Rose Water for Face: त्वचेवर लावण्यासाठी भरपूर महिला गुलाबजलचा वापर करतात. गुलाबजलमध्ये मॉइश्चरायजिंग गुण असतात, जे त्वचेला ओलावा देतात आणि त्वचा मुलायम ठेवतात. तसेच गुलाबजल लावल्याने त्वचा हायड्रेट सुद्धा राहते. जर आपणही नियमितपणे चेहऱ्यावर गुलाबजल लावाल तर याने त्वचेचं सौंदर्य आणखी खुलतं. त्वचेची ड्रायनेस कमी होईल. गुलाबजलाची महत्वाची बाब म्हणजे हे कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर लावता येतं. हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याची समस्या जवळपास सगळ्यांनाच होते. अशात गुलाबजल लावणं खूप फायद्याचं ठरेल. पण केवळ थेट गुलाबजल लावून चालणार नाही. अधिक फायद्यासाठी गुलाबजलमध्ये इतरही काही गोष्टी मिक्स करून लावू शकता. त्याच आपण पाहणार आहोत.
गुलाबजल आणि मुलतानी माती
चेहऱ्यावर गुलाबजलमध्ये थोडी मुलतानी माती मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा ग्लो वाढतो. यासाठी दोन चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात गुलाबजल टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. गुलाबजलाने त्वचा हायड्रेट राहते आणि ग्लो वाढतो. गुलाबजल आणि मुलतानी माती एकत्र चेहऱ्यावर लावल्याने त्वचा सतेज होते.
गुलाबजल आणि चंदन पावडर
गुलाबजलमध्ये चंदन पावडर मिक्स करूनही चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी २ चमचे चंदन पावडर घ्या आणि त्यात थोडं गुलाबजल घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २० ते २५ मिनिटांनी चेहरा धुवा. चंदन पावडर त्वचेतील जळजळ कमी करतं. तसेच चेहऱ्याची रंगत वाढवतं. चंदन पावडरने चेहरा थंड राहतो आणि डाग दूर होण्यासही मदत मिळते. ही पेस्ट आपण चेहऱ्यावर रोज लावू शकता.
गुलाबजल आणि कोरफडीचा गर
गुलाबजल आणि कोरफडीचा गर देखील मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावर दोन ते तीन मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर चेहऱ्याची हलक्या हाताने मालिश करा. कोरफडीच्या गरामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्ल असतात, जे त्वचेचं फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करतात. कोरफडीच्या गराने त्वचा मुलायम आणि चमकदार होते. काही दिवस रोज ही पेस्ट चेहऱ्यावर लावू शकता.
गुलाबजल आणि तुरटी पावडर
चेहऱ्यावर गुलाबजल आणि तुरटीची पावडर लावूनही चेहऱ्याचा ग्लो वाढवू शकता. यासाठी एक चमचा तुरटीची पावडर घ्या आणि त्यात गुलाबजल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. ऑयली स्किन असलेल्यांसाठी हा फेस पॅक खूप फायदेशीर मानला जातो. जर आपली स्किन ड्राय असेल तर ही पेस्ट लावणं टाळलं पाहिजे. कारण तुरटीने त्वचा आणखी ड्राय आणि रखरखीत होऊ शकते.
