुसरा नसतो. तो खुलूही शकतो व आपटूही शकतो; पण कुठलीही नवी कल्पना रुजून मोठी व्हायला वेळ लागतोच. ही सर्व माझी वैयक्तिक मतं झाली. दुस-याच टोकाची मतं असण्याचा संभव अभिनवतेच्या ठायी असतोच. तांत्रिक त्रुटींकडे काणाडोळा करू शकू इतकी चांगल्या दर्जाची संहिता, दिग्दर्शन, संगीत, अभिनयाची आणि या अभिनव प्रयोगाची मी साक्षी होऊ शकले ते त्याच्या नियोजकांमुळे. त्यासाठी मेलबॉर्नस्थित ‘लास्ट मिनिट प्रॉडक्शन’चे आभार मानायला हवेत. अँडलेडमध्ये मी द्राक्षाच्या मळ्यातील नाटक पाहिलंय, तूर्तास बांधलेल्या समुद्रातल्या जेट्टीच्या आकाराच्या मंचावरच नाटक पाहिलंय त्या अप्रतिम प्रयोगांबद्दल मागे मी या लेखमालेत लिहिलंही होतं; पण भारतात निरनिराळ्या शहरांमधून एकाचवेळी लाइव्ह होणा:या प्रयोगाची साक्षीदार मी इथे अँडलेडमध्ये बसून होऊ शकले ते केवळ नेटक मुळेच.

(अँडलेडच्या प्लेफोर्ड लायब्ररीत कार्यरत असलेल्या लेखिका दीर्घकाळ ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहेत)

himaninilesh123@gmail.com

 

 

Web Title: An experience about netak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.