How To Grow Eyebrows : चेहऱ्याचं सौंदर्य डोळ्यात आणि डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यात महत्वाची भूमिका बजावतात ते आयब्रो. आयब्रो म्हणजेच भुवया. मेकअप करणं आवडणाऱ्या महिला, तरूणींची इच्छा असते की, त्यांच्या आयब्रो जाड आणि दाड असव्यात. पण काही कारणांनी अनेकांच्या भुवया पातळ आणि कमजोर होतात. चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी आणि भुवया जाड करण्यासाठी तरूणी वेगवेगळे उपाय करतात. केमिकल्स प्रॉडक्टमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. अशात भुवया दाट आणि जाड करण्यासाठी आपण काही घरगुती उपायही करू शकता. असाच एक उपाय म्हणजे बहुगुणकारी खोबऱ्याचं तेल. भुवयांसाठी आपल्याला खोबऱ्याचं तेल खूप मदत करू शकतं. यात फॅटी अॅसिड आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असतात. जे आयब्रोची ग्रोथ वाढवतात. अशात खोबऱ्याचा तेलाचा वापर कसा करावा हे पाहुयात.
खोबऱ्याचं तेल आणि कोरफडीचा गर
आयब्रो वाढवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कोरफडीचा गर घालून लावू शकता. कोरफडीनं रोमछिद्रांना पोषण आणि मजबूती मिळते. ज्यामुळे आयब्रो जाड आणि दाट होण्यास मदत मिळते. हा उपाय करण्यासाठी एक चमचा खोबऱ्याचं तेल आणि एक चमचा कोरफडीचा गर चांगला मिक्स करा. हे मिश्रण आयब्रोवर लावा आणि सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. हे मिश्रण रात्रभर लावून ठेवा. नियमितपणे हा उपाय कराल तर फरक दिसेल. फक्त एकदा करून काही होणार नाही.
खोबऱ्याचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल
आयब्रो जाड आणि दाट करण्यासाठी खोबऱ्याचं तेल आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता. ऑलिव्ह ऑइलनं हेअर फॉलिकल्स मजबूत होतात. सोबतच आयब्रोची वाढही होते. यासाठी अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल आणि अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल चांगलं मिक्स करा. रात्री झोपण्याआधी हे मिश्रण आयब्रोवर लावा आणि ५ ते १० मिनिटं मसाज करा. काही दिवसांन फायदा दिसून येऊ शकतो.
खोबऱ्याचं तेल आणि लिंबू
आयब्रो दाट आणि जाड करण्यासाठी खोबऱ्याचं तेल आणि लिंबाचं मिश्रणही फायदेशीर ठरतं. लिंबातील व्हिटामिन सी मुळे रोमछिद्र साफ होऊन केसांची वाढ होते. यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा खोबऱ्याचं तेल घ्या, त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका. हे मिश्रण आयब्रोवर लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करू शकता.
खोबऱ्याचं तेल आणि मेथी दाणे
खोबऱ्याचं तेल आणि मेथीच्या दाण्यांचं मिश्रण डोक्यावरील केस वाढण्यासाठी खूप आधीपासून वापरलं जातं. हेच आपण आयब्रोच्या वाढीसाठीही वापरू शकता. मेथीच्या दाण्यांमधील पोषक तत्वांनी हेअर फॉलिकल्सना पोषण मिळतं, ज्यामुळे आयब्रो मजबूत होतात. यासाठी एक चमचा गरम खोबऱ्याचं तेल घ्या. त्यात अर्धा चमचा मेथीच्या दाण्यांचं पावडर घाला. हे मिश्रण आयब्रोवर लावा. रात्रभर तसंच ठेवा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करू शकता.