अनेक भोजपूरी चित्रपट गाजवणारे एक उत्तम अभिनेते आणि एक प्रसिद्ध नेते म्हणजे रवि किशन. भूमिकांमध्ये अक्षरक्ष: जीव ओतून व्यक्तिरेखा साकारण्याची कला रवि किशनमध्ये आहे. (My father used to beat me up every day! - Ravi Kishan shared his childhood memories, parenting tips )कोणाच्याही मदतीशिवाय प्रचंड कष्टांनी स्वतःचे अस्तित्व त्यांनी तयार केले. लापता लेडिजमधील भूमिकेनंतर हिंद सिनेमात त्यांना एक नवी ओळख मिळाली. फिगरिंग आऊट विथ राज शमानी या पॉडकास्टमध्ये जीवन संघर्ष सांगताना रवि किशन मनमोकळेपणाने बोलले. वडील-मुलाचे नाते कसे असायला हवे आणि त्यांचे नाते कसे होते, हे सांगताना त्यांनी पालकांना फार महत्त्वाचा अप्रत्यक्ष सल्ला दिला.
रवि किशन सांगतात, लहानपणी वडिलांचा प्रचंड मार खाल्ला. अर्थात तेव्हा मुलांना मारणे ही काय फार गोष्टी मानली जायची नाही. पण शिस्तीसाठीचे फटके नाही तर रागाचा मार मी खायचो. मला वाटायचे वडिलांची प्रेमाची भाषाच मुळात तशी आहे. मोठा होत गेलो तशी जरा जाणीव व्हायला लागली. वडिलांच्या छळाला कंटाळलो तर होतो, मात्र त्यांच्यावर माझे प्रेमही होते. वडील पुजारी होते, त्यांना फार पैसे मिळायचे नाहीत. एकदा त्यांना मी विचारले की एवढी पुजा करता देवधर्म करता पण मग साधे चांगले कपडेही का घेता येत नाहीत? या प्रश्नानंतर त्यांनी मला फारच बेदम मारले होते. आईला फार वाईट वाटायचे. वडिलांना माझी अभिनयाची आवडही खटकायची. मी शेती करावी अशी त्यांची इच्छा होती.
किस्सा पुढे सांगताना रवि किशन म्हणाले, एकदा गावातील एका नाटकात मी सीतेची भूमिका केली आणि वडिलांना कळले. फटके पडणार हे माहितीच होते, मात्र यावेळी त्यांचा राग इतका अनावर झाला की ते माझा जीव घेतील अशी भीती आईला वाटू लागली. तिने मला ५०० रुपये दिले आणि घरातून पळून जायला सांगितले. मी घर सोडले आणि माझ्या अभिनयाच्या संघर्षाची खरी सुरवात झाली.
रवि किशन यांना बॉलिवूडमध्ये कामं मिळाली नाही. जिथे कामं मिळाली तेथे पैसा मिळाला नाही. काही वर्षे अशीच गेली आणि त्यांना भोजपूरी चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम करायची संधी मिळाली. भोजपूरी इंडस्ट्रीने मात्र त्यांना डोक्यावर घेतले. रवि किशन फार प्रसिद्ध झाले. त्यानंतर बॉलिवूडमध्येही कामं मिळाली. भारतातून प्रसिद्धी प्राप्त झाली आणि वडिलांसोबतचे नातेही सुधारले. वडिलांनी अनेकदा माफी मागितली. मी कोणत्याही बापाला हाच सल्ला देतो की मुलांशी बोला, त्यांच्यावर कधीही हात उचलू नका. बाप-मुलाचा संवाद फार महत्त्वाचा असतो.