Conflicts with spouse in Sixty.. | साठीच्या सहजीवनातले अवघड पेच.

साठीच्या सहजीवनातले अवघड पेच.

(नुकताच एका खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठानं 60 वर्षाच्या जोडप्याला घटस्फोट घेऊन वेगळं राहण्याची अनुमती दिली आहे. जर  हे दोघे एकमेकांसोबत राहू इच्छित नसतील आणि वेगळं झाल्यानंतरच त्यांना जगण्याचा आनंद मिळणार असेल तर ते वेगळे होऊ शकतात, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. घटस्फोट घेण्याचं हे काही वय आहे का? 
- असा प्रश्न करणं सोपं, पण या घटनेत त्याहूनही अधिक काही आहे! लग्नानंतरच्या सहजीवनावर चर्चा होते, पण प्रौढत्त्वातलं, साठीनंतरचं सहजीवन मात्र चर्चिलं जात नाही. वयाच्या या टप्प्यातली जोडपी एकमेकांना आणि समाजही त्यांना गृहितच धरत असतो.  सर्वोच्च न्यायालयाच्या या ताज्या निकालामुळे प्रौढ जोडप्यांचं सहजीवन, वयाच्या या टप्प्यात नवरा बायकोतले संघर्ष, तडजोड, 
घुसमट हे मुद्दे चर्चेचे विषय ठरले आहेत. या निमित्तानं...)

 

--------------------------------------------------------------------------------

 

-नीलिमा बोरवणकर

हे काय? इस्री नसलेला टेबलक्लॉथ कुणी घातला? आणि वेगवेगळी क्रॉकरी? कुणाचं आहे हे काम?’ नव-या  चा चढलेला आवाज ऐकून ती स्वयंपाकघरातून बाहेर आली.
‘कशाला ओरडताय?’
‘असलं शॅबी टेबल कुणी मांडलंय?’
‘दुसरं कोण? मीच की.’
‘तू? इतकं वाईट?’
त्याच्या चढलेल्या आवाजाच्या वर आवाज चढवून ती म्हणाली, ‘करा मग स्वत: इस्री, काढा हवी ती क्रॉकरी. सतत आपल्या ऑर्र्डस सोडायच्या. हलावं जरा स्वत:.’
‘कॅप्टनला ऑर्र्डस देणं माहीत. अख्खा स्टाफ ऐकतो माझ्या ऑर्र्डस.’
‘बोटीवर दाखवा काय तो रूबाब. स्टाफला त्यासाठीच पगार मिळतो. आणि आता तिथे तरी कोण ऐकणार आहे? पद आहे तोवर मान आहे. निवृत्त झाल्यावर नाही. हे घर आहे. शिवाय मी नोकर नाहीये तुमची.’ झालं. दिवस सुरू झाला तोच अशा वादविवादांनी. इतकी वर्षं बोटीवरची नोकरी, वर्षातून तीन-चार महिने घरी. तेवढे दिवस बायको त्याच्या मनासारखं वागायचा प्रयत्न करायची. मुलं पण बाबाच्या आवतीभोवती. बोटीवर रूबाब, घरी आल्यावर जणू एखादा पाहुणा आल्यासारखं कौतुक. 
निवृत्त होऊन कायमचं घरी आल्यावर मात्र परिस्थिती एकदम बदलून गेली. एकतर मुलं स्वतंत्र झालेली. नोकरी, संसारात व्यस्त. घरात साठी उलटलेले नवरा-बायको दोघंच. पहिले काही महिने फिरण्यात, नाटकं, सिनेमे बघण्यात, नातेवाईक-मित्रांना भेटण्यात गडबडीत गेले. नव्याची नवलाई ओसरल्यावर मात्र दोघंच घरात असणं अंगावर यायला लागलं.
ही फक्त या जोडप्याची कहाणी नाही. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीनुसार ही कहाणी आता ज्येष्ठ नागरिक वयोगटातल्या असंख्य जोडप्यांची होत चालली आहे. नोकरी, मुलांच्या शाळा, महाविद्यालय, परीक्षा, करिअर, लग्नं अशी धावपळीची वर्षे बघता बघता सरतात. ‘सकाळी हातात पेपर घेऊन निवांतपणे वाचत बसायचं’ अनेक वर्षं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याचा क्षण येऊन ठेपतो, आणि आतापर्यंतचं आयुष्य एकदम बदलून जातं. प्रेमलग्न असो वा ठरवून केलेलं. 
लग्न म्हणजे प्रेम आणि भरपूर प्रमाणात तडजोड. सुरुवातीचे आकर्षणाचे, नव्या नवलाईचे दिवस संपले आणि प्रत्यक्ष संसार सुरू झाला की नवरा-बायको एकमेकांना ओळखत जातात. स्वभाव कळत जातो. ‘दो जिस्म मगर एक जान हैं हम’ हे गाणं अतिशय गोड असलं तरी प्रत्यक्ष आयुष्य इतकं  फिल्मी असत नाही. दोन शरीरं असतात तशी मनंसुद्धा दोन वेगवेगळी असतात. स्वभाव, विचार करण्याची पद्धत निराळी असते. एकजण रागीट असेल आणि दुसरा शांत असेल तर संसार शांततेनं सुरू राहतो. दोघं रागीट असले तर स्वयंपाकघरात भांड्यांचा खणखणाट अंमळ जोरजोरात होत राहतो.
 मनुष्य स्वभावाचे हजार नमुने. एखादा दिलदार, कुणी पै पै साठवणारा, एक शास्त्री य संगीताचा शौकीन, कुणाला डोंगर चढायची आवड. जोपर्यंत माणूस एकटा असतो तोपर्यंत तो आपापली आवड जोपासू शकतो, प्रश्न उभे राहतात ते दुकटं झाल्यावर. 
दोघांच्या आवडी एकच असल्या तरी त्या दोघांना जोपासता येतात ते एकमेकांमध्ये समजूतदारपणा दाखवता आला तरच. म्हणजे नवरा-बायको दोघांनाही गिर्यारोहणाची आवड आहे. मात्र घरच्या, मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडत दोघं एकत्न हिमालयात गिर्यारोहणाला जाऊ शकतात का? अशावेळेस पुरुष मनात आलं की जाणार आणि बायकोनं जायचं म्हटलं की मुलांची जबाबदारी घेताना टाळाटाळ करणार असेल तर संघर्षाची वेळ येणारच. संसार करताना संघर्षाचे प्रसंग असे क्षणोक्षणी उद्भवत असणारे. त्याला दोघं कसे सामोरे जातात यावर संसारातली शांती अवलंबून. पण तरी सुरुवातीची वर्षं संसार उभा करण्यात, मुलांना वाढवण्यात, मधली वर्षं मुलांच्या शिक्षणात, पैसा उभा करण्यात जातात. पन्नाशीच्या टप्प्यावर मुलांची लग्नं होतात. दिवस, महिने, वर्षं धावपळीत जात राहतात.
नवरा त्याच्या नोकरी-धंद्यात व्यस्त होत जातो. कुणी वरची पदं मिळवत अधिक जबाबदा-या  खांद्यावर पेलत यशस्वी होतो, कुणी सामान्यच राहतो. बायको नोकरी करत असल्यास तारेवरची कसरत करत जगत असते. येणार्‍या अडचणी, अवघड प्रसंग दोघं मिळून निभवत असतात. भांडणं, रूसवे-फुगवे येतात -जातात. 
या सा-या  धावपळीच्या वर्षांत नवरा-बायकोचं नातं कसं रुजत-फुलत जातं त्यावर पुढची वर्षं कशी जाणार ते ठरत असतं. ही वर्षंं सहमतीनं, परस्परांचा विचार करून गेली असली तर निवृइत्तीनंतरचं आयुष्यसुद्धा शांतपणे जाऊ शकतं. ज्येष्ठ नागरिक संघात सहभाग, देश-विदेशातल्या सहली, मित्र- नातेवाइकांना भेटणं, मुलांकडे अधूनमधून मुक्काम, दूरदर्शन वाहिन्यांचे असंख्य प्रकारचे कार्यक्रम, असं सगळं करत खरं तर आयुष्य आरामात जाऊ शकतं. पण हाताशी पैसा असून, अनेक सोयीसुविधा असूनही आज अनेक जोडप्यांतला विसंवाद वाढताना दिसतोय. साठीनंतरही घटस्फोट होताना दिसतंय. ‘मुलांचा विचार करून इतकी वर्षं एकत्न काढली, आता मुक्त व्हायचंय,’ असं म्हणत वकिलांचा सल्ला घ्यायला येणारी भरपूर जोडपी आहेत असं कौटुंबिक न्यायालयात वकिली करणार्‍या  अँड. सुफला ताटके म्हणाल्या. तेव्हा माझी पहिली प्रतिक्रि या होती, ‘ऐन तारुण्यात ठीक आहे, तुम्ही नव्यानं आयुष्य सुरू करू शकता. आता हत्ती गेलं शेपूट राहिलं, अशा वयात घटस्फोट घेऊन करणार तरी काय?’
माझ्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘आम्ही हाच सल्ला देतो. वय वाढलं की दुखणी उद्भवणार, जोडीदारानं सेवा केली नाही तरी किमान डॉक्टरला फोन करायला घरात दुसरं माणूस तरी असेल.’ पण एकमेकांची सोबत इतकी नकोशी झालेली असते, की त्या एका क्षणासाठी नकोशा जोडीदाराला सहन करणं नको वाटतं. व्यसन, मारहाण यासारखी टोकाची कारणं असतील तर तारुण्यातच वेगळं होण्याचा निर्णय घेतला जातो. फक्त मतभेद असतील तर आले दिवस नुसते ढकलले जातात, आणि ते मतभेद पुढे मनभेदात बदलतात. तारुण्यात भांडणं, वादविवाद झाले तर किमान ते शय्यागृहात मिटतात. शरीर जवळीक भांडण मिटवण्यासाठी अत्यंत उपयोगाची ठरते;  पण वाढत्या वयात शारीरिक गरज कमी होत जाते तशी दुरावलेली मनं सांधायला उपायच राहत नाही.
कारणं छोटी-छोटी असतात. पुरुष नोकरीनंतर एकटा पडत जातो. बाहेर रूबाब दाखवायची सवय, आता घरात बायकोवर दाखवायला गेला तर ती बिलकुल सहन करत नाही. तिनं आयुष्य नवरा-मुलं-घराभोवती बांधलेलं असतं, आता ती स्वत:चं विश्व तयार करू बघते. बायका पत्ते खेळतात. भरतकाम, वीणकाम, भजन अशा वर्गांंना जातात. नवरा घरी आणि ती बाहेर रमलेली हे वादाचं प्रमुख कारण. मग ती म्हणते, ‘घरी बसून तुमचं ऐकून घेण्यापेक्षा मी बाहेर मजा करते.’ 
कधी सतत नवर्‍याची हुकूमत सहन करणारी बायको म्हातारपणात अचानक आक्र मक होते. ‘तुमच्या बदल्यांमुळे मला काहीच करता आलं नाही’ वगैरे बोलून नव-याचा पाणउतारा करायची संधी शोधत राहते. 
दूरदर्शनवर मालिका बघायच्या की बातम्या, इतक्या लहान कारणांनीसुद्धा वाद होतात. मग उच्च मध्यमवर्गीय घरात दुसरा संच घेतला जातो. बायको तिचे कार्यक्र म बघते, तो त्याचे. संवाद म्हणजे नुसते वाद असं व्हायला लागलं की हळूहळू बोलणं बंद होतं. दूरदर्शन बघत जेवणं उरकली जातात. 
मुलं बाहेर पडलेली असली की मुलांची खोली रिकामी असते, मग कित्येक जोडपी वेगवेगळ्या खोल्यात झोपू लागतात. सप्तपदी चालताना एकत्न राहण्याची घेतलेली शपथ फक्त शब्दश: पाळली जाते. दुर्दैवी असलं तरी आजच्या असंख्य ज्येष्ठ नागरिक जोडप्यांचं हे वास्तव आहे. शांताबाई शेळके यांचं ते गीत उगाच नाही अजरामर झालंय.
‘सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे?
मीही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे?’

(लेखिका मुलाखतकार आहेत)

borwankar.neelima@gmail.com

 

 

Web Title: Conflicts with spouse in Sixty..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.