... Because you are a woman! | बाईला शोभतं का हे?

बाईला शोभतं का हे?

-सोनाली लोहार

असं म्हणतात, देवानं पुरुषाची निर्मिती केली आणि त्याला वाटलं, ‘मी याहीपेक्षा सुंदर काही घडवू शकेन’ आणि मग घडली ती ‘बाई’. जे निर्माण झालं ते इतकं अद्भुत होतं की मग बहुतेक त्यानंतर त्या जगनियंत्यानं त्याची सगळी आयुधं खालीच ठेवली.. बाई ही त्याची अदभुत, अलौकिक आणि अंतिम निर्मिती ठरली.
असं नेमकं काय वेगळं घडलं होतं? मला वाटतं, कदाचित त्या गोळ्याला आकार देताना देवाच्या हृदयातले कोमल भाव हे उत्कटतेच्या  परिसीमेवर असणार. 

मडक्याला आकार देताना त्याच्या गोलाईवरून हात फिरवताना कुंभाराचे हात जितके मुलायमपणे फिरतात; देवाचे हातही तितकेच मुलायम झाले असणार. एका अलवार क्षणी स्वत:च्या निर्मितीकडे अभिमानानं बघताना तो भावविवश होऊन म्हणाला असणार, ‘चल, आता मी तुला सर्वोत्कृष्ट बनवतो आणि त्याक्षणी बाईला गर्भाशय मिळालं असणार. त्या एका क्षणात ती अत्यंत कोमलही झाली आणि त्याच एका क्षणात ती प्रचंड ऊर्जेचा स्त्रोतही झाली. ती मेनकाही झाली आणि ती शबरीही झाली, ती सरस्वतीही झाली आणि ती दुर्गाही झाली!
युगामागून युगं लोटली. बाई तिचं हे बाईपण जपत स्थिर राहण्यासाठी धडपडत राहिली. पाच बलदंड पुरुषांची पत्नी असूनही रजस्वला अवस्थेतल्या तिची वस्रं भर सभेत फेडली गेली, तेव्हा अपमानानं चवताळून तिनं युद्ध घडवलं आणि ती संहारक झाली. चारित्र्यावर संशय घेतल्यानं असाहाय्य एकाकी अवस्थेत दोन पुत्नांना जंगलात जन्म देण्याची वेळ ओढवलेल्या तिनं परत संसारात सामील होण्यास नकार दिला आणि ती जमिनीत लुप्त झाली. 
आत्मसन्मान जपण्याचं या इतकं मोठं उदाहरण नाही. या त्या प्रचंड ताकदवान स्त्रिया ज्यांनी स्वत:चे निर्णय स्वत: घेतले. पुराण काळात त्या हे करू शकल्या; पण आजची बाई खरंचं हे निर्णय घेते आहे का? तिला घेऊ दिले जाताहेत का? ती चुकतेय की ती बरोबर आहे?
निमित्त झालं सोशल मीडियावर फिरणा-या  एका व्हिडीओचं. त्यात बाईनं पुरुषांच्या वर्चस्वाखाली राहणं कसं गरजेचं आहे यावर एक व्याख्यान होतं. असं झालं नाही तर बाई स्वैर होईल आणि कुटुंबव्यवस्था ढासळून जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं. 
तो व्हिडीओ माझ्या एका अत्यंत जवळच्या मैत्रिणीनंही बघितला. ती स्वत: एका पुरुषप्रधान क्षेत्रात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उच्चपदावर कार्यरत आहे. या पदावर पोहोचण्यापर्यंतचा तिचाही प्रवास सोपा नव्हता. व्हिडीओत व्यक्त केल्या गेलेल्या त्या विचित्र मानसिकतेच्या बेड्या तोडून आत्मनिर्भर होण्यासाठी जिवाचा आटापिटा करून धडपडणार्‍या कित्येक मुली देशाच्या कानाकोप-यात आहेत याची तिला कल्पना आहे. यामुळे अशा विचारांचा पगडा या मुलींच्या पालकांच्या मनावर घट्ट बसला तर या मुलींचं कसं होणार, कशी पूर्ण करणार त्या त्यांची स्वप्नं, या विचारानं ही माझी मैत्नीण प्रचंड अस्वस्थ झाली. ती एकटीच नव्हे, असे काही विचार ऐकले की प्रत्येक बाईच अस्वस्थ होते!
नक्की समाजाच्या बाईकडून अपेक्षा तरी काय आहेत? बाईनं बाईसारखं राहावं म्हणजे तरी काय? आता छोटंसं घरच काय, तर स्री एक बलाढय़ राष्ट्रही सर्मथपणे चालवतेय. आता या काळात स्त्रीनं शरीराचा इंचभरही भाग उघडा ठेवू नये, तिनं बोलताना अदबीनंच बोलावं, स्वत:चा आत्मसन्मान घरच्या उंबरठय़ावर टांगून मगच घरात प्रवेश करावा. 
या अशा विचारांना आपल्या मनात काय स्थान द्यावं याचा खरंच विचार करायला हवा. मान, र्मयादा, संस्कृती या सगळ्यांचं भान असायला हवं. पण ते स्त्रीलाही आणि 
पुरुषालाही. पण, समाजाचा दुर्बल घटक  या वर्गात जमा करून बाईकडूनच याची अपेक्षा केली जाणं हे नक्कीच गैर ठरेल. आणि खरं तर या सगळ्या शब्दांच्या व्याख्याही एकदा त्यांच्यावरची धूळ पुसून साफ करून लखलखीत करून घ्यायला हव्यात. स्री आणि पुरुष या चष्म्यातून न बघता केवळ माणूस म्हणून एकमेकांच्या भावनांचा, विचारांचा आणि संवेदनांचा विचार केला आणि त्यांचा आदर ठेवला तर सगळेच प्रश्न आपोआपच सुटतील.
 याचा अर्थ बाई नेहमीच बरोबर असते का? 
- अजिबात नाही. कारण तीही माणूस आहे, चुकते कधी कधी. काही काही भावना या नक्कीच पूर्णत: स्री सुलभ असतात आणि त्यांना काही पर्याय नसतो. वात्सल्य, प्रेम, शृंगार या त्यातल्याच काही. बरेचदा बाई या भावना दोन्ही हातांनी उधळते. हातचं काहीही न राखता. आणि तिथेच कधी कधी फसवलीही जाते. 
विवाहबाह्य संबंध हा एक वेगळाच विषय आहे; पण काही डोळ्यासमोर घडलेली उदाहरणं आहेत. अशा प्रकरणात बरेचदा प्रेमाच्या नावाखाली भावनेच्या भरात आपण वापरले जातोय याची बाईला एकतर समज नसते किंवा समज असूनही बहुतेक तिचं हृदय तिला साथ देत नाही. इथे जेवढा पुरुष चुकतो तितकीच बाईही चुकते. 
अशा कृतीनं काही संसार उद्ध्वस्त होऊ शकतात याची जाणीव आणि एक स्त्री म्हणून आत्माभिमान, या दोन्ही गोष्टींना जेव्हा बाई सोडचिठ्ठी देते तेव्हा ती चूकच असते.
कधी कधी निसर्गानं बहाल केलेल्या या देणग्यांचा स्वार्थासाठीही गैरवापर केला जातो आणि म्हणूनच, बाई नेहमीच बरोबर असते असंही नाही. पण चुकतो तो माणूसच. स्त्री असो वा पुरुष, लिंगभेदावरून त्या चुकांचं मोजमाप केलं जाऊ नये इतकंच.
माझं एवढंच सांगणं आहे, मी एक बाई म्हणून कसं वागावं हे संस्कार करून मला लहानाचं मोठं करू नका. मला फक्त एक चांगलं माणूस म्हणून मी कसं असावं एवढंच शिकवा. 
माझ्या विचारांना उडण्याचं बळ द्या. माझ्या स्वप्नांना आणि आकांक्षांना बुरसटलेल्या विचारांचं कुंपण घालू नका. 
मी काय घालावं हे ठरवण्याआधी माझ्याकडे बघणारी नजरच स्वच्छ करा. माझी परंपरा द्रौपदी आणि सीतेची आहे, हे मी विसरणार नाही. आणि  तुम्हीही कधीही विसरू नका!

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत)

 sonali.lohar@gmail.com

Web Title: ... Because you are a woman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.