Brain Aneurysm : मॉडल, फॅशन आयकन आणि हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनला (Kim Kardashian) मेंदूचा गंभीर आजार झाल्याचं समोर आलं आहे. 22 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द कार्दशियन्स’ शोच्या सातव्या सिझनमध्ये तिने उघड केलं की तिला ब्रेन अॅन्युरिझम (Brain Aneurysm) झाला आहे. या अवस्थेत मेंदूमधील रक्तवाहिनीचा काही भाग कमजोर होऊन फुगतो आणि त्यात रक्त साचतं. हा आजार कशामुळे होतो हे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
किमला झालेला आजार काय?
45 वर्षांच्या किमच्या आजाराबाबत माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेतील ओहायो राज्यातील न्युरोसर्जन डॉ. ब्रायन हॉफ्लिंगर यांनी यावर सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ब्रेन अॅन्युरिझम म्हणजे मेंदूमधील रक्तवाहिन्या कमजोर होणे किंवा फुगणे आणि ही समस्या अमेरिकेत सुमारे प्रत्येक 50 पैकी एका व्यक्तीला असते. अंदाजे 60 लाख लोक या आजाराने त्रस्त आहेत.
धमणी फुटल्यास जीवघेणी स्थिती
डॉ. हॉफ्लिंगर यांनी सांगितले की, जर ही धमणी फुटली नाही तर तातडीने उपचाराची गरज नसते. पण जर ती फुटली, तर परिस्थिती अत्यंत गंभीर होते. मृत्यू किंवा नर्व्ह डॅमेज होण्याची शक्यता असते. महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण पुरुषांपेक्षा थोडं जास्त आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे धमणी फुटण्याचं सरासरी प्रमाण दरवर्षी 1% पेक्षा कमी आहे. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये केवळ फॉलो-अप इमेजिंगद्वारे यावर लक्ष ठेवता येतं आणि औषधोपचारांची आवश्यकता नसते.
ब्रेन अॅन्युरिझमची कारणं
आनुवांशिक कारणं
हाय ब्लड प्रेशर
जास्त ताण
नशेचे पदार्थ जसे की कोकेन
अॅथेरोस्क्लेरोसिस सारख्या वैद्यकीय स्थिती
ही सर्व कारणं मिळून रक्तवाहिन्यांवर ताण आणतात आणि अॅन्युरिझमचा धोका वाढवतात. थेट एकच कारण सांगणं अवघड असलं तरी, निरोगी लाइफस्टाईल आणि ताणमुक्त रूटीन या आजाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
