अमित इंगोले
Shah Rukh Khan National Award : अखेर इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान (Shah Rukh Khan) याला राष्ट्रीय पुरस्कार (National Film Award) मिळालाच. त्याचे अनेक सिनेमे गाजले पण पुरस्कार मिळाला जवान सिनेमाला हे अर्थातच अनेकांना आवडलेलं नाही, पटलेलं नाही. त्यावर सोशल मीडियात उदंड वाद सुरु आहेत. शाहरुखचे चाहते आणि ज्यांना तो अजिबात आवडत नाही ते ही लोक त्याच्याविषयी बोलत आहे. हीच तर शाहरुखची खरी ताकद आहे. तो असला की चर्चा कायम त्याच्याभोवतीच फिरते. एक काळ त्यानं गाजवला आणि गाजवतोय. शाहरुख खानकडे असं काय आहे ज्यामुळे तो खरोखर हिंदी सिनेमाची जगभर ओळख बनलाय, आणि टिकून आहेच त्याचं स्थान!
शाहरुखची इतक्या वर्षांची मेहनत, जिद्द, सतत कामाचं वेड, काळानुसार स्वत:त बदल करण्याची तयारी हे सारं कुणीच नाकारु शकणार नाही. १९९२ साली 'दिवाना' सिनेमातून सुरू झालेला शाहरूखचा प्रवास हा खरंच डोळे दिपवणारा असाच आहे. महत्वाची बाब म्हणजे त्याला आधी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार इतक्या वर्षात पहिल्यांदाच मिळाला. तोही 'जवान' सिनेमातील भूमिकेसाठी. इतक्या वर्षात शाहरूखला शेकडो पुरस्कार मिळालेत. फिल्मफेअर पुरस्कार तर त्याला लागोपाठ मिळाले आहेत. (काही पुरस्कार तर विकतही घेतले हे तो अत्यंत उमदेपणानं सांगूनही टाकतो!)
हा उमदेपणा, चुका कबूल करण्याची ताकद आणि रोमान्सची त्याच्या अभिनयातली कमाल हे सारं कुणालाही मोहात पाडावं असंच आहे. पण रोमान्सपलिकडेही लक्षात राहतात 'स्वदेस'मधील मोहन, 'चक दे' सिनेमातील कबीर खान! खरंतर या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता. इतकंच नाही तर 'पहेली' किंवा 'माय नेम इज खान' यातील भूमिकाही शाहरूख म्हणून खूप वेगळ्या आहेत.
व्यावसायिक सिनेमांचा बेताज बादशाह असं बिरूद शाहरूख खान या नावामागे लागतं. पण शाहरूखनं नेहमीच आपली तयार करण्यात आलेली एक रोमॅंटिक हिरोची प्रतिमा तोडूनही वेगळ्या पठडीतील भूमिका साकारल्या आहेत. तो सतत काळानुसार बदलत राहिला.
शाहरूखला खान खरा सिनेउद्योगातला आउटसायडर. पण आज तो किंग खान किंवा बॉलिवूड बादशाह म्हणूनच ओळखला जातो. मुळात त्याचं दिल्लीहून मुंबईत रिकाम्या हाती येणं आणि बॉलिवूडचा किंग खान बनणं हे एखाद्या स्वप्नासारखं किंवा काल्पनिक कथेसारखंच आहे. कारण त्याचा जर कामाचा ग्राफ पाहिला तर लक्षात येईल की, या माणसानं असंच हे स्थान मिळवलं नाहीये. त्याने आधीपासूनच झपाटल्यागत काम केलंय. फक्त काम केलं असं नाही तर त्याचं काम लोकांना आवडलं सुद्धा. उगाच तो काही जगभरात इतका फेमस नाही.
त्याचं १८, २० तास काम करणं असो, भूमिकेवर मेहनत घेणं असो, नव्या कलाकारांसोबत जुळवून घेणं असो, मोठ्यांचा मान ठेवणं असो, निर्माते-दिग्दर्शकाला जे हवं ते देण्यासाठी धडपडणं असो किंवा फॅन्सची मर्जी राखणं असो याच गोष्टी त्याला किंग खान बनवतात. अशात या राष्ट्रीय पुरस्काराबाबत देर आए दुरुस्त आए असं म्हणणं वावगं ठरणार नाही. १९९२ ते २०२५ बदललेल्या भारतीय तरुण पिढीचाच एक चेहरा आहे, शाहरुख खान!