Crafting means intellectual expression of artists. | हस्तकलेचे देखणे प्रवाह म्हणजे बौद्धिक आविष्कार !

हस्तकलेचे देखणे प्रवाह म्हणजे बौद्धिक आविष्कार !

- सुभाषचंद्र वाघोलीकर

भारत हा हस्तकलांचा स्वर्ग. आपल्या इतिहासातील सर्वात प्राचीन पर्व म्हणजे सिंधू-सरस्वतीच्या खोऱ्यात फुललेली द्रविड संस्कृती, तेव्हापासून भारतीय हस्तकलांच्या विकासाचे पुरातत्वीय पुरावे जगासमोर आहेत. अग्रस्थानाचा मान भारतीय हातमाग वस्रांचा राहिला आहे. हातमागाचे आणि त्यावर बनणाऱ्या विणीचे अक्षरश: हजारो प्रकार भारतीय कलाकारांनी निर्माण आणि जतनही केले. औद्योगिक क्रांतीचा हल्ला आणि पाताळयंत्री वसाहतशाही राजवटीनं घडविलेला विध्वंस यामध्ये भारतीय हस्तकला जायबंदी झाल्या तरी जीव धरून राहिल्या; हे अतीव अभिमानास्पद! मात्र आपल्या समाजव्यवहारांमध्ये हस्तकलानिर्मितीचा शब्दांनी गौरव करताना हस्तकलाकारांचा आपण आदर करतो असं फारसं घडताना दिसत नाही.

हस्तकलांचे निर्माते हे तर केवळ कारागीर आहेत, अशीच एकूण समजूत. म्हणजे एक विशिष्ट कौशल्य तेवढंं त्यांनी मिळविलं आहे एवढंच, असं सुचविलं जातं. हस्तकला हा बौद्धिक आविष्कार आहे हे आपल्याला जणू पटतच नाही! कोणत्याही हस्तकलेतील मूळ साहित्यद्रव्याची उपज आणि त्याला हस्तसंस्कारानं मिळणारा आकार, रंग, रूप, स्पर्श आदी गुणांची अनुभूती ज्यानं घडताना स्वीकारली आहे त्याला मात्र हे पटेल की हा कलाकारसुद्धा उच्चश्रेणीचे आविष्करण करीत असतो. त्या आविष्करणातील वैचारिकता रसिकाला कळते, पण तिची श्रेणी आणि भाषा वेगळी, अपरिचित असल्यामुळे रसिकाला ती शब्दात पकडणं अवघड जातं. याचा अर्थ तेथे वैचारिकता नसतेच किंवा असली तरी दुय्यम श्रेणीची असते, अशी समजूूूत करून घेणं हा अडाणीपणाच!

वस्तुत: बुद्धिवंत हा आपल्या मेंदूतील तर्कशक्ती वापरून सर्जन करीत असतो तर कलावंत आपल्या मनाच्या डोळ्यांनी विषयद्रव्याचं आकलन करून भावात्मकनिर्मिती करतो. त्याची निर्मिती रसिकांनी मुख्यत्वे मनाच्या इंद्रियांनीच जाणायची असते. मनाचं इंद्रिय बंद असेल तर त्याला तो अनुभव कसा यावा? चरखा चालवताना होणार्‍या ध्वनीमध्ये गांधीजींना दिव्य संगीतानुभव मिळू शकला हे अनेकांना पटत नाही, कारण त्यांचे मन:चक्षू तो अनुभव ग्रहण करण्यास तयार नसतात. संगीत, चित्र, शिल्प, काव्य या कलांप्रमाणेच पैठणी वा हिमरू किंवा पटोला किंवा इकत या वस्रनिर्मितीत कलाकार एक भावानुभव व्यक्त करीत असतो. या भावानुभवात आणखी अडथळा असतो, तो म्हणजे कला ही एका व्यक्तीनं(च) घडविलेलं प्रतिभेचं आविष्करण असतं आणि असलं पाहिजे असा आडमुठा आग्रह. कलाविष्काराचा हा व्यक्तिवादी सापळा आपण पाश्चात्त्यांकडून उसना आणला आहे. त्यामुळे कला, विशेषत: हस्तकला ही अनेक हातांची आणि पिढ्यान‌् पिढ्यांची निर्मिती असते हे टीकाकार समजून घेत नाहीत. युरोपातील अमुक प्रार्थना मंदिरातील चित्रनिर्मिती अमुक चित्रकारानं केली असं सांगता येतं.. कैलास मंदिराची निर्मिती करणाऱ्या कलाकारांपैकी एकाचंही नाव आपल्याला ठाऊक नाही.

भिन्न समाजांच्या रिवाजांमध्ये लक्षणीय फरक तर आहेच, कलानिर्मितीच्या प्रक्रियेचं आकलनही भिन्न आहे. आपली लोककला ही समूहाची निर्मिती आहे. कलानिर्मितीच्या प्रक्रियेत तात्कालीक फॅड किंवा फॅशन यांची भेसळ न होता नवनिर्मितीचा मंद प्रवाह अव्याहत वाहात राहिला आहे तो यामुळेच. ही गोष्ट त्या हस्तकलाकारांना जशी ललामभूत असेल तशीच त्यांचा ऊर्जास्रोत बनलेल्या समाजाला गौरवास्पद आहे.

औरंगाबादचे अहमद सईद कुरेशी हे प्रचार आणि प्रसिद्धी यापासून इतके दूर राहिले आहेत, की पत्रकार अनंत भालेराव यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे यंदाचे मानकरी म्हणून त्यांची निवड जाहीर झाली तेव्हा अगदी औरंगाबादमध्येसुद्धा बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं. हिमरू शालीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी उमरभर केलेल्या कामामुळे (आजचं वय ७८ वर्षे) इतिहासाच्या पानावर सोन्याच्या तेजानं झळाळलेल्या औरंगाबाद शहरानं नव्यानं वैश्विक पटलावर आपली ओळख प्रस्थापित केली. एका प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं झालेला त्यांचा सन्मान हा सर्वच भारतीय हस्तकलाकारांचा आणि विशेषत: वस्रकलेचा गौरव आहे!

( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: Crafting means intellectual expression of artists.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.