Central Market: - Adled's Mandai | सेंट्रल मार्केट :- अँडलेडची मंडई 

सेंट्रल मार्केट :- अँडलेडची मंडई 

- हिमानी निलेश नमस्कार मंडळी ! मी हिमानी निलेश. मूळची पुणोकर. पुण्यात असताना तशी मी थोडी थोडी माहिती होते कुणाकुणाला. म्हणजे बाल कलाकार म्हणून ‘एक होता विदूषक’मध्ये काम केलं होतं. पुढे  पुणो विद्यापीठातून नाट्यशास्त्र आणि मानसशास्त्र  अशा दोन पदव्या घेतल्या. मग पुण्या-मुंबईत नाटक आणि मालिकांमधून थोड्या प्रमाणावर काम करू लागले.  श्रेयस तळपदे बरोबर  ‘एक होता राजा’ नामक मालिकेत लीड रोल केला. त्या भूमिकेसाठी प्रतिष्ठेचे सन्मान मिळाले. आता हे धड करायचं की नाही? पण म्हणतात ना;व्हेन यू आर बिझी मेकिंग प्लॅन्स; लाईफ हॅपन्स. - मी लग्न केलं निलेश पाठोपाठ माझी स्वारी काही महिन्यातच ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. कापूस भरल्या ढगांच्या  दुलईतून खाली पाय ठेवला तोच अँडलेड या देखण्या शहरात. आता इथे मूळ रुजवून आम्हाला बारा वर्ष झालीयत . बदल होता, आव्हान होती, स्वप्न होती. नि. पंख होते  हवा, भाषा,अन्न, माणसं सगळंच तर बदललं होतं. इथे आम्ही मनसोक्त मुशाफिरी केली. ती करताना माङया बरोबर सतत होती माझी जिवाभावाची सखी अँडलेड डायरी. म्हणूनच डायरीतली मोरपीस घातलेली पानं तुमच्यासाठी उलगडायचं ठरवलंय.त्यात आहेत रंगीबेरंगी अनुभव, माणसांचे , ऐतिहासिक जागांचे खाद्यजत्नेचे नाटकांचे आणि कशाकशाचे.डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलंय सेंट्रल मार्केट. बारा वर्षपूर्वी इथे आले तेव्हा नव्याने संसार थाटण्याचा उत्साह मोप. मग खरेदी करणं आलंच. पहिल्याच दिवशी आम्ही गाठलं ते सेंट्रल मार्केट. पुण्याहून जाताना नेलेल्या भाजण्या, पीठं आणि मसाल्यांच्या जोडीने घरात ऑस्ट्रेलियन चवी यायला सुरु वात झाली होती. नव्या देशातलं नवं पीठ-मीठ!तिथे पाय ठेवताच अचानक चुरचुरती हवा नाकात शिरली आणि अनेक रंगा-गंधांच्या स्पर्शाने मी एकदम ताजीतवानी होऊन गेले. एक प्रकारचं चैतन्य संचारलं म्हणाना! तांबड्या हिरव्या पिवळ्या नारिंगी इंद्रधनू रंगाची लुसलुशीत ताजी टवटवीत फळं नि भाज्या सर्वत्र हारीने मांडून ठेवलेल्या.. ते विकणा-या स्टॉल्सवरचे बहुतांशी विक्रेते हे व्हिएतनामीज होते असं निलेश सांगत होता. हे व्हिएतनामीज लोक त्यांच्या अनोख्या इंग्रजी अकॅसेन्ट मध्ये डॉलर....डॉलर ...बनाना.. वन डॉलर अश्या आरोळ्या ठोकत होते. पुण्याच्या मंडईत घासाघीस करून भाजी घेण्याचा अनुभव होताच; म्हटलं ऑस्ट्रेलियात तरी वेगळं काय असणार? उत्साहाच्या भरात मला  चेव चढला आणि मी एका विक्रेत्याशी  ‘ 1 डॉलरला दीड किलो द्याच’ असा भाव करायला सुरुवात केली. त्या बिचार्याला मी काय म्हणतेय काही झेपेना आणि तो असा गोंधळलेला का; हे मला उमजेना! शेवटी मला आवरणं मुश्कील झाल्यावर निलेश तारस्वारत म्हणाला, अगं, इथे ही अशी भाव करण्याची पध्दतच नाहीये.. तेव्हा कुठे मी भानावर आले.  स्टॉलवरचा तो व्हिएतनामी विक्रेता  अधिकच डोळे बारीक करू एव्हाना या अजब संभाषणाकडे बघू लागला होता. मग आम्ही अख्ख्या सेंट्रल मार्केटमध्ये भटकत राहिलो. अनेक स्टॉल्स वर कित्येक प्रकारची चीज होती. चेडर चीज पासून ते ब्लु चीज पर्यंतची सगळी व्हरायटी उपलब्ध होती.   एवढंच नाही तर त्याची थोडी थोडी चवही मिळाली. ताजे स्टोन ओव्हन बेक्ड ब्रेड्स (चुलीवरची ताजी भाकरी आणि गॅस वर भाजलेली भाकरी यातला जो फरक आहे तोच या ब्रेडस च्या चवीत स्टोन ओव्हन मुळे पडतो याचा अनुभव तिथेच थोडी चव  घेतल्यावर आला ) पिकल्ड ऑलिव्हज, ब्रेड स्प्रेड्स असे अनेक स्टॉल्स.. पदार्थ , गिर्हाईक, आणि विक्रेत्यांनी खच्चून भरलेले होते. काही स्टॉल्स वर भाजलेले सर्व प्रकारचे नट्स.. मग ते आपले तिखट दाणो असोत वा मॅकॅडेमिया नट्स! त्यांचा एक खमंग गरम वास सगळीकडे भरून राहिलेला होता . अनेक वर्षांच्या परंपरेतून निर्माण झालेले इटालियन पदार्थ, आजी ज्या पद्धतीने लोणची मुरविते त्या पद्धतीने मुरवलेलं मांस, मासे, विविध सॉसेजेस..  हे सगळंच इतकं आकर्षक पद्धतीनं मांडलेलं होतं कि नकळत मी चार गोष्टी जास्तच विकत घेतल्या. चीजची चव, गरम शेंगदाण्याचा खमंग वास यातून आमची सुटका होते ना होते तो अनेक प्रकारच्या डेझर्टस स्टॉल्सनी आम्हाला अडवलं. एका स्टॉलवर तर चक्क थुई थुई उडणार चॉकलेटचं कारंजच होतं. डोळे विस्फारून इवली इवली मुलं त्या चॉकलेटच्या नाचाकडे अशी काही बघत होती कि त्यांच्या डोळ्यातला तो आभाळाएवढा आनंद बघून आई बाबा न मागताच लहानग्यांना चॉकलेट सुफले विथ एक्सट्रा चॉकलेट ड्रेसिंग घेऊन देत होती.पुढे एक योगर्ट शॉप होतं. पॅशन फ्रुटच्या बिया घातलेलं वेगळ्या चवीचं दही. आपल्याकडच्या सबजाच्या बियांप्रमाणो या बिया दिसतात. ऑरेंज व्हाईट योगर्ट किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड दही.. हरत-हेचे फळमिश्रित दह्याचे असंख्य प्रकार!मिठाई, फळं आणि भाज्यांच्या बरोबरच एशियन ग्रोसरी स्टोअर्स होती. तिथे थाई रेड करी पेस्ट , वर्मीसेली (तांदुळाच्या शेवया) असे तेव्हा माझ्यासाठी अजब नवलाईचे असलेले पदार्थ मिळत होते. चिआ सीड्स , किनवा, ब्राऊन राईस असेही पदार्थ काही ठिकाणी पोत्यातून मापट्या मापट्यानी मोजून घेता येत होते.भरपूर खरेदी करून झाल्यावर खुद्द सेंट्रल मार्केट मध्ये खायला जमलं नसेल तर बाहेर हरत-हेचे  कॅफेज! हा सगळा परिसरही तितकाच गजबजलेला होता. कुठे इराणी गालिच्याचं दुकान तर कुठे छोट्या भेटवस्तूंचं!अँडलेडला आल्याच्या पहिल्याच आठवड्यात इथल्या सेंट्रल मार्केटमध्ये रग्गड खरेदी आणि भरपेट पोटपूजा करून तृप्त मनाने आम्ही दोघे घरी परतलो होतो.. ती संध्याकाळ अजूनही माङया मनात तितकीच ताजी आहे.मग पुढे हळूहळू या सेंट्रल मार्केटची जास्त जवळून ओळख झाली.आधीच आमचं अँडलेड सुबक देखणं शहर. 983,482  किलोमीटर  क्षेत्रफळावर  वसलेल्या आणि रंगारंग उत्सवांसाठी प्रसिध्द असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या राजधानीचं शहर म्हणजे अँडलेड! खरंतर शहर म्हणताना जरा अडखळायलाच होतंय; कारण  टुमदार गावच म्हणावं इतकं अँडलेड  सुबक सुंदर आहे. कौलांनी शाकारलेली गोवा कोकणातल्यासारखी बैठी घरं, अगदी बोटावर मोजण्याइतक्या अतिउंच इमारती, शहरातून वाहात गेलेली टोरान्स नदी , आखीव रेखीव स्वच्छ रस्ते, दुतर्फा रांगेत लावलेली कितीतरी झाडं आणि या सगळ्या देखण्या देखाव्याच्या शहरात, ब:यापैकी मधोमध म्हणजे ग्रोट स्ट्रीटवरचं सेंट्रल मार्केट! मधोमध असल्यानं त्याचं नाव सेंट्रल मार्केट पडलंय की काय, कोण जाणो!1869  साली या मार्केटची सुरुवात झाली. आज त्याला अदमासे दिडशे वर्ष पुरी होत आहेत. त्याकाळी रंडल स्ट्रीटवरचे अनेक व्यापारी दाटी वाटी होऊ लागल्याने ईस्ट एन्ड मार्केट वरून हळूहळू सेंट्रल मार्केटकडे सरकले.  तिथे पन्नास शंभर हातगाड्यांवरचा धंदा करणा-या व्यापा-यानी काळाच्या ओघात हळू हळू बैठी दुकानं रस्त्यालगत बांधली. आतले गाळे ही  स्थिर स्थावर झाले. या मार्केटची तुलना काही प्रमाणात पुण्याच्या महात्मा फुले भाजी मंडईशी होऊ शकेल. इथून शहराकडे फुटणारे असे तीन चार तरी मार्ग आहेत. तो एक गमतीचा भुलभुलैय्याच आहे. बाजूनी चायना टाऊन आहे. विविध कॅफेज आहेत. या सेंट्रल मार्केट ला अँडलेडकरांच्या मनात जवळचं स्थान आहे.म्हणूनच ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट आणि स्टेट लायब्ररीच्या पुढाकारानं दिडशे वर्षाची ही परंपरा प्रदर्शनाच्या निमित्ताने जतन केलीय. तशी मी वारंवार सेंट्रल मार्केटमध्ये जातेच पण अगदी अलीकडेच गेले,  तेव्हा  समजलं; की स्टेट लायब्ररी मधलं प्रदर्शन काही काळच इथे असेल म्हणून! मग ताबडतोब माङया मोर्चा  प्रदर्शनाकडे वळवला. तिथे एका भिंती समोर छोटी रांग लागली होती. प्रत्येक माणूस येई, भिंतीजवळ जाऊन भिंतीचा वास घेई; अन हसून पुढे जाई. हा काय अजब प्रकार म्हणून मी उत्सुकतेने पाहू लागले. जवळ गेल्यावर उलगडा झाला की एक अख्खी भिंतच, केवळ सेंट्रल मार्केट मधल्या सुगंधांसाठी वाहिलेली आहे. या भिंतीवर लावलेल्या वेगवेगळ्या कापडी फ्रेम्सजवळ गेलं कि चीज, नट्स , चॉकलेट्स असे अनेक गंध येतात. एका म्युङिाक सिस्टीममधून सेंट्रल मार्केटमधले विक्रेते आणि ग्राहकांच्या एकत्रित आवाजाचा मधूर कोलाहलही हे वास घेताना ऐकू येत असतो. जुन्या काळातील मार्केट मधल्या काही वस्तू , ज्यांच्या तीन पिढ्या नांदल्या अशा तिथल्या विक्रेत्यांची माहिती प्रदर्शनात लावली आहे. अजूनही मी सेंट्रल मार्केटला जाऊन आले, की त्या रात्री मला हटकून एक स्वप्न पडतं.. सेंट्रल मार्केट मध्ये ऑर्केस्ट्रा चालू आहे. विक्रेते त्याचे संयोजक आहेत. त्यांच्या हातांच्या खुणांवर आणि डॉलर ...डॉलर...बनाना डॉलर च्या तालावर केळीं, काकडी,गाजर, झुकिनी, सॉसेजेस फेर धरून नाचताहेत.. आलेली गि-हाइकं चीज, नट्स, भाजलेल्या कॅरॅमल्ड अनिअन्सच्या वासाने अर्धोर्ंन्मीलित नेत्रंनी चवीचवीनं या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत.. डॉलर डॉलर चा आवाज आता टिपेला पोचलाय आणि हिरव्या पिवळ्या लाल जांभळ्या भाज्यांच्या रंगपंचमीत रसिक चिम्बच चिंब भिजून गेलेत. .................( अँडलेडच्या सिटी लायब्ररीत  कार्यरत असलेल्या लेखिका दीर्घकाळ ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहेत.) himanikorde123@gmail.com ............... ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिध्द होईल.                       

Web Title: Central Market: - Adled's Mandai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.