Easy home makeup options in the rush of Diwali | दिवाळीच्या घाई गर्दीत घरच्या घरी मेकअपचे सोपे पर्याय

दिवाळीच्या घाई गर्दीत घरच्या घरी मेकअपचे सोपे पर्याय

-प्रतिनिधी

दिवाळी आली की जरा फ्रेश दिसावं, प्रसन्न वाटेल आपल्यालाच म्हणून जरा आपलेच लाडकोड करावेत असं अनेकींना वाटतं. दरवर्षी दिवाळीच्या आधी बऱ्याच जणी पार्लर गाठून फेशियल करणं, नवीन हेअरस्टाइल करणं असं वेळात वेळ काढून करतात; पण यंदा कोरोनाचे भय, ते घराबाहेर जाऊ की नको अशा द्विधेत ढकलतं. पार्लरला जावं तरी काळजी, नाहीच गेलं तर आपला अवतार बरा दिसत नाही असं वाटतंच. त्यावर घरच्या घरी काही करता येईल का? तसाही यंदा सगळा ट्रेण्ड हॅण्डमेडचा आहे. पर्सनल टचचाही आहे. मग जर अनेकजणी उटणं घरी करणं, साबण बनवून पाहणं असे उपक्रम करत असतील तर मग जरा आपल्या मेकअपलाही थोडा घरगुती ट्रायआऊट दिला तर..


हे करून पाहा..

१. डीप क्लिनझिंग त्वचेसाठी फार आवश्यक आहे. त्यानं त्वचेवरील छिद्र मोकळे होतात. चेहऱ्यावरचा न दिसणारा मळ, तेलकटपणा कमी होतो. उत्तम फेसवॉश, क्लिनझिंग मिल्क त्यासाठी वापरू शकता.

२. टोनर्स सध्या भरपूर मिळतात. जरा माहिती घेऊन, आपल्या त्वचेला साजेसा टोनर आणता येईल. काहीच नाही तर गुलाबपाणी लावलं तरी चालतं.
३. थंडी आलीच आहे, आता आधी उत्तम मॉइश्चरायझर वापरा. त्यासाठी पैसे खर्च झाले तर चालतील; पण दर्जात हयगय करू नका.

४. आय मेकअपची सध्या फॅशन आहे, मात्र आयमेकअपचं साहित्य विकत आणताना, आपल्या डोळ्यांचा आणि त्वचेचा रंग, पोत याचा अभ्यास करा आणि मग मेकअप करा. शक्यतो, भडक आयमेकअप टाळा.


५. मस्करा लावणारच असाल तर त्याचं सूत्र एकच, जाड पापण्या असतील तर ब्राऊन मस्करा वापरा आणि बारीक असतील तर काळा वापरणं उत्तम.

६. सगळ्यात सोपं म्हणजे उत्तम आयलायनर वापरणं. फार प्रयोग करायचे नसतील तर ब्राऊन किंवा काळा आयलायनर वापरणं उत्तम. नाहीतर कलर काजळही वापरलं तरी छान बदल दिसेल.

Web Title: Easy home makeup options in the rush of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.