Crisis in front but mind become numb .. why this happen? | समोर संकट पण मन सुन्न.. हे असं का? 

समोर संकट पण मन सुन्न.. हे असं का? 

ठळक मुद्देकोरोनाकाळात मानसिक अनारोग्याच्या या विषाणूशी तुम्ही कसे लढता आहात? : लेखांक 2

 -डॉ. राजेंद्र बर्वे 

‘बॉस’  म्हणजेच   ‘बर्नआउट स्ट्रेस सिंड्रोम’. म्हणजेच दीर्घकालीन तणावामुळे चैतन्याचा  -हास होणं. या कोविड 19 च्या काळातल्या मानसिक अवस्थेचा अधिक सखोल विचार करणं महत्त्वाचं आहे. या   ‘बॉस’ला गाडून टाकायचं आहे, या शत्रूचा पाडाव करायचा आहे तर मग त्याच्या स्वरूपाचं नीट विश्लेषण करणं आवश्यक आहे. या दीर्घकालीन तणावाचा शरीर आणि मनावर होणारा विपरित परिणाम आहे. याचा अर्थ तणावग्रस्त परिस्थितीला मन आणि शरीर कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देतं आणि त्या प्रतिक्रियांच्या सातत्यामुळे चैतन्यहीन  वाटू लागतं. 

तणावाला शरीर आणि मन कशी प्रतिक्रिया देतं हे अभ्यासायला हवं. आधुनिक मेंदू विज्ञानानं त्याच्यावर अतिशय सुबक आणि शास्त्रीय संशोधन केलं आहे. कुरूक्षेत्रवर धर्मयुध्दासाठी उभ्या ठाकलेल्या अर्जूनाला  अशाच कमालीच्या तणावाचा सामना करावा लागला होता.  आपल्या आप्तेष्टांना समोर पाहून अर्जून म्हणतो, माझी गात्रं, शरीर गोठलं आहे. तोंडाला कोरड पडली आहे. शरीर कंप पावते आहे. अंगावर काटा आलाय. माझे प्रभावी धनुष्य हातातून गळून पडते आहे. माझा आत्मविश्वास संपला आहे आणि शरीराचा दाह होतो आहे. आणि मन तर संभ्रमित होऊंन भरकटतं आहे. 
अर्जूनाची अशी अवस्था होण्याचंकारण आपण युध्द करावं की करू नये याबाबतीत संभ्रमित झालेलं त्याचं मन भरकटू लागलं.  गतकाळातील दृष्ट आठवणी आणि भविष्यातील संभाव्य संहार या दोन टोकाच्या विचारात तो दोलायमान झाला. पुढे श्रीकृष्णानं त्याला उपदेश करून युध्दाला सज्ज  केलं . 
आपलंही आपत्तिजनक परिस्थिती निर्माण झाली की नेमकं असंच होतं. क्षणार्धात भवती उभं ठाकलेलं संकट जाणवलं की हातपाय गारठतात. बोबडी वळते, घाम फुटतो आणि विचारांच्या कल्लोळानं मन सुन्न होतं. असा अनुभव प्रत्येकानं कधी ना कधी तरी घेतलेलाच आहे. परंतु अशी शारीरिक आणि मानसिक विकल अवस्था कशी होते, का होते आणि तिचं पुढे काय होतं? याची उत्तरं मनोविज्ञान आणि शरीरक्रिया शास्त्रानं अचूकपणे शोधली आहेत.
संकटकाळात आपण विकल का होतो?
* संकट उभं ठाकलं असता, आपलं शरीर काहीतरी अँक्शन घ्यायला उद्युक्त होतं.  हदयाची गती आणि रक्ताभिसरणाचा जोर वाढतो. पाय आणि  बाहुंकडे रक्तप्रवाह धाव घेतो. शरीरातल्या इतर अवयवांचं काम शिथील होतं. अशावेळी मनापुढे एकच उद्दिष्ट असतं. जीव वाचवा. मग त्यासाठी प्रतिहल्ला करा. संकटाला जाऊन भिडा आणि ते नमवा किंवा जीव वाचवण्यासाठी पळ काढा. याला इंग्रजीत   ‘फाईट अथवा फ्लाईट ’असं म्हणतात. यशस्वी माघार हा निर्णय त्वरेनं, क्षणार्धात घेण्यासाठी मन स्थिर, अचल आणि अचूक निर्णयासाठी सिध्द असावं लागतं. ही फाइट आणि फ्लाइट प्रतिकिया अमीबापासून प्रगत माकडार्पयत आढळते. आपल्या मेंदूतही तशीच संरचंना  आहे. परंतु इतका त्वरित निर्णय घेऊन तो क्षणार्धात तडीस नेणं एकेकाळी शक्य असलं तरी आधुनिक काळात ते शक्य नाही, कारण सामना करणं अथवा यशस्वी माघार या दोन्ही पर्यायांचे फायदे तोटे उघड दिसतात. आणि मन अर्जूनाचं झालं त्याप्रमाणे दोलायमान होतं. दंद्वात अडकतं.
* इमोशनल इंटिलिजन्स  समजून घेणं महत्वाचं आहे कारण आपल्याला बॉसचा पराभव करायचा आहे. शरीराला अँक्शन घेण्याकरता ( पळण्याची अथवा लढण्याची) सज्ज करणारी संप्रेरकं मेंदू नियोजित करतो. ही संप्रेरकं अतिशय महत्त्वाचे बदल घडवतात. यांनाच  ‘स्ट्रेस हार्मोन ’असं म्हणतात.
* या संप्रेरकाची शक्ती अफाट असते. पण त्याचं नियंत्रण तितकंच महत्त्वाचं असतं. बचाव करणं आणि जीव वाचवणं या एकाच उद्दिष्टानं शरीर , मन, मेंदू यांचं त्याक्षणी कार्य चालू असतं. पण फाइट की फ्लाईट याचा निर्णय घेणं इतकं कठीण होतं की त्या गोंधळलेल्या अवस्थेत तिसरी प्रतिक्रिया आपोआप उद्भवते, ती म्हणजे भयग्रस्त होणं. भयग्रस्तता ही इतकी जबरदस्त भावना असते की त्यामुळे मेंदूची विचार करण्याची क्षमता, सामर्थ्य गोठून जातं. भावनांची विचारांवर जबरदस्त पकड बसते. काही सुचेनासं होतं. आणि हळूहळू  शारीरक्रिया उत्तेजित राहातात. हातपायांना शक्ती येण्याऐवजी ते गोठून जातात. आपण हतबल होतो.  आपण त्या संकटाच्या भीतीमुळे निर्बल होतो. मन भूत आणि भविष्यात भटकत राहातं. आणि  भीतीच्या पोटी आपण निर्णय घेऊ लागतो.  आपल्यावर आलेल्या कोरोना संकटातून कसं निभावून जायचं याचं सर्वसामान्य माणसाला उत्तर सापडत नाहीये. कारण तो भयग्रस्त आहे. 


तात्कालिक संकट दीर्घकालीन  का होतं?
* संकट क्षणोक्षणी वाढते आहे. दिशा सापडत नाहीये. याचं महत्त्वाचं एक कारण आपल्यावर सातत्यानं होणारा तथाकथित माहितीचा भडिमार. माहिती खरी,  हेतूपुरस्कर, खोटी किंवा अफवा अशा स्वरूपात असते.  नवनवे मृत्यूचे आकडे पाहिले की हातपाय गळून जातात. आपल्या तत्कालिन संकटाचं दीर्घकालीन संकटग्रस्ततेत रूपांतर होतं.
* म ग बॉसचा इतका त्रस का होतो? केवळ भीतीमुळे? आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सवर कमालीचा ताण पडतो. ही संप्रेरकं असतात पण त्या संप्रेरकांचा अतिरेक होतो. आपण उत्तेजित अवस्थेत राहातो. संकट तर दूर होतंच नाही आणि काही अँक्शनही घेतली   जात नाही. या शारीरिक परिस्थितीमुळे अंगातले त्रण अथवा चैतन्य आटू लागतं.  नाही मनोबल आणि नाही शारीरिक सामथ्र्य. यालाच  ‘बॉस’  म्हणतात. यापूर्वीच्या लेखातल्या प्रत्येक केसमध्ये हीच हतबलता जाणवते.  तुमच्याही मनाला तेच नैराश्य ग्रासलेलं आहे. 
* ही अवस्था केवळ  मानसिक  नाही, शारीरिक आहे. मोबाइलची बॅटरी डाऊन होते त्याप्रमाणो आपली शक्ती, जगण्याची , चिवटपणे लढण्याची क्षमता कमी होते आहे. 
ताण आणि दीर्घ श्वसन
निराशा निर्माण करणारी ही माहिती वाचून तुमचा तणाव वाढतोय का? तसं असेल तर थांबा, एक  दीर्घश्वास घ्या आणि हलकेच हळू हळू  सोडा. असं दीर्घ श्वसन दोनचार मीनिटं करा म्हणजे तुमची मानसिक स्थिती सुधारते आहे. मन शांत होत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव   तुम्ही घ्याल. 
या उपायावर सखोल विचार पुढील लेखात करणार आहोत. परिस्थीती कठीण आहे, पण हाताबाहेर गेलेली नाही. अवसान उसनं आणायला नको. ते आपल्या श्वासातच आहे. आपल्या मालकीचं आणि हक्काचं आहे . कारण आपल्या श्वासात ही विलक्षण ताकद आहे. पूर्ण आशावादी आणि प्रागतिक आहे, याचा निर्वाळा देतो आणि थांबतो. क्षणस्थ राहाणं, पूर्ण भानात  असणं, माइंडफुलनेस म्हणजे काय, या परिस्थीतीत ध्यानधारणोचे गरज याबाबत सविस्तर पुढील लेखात. 

-----------------------------------------------

नैसर्गिक ताकद आणि दोष

महामारी अथवा साथीच्या रोगात नेहमीच पुरूषांची मृतसंख्या अधिक असते. कारण त्यांचा वावर बाह्य जगात अधिक असतो. स्त्रियांचा वावर मर्यादित असल्यानं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे निसर्गानं महिला वर्गाला अधिक चिवटपणा बहाल केला आहे.  केवळ स्वत:ला नव्हे तर आपल्या मुलाबाळांना, कुटुंबाला वाचवलं पाहिजे या ध्येयानं प्रेरित होऊन सामर्थ्य टिकवण्याची क्षमता स्त्रियांमधे पुरूषांपेक्षा अधिक असते. त्या अधिक जबाबदारीनं आरोग्याची काळजी घेतात. परंतु स्वत:च्या बळकटपणावर त्यांचा विश्वास कमी असतो. आपण परिस्थितीचे बळी आहोत, व्हिक्टिम आहोत असं मानण्याचा त्यांचा कल असतो. यातून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली की त्या प्रबळ होतात. 

(क्रमश:)


( लेखक प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ आहेत.) 

drrajendrabarve@gmail.com

 

Web Title: Crisis in front but mind become numb .. why this happen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.