lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > सौंदर्याच्या जगातली ही ब्ल्यू ब्यूटी मुव्हमेण्ट काय आहे?

सौंदर्याच्या जगातली ही ब्ल्यू ब्यूटी मुव्हमेण्ट काय आहे?

सौंदर्य म्हणजे नाजूक आणि संवेदनशील बाब . पण आज हे सौंदर्य पर्यावरण आणि विशेषतः समुद्री जीवनाच्या गळ्याला नख लावत आहे.  हे सगळं थांबवण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी  सौंदर्याच्या जगात ब्ल्यू ब्युटी मुव्हमेण्ट सुरु आहे.   

By madhuri.pethkar | Published: March 19, 2021 06:57 PM2021-03-19T18:57:41+5:302021-03-19T19:08:40+5:30

सौंदर्य म्हणजे नाजूक आणि संवेदनशील बाब . पण आज हे सौंदर्य पर्यावरण आणि विशेषतः समुद्री जीवनाच्या गळ्याला नख लावत आहे.  हे सगळं थांबवण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी  सौंदर्याच्या जगात ब्ल्यू ब्युटी मुव्हमेण्ट सुरु आहे.   

What is this Blue Beauty movement in the world of beauty? | सौंदर्याच्या जगातली ही ब्ल्यू ब्यूटी मुव्हमेण्ट काय आहे?

सौंदर्याच्या जगातली ही ब्ल्यू ब्यूटी मुव्हमेण्ट काय आहे?

Highlights    सौंदर्यासाठी जेवढी कमी आणि नैसर्गिक उत्पादनं वापराल तितकं पर्यावरण, समुद्र आणि समुद्री जीव सुरक्षित राहू शकतील.  जगभरात सौंदर्य उत्पादनांच्या पॅकेजिंगच्या कचर्याने आक्राळ विक्राळ रूप धारण केलं आहे. - ब्ल्यू ब्युटी मुव्हमेण्ट आपल्या सौंदर्याबरोबरच समुद्री पर्यावरण जपण्याचं आव्हान करते. पर्यावरण जपता जपता आपलं सौंदर्य जपलं तर आपण अधिकच छान दिसू हा विचार जगभरातल्या महिला आणि मुलींमध्ये निर्माण करण्याचा या चळवळीचा उद्देश आहे


  - माधुरी पेठकर

आपण सुंदर दिसावं या इच्छेला भौगोलिक मर्यादा नाही. जगभरातल्या मुली महिला  सुदंर दिसण्यासाठी धडपडत असतात. विविध सौंदर्य उत्पादन कंपन्या या धडपडीला  प्रोत्साहनच देत राहतात. एक ब्युटी प्रोडक्ट पटलं नाही तर दुसरं हजरच असतं. आणि ते नाही पटलं तरा आणखी तिसरं. सुंदर दिसण्यासाठीची ही धडपड न संपणारी आहे. पण ही धडपड काही प्रश्न निर्माण करत आहे, धोके निर्माण करत आहे याची कल्पना आपल्याला आहे  का?
 सौंदर्य म्हणजे नाजूक आणि संवेदनशील बाब. पण आज हे सौंदर्य पर्यावरण आणि विशेषतः समुद्री जीवाच्या गळ्याला नख लावत आहे.  हे सगळं थांबवण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी  सौंदर्याच्या जगात ब्ल्यू ब्युटी मुव्हमेण्ट सुरु आहे. आपण या पर्यावरणाचा एका भाग आहोत. त्यामुळे आपल्या जगण्याचा, जगण्याच्या, वागण्याच्या पद्धतीचा परिणाम हा शेवटी पर्यावरणावरच होतो.  त्यामुळे आपण काया खातो, पितो त्यासोबतच आपण आपलं सौंदर्य जपण्यासाठी , वाढवण्यासाठी काय वापरतो याचा परिणाम  आपल्या स्वतः:सोबतच पर्यावरणावरही होतो  असं ही ब्लू ब्युटी मुव्हमेण्ट म्हणते. 


सध्या जगभरात सौंदर्य उत्पादनाची बाजारपेठ तेजीत सुरु आहे. त्यामुळे ही सौंदर्य उत्पादनं वापरून  मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो आहे. आपण जी कॉस्मेटिक  वापरतो त्यामुळे समुद्रातले जीव धोक्यात आले आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं तर?मी वापरत असलेल्या क्रीम पावडरचा समुद्रातल्या जीवाशी काय संबंध असा प्रश्न  कुणालाही पडणं साहजिक आहे,  या प्रश्नाचं उत्तर देताना ब्ल्यू ब्युटी चळवळीचे कार्यकर्ते म्हणतात  की तुम्ही  सौंदर्यासाठी जेवढी कमी आणि नैसर्गिक उत्पादनं वापराल तितकं पर्यावरण, समुद्र आणि समुद्री जीव सुरक्षित राहू शकतील.  

सनस्क्रीन हे त्वचेची काळजी घेणाऱ्या अनेक उत्पादनांपैकी असलेलं एक महत्त्वाचं उत्पादन.  जगभरातल्या महिला ते वापरतात. पण या सनस्क्रीनमुळे समुद्रातले जीव धोक्यात आले आहे. त्याचं कारण या सनस्क्रीनमधील घातक रासायनिक घटक.  एक शॉम्पूची बाटली संपली की ती आपण फेकून देतो. नवीन आणतो. पण फेकून दिलेली बाटली वर्षांनुवर्ष तशीच राहाते.

माणूस विरुद्ध पर्यावरण, माणूस विरुद्ध समुद्र असं युद्ध केव्हाच पेटलं आहे यात जगभरातल्या महिला वापरत असलेल्या सौंदर्य उत्पादनांचा वाटाही खूप मोठा आहे. जगभरात सौंदर्य उत्पादनांच्या पॅकेजिंगच्या कचऱ्याने आक्राळ विक्राळ रूप धारण केलं आहे. दर मिनिटाला  एक ट्रक भरून सौंदर्य उत्पादनांचा कचरा समुद्रात टाकला जात आहे,  म्हणजे जगभरातला हा सौंदर्याचा हव्यास समुद्रातल्या किती जीवांचा प्राण घेत असेल? म्हणून ब्ल्यू ब्युटी मुव्हमेण्ट म्हणते की सौंदर्य जपताना आपलं पर्यावरणही जपा. त्यासाठी थोडं जागरूक राहण्याची, डोळसपणे उत्पादनं निवडण्याची गरज आहे.


 

ब्युटी प्रोडक्टस निवडताना काय कराल?

- कोणतंही ब्युटी प्रोडक्ट विकत घेताना स्वतः:ला आधी विचारा की मला खरंच याची गरज आहे का? समजा उत्तर नाही आलं तर घेऊ नका पण उत्तर हो आलं तर मग जरा डोळसपणे निर्णय घ्या. 

- जो ब्रँण्ड रियुजेबल, रिफिलेबल आणि रिसायकलेबल पॅकेजिंगची खात्री देतं तो ब्रँड वापरा. जर दुकानदार तुमची क्रीम , लोशन, पावडर वापरून झालं की रिकाम्या बाटल्या आमच्याकडे जमा करा असं म्हणत असेल तर त्यांना प्रतिसाद द्या. पाठिंबा द्या. रियुज, रिफिल आणि रिसायकल या त्रिसूत्रीमुळे वातावरणातील कार्बन कमी होऊ शकतो. 

-सौंदर्य उत्पादनं घेताना बाटली किंवा खोक्यावरील समोरचीच बाजू  आपण वाचतो. ब्रॅन्डचं नाव,  प्रोडक्टचं नाव, त्याखालचं स्लोगन, त्यावरचं चित्रं पाहातो. पण पर्यावरण रक्षणासाठी ( अर्थात स्वतः:च्या त्वचेच्या रक्षणासाठी) बाटली किंवा खोक्यामागची बाजू वाचा. बारीक अक्षरात लिहिलेले घटक  काय आहेत ते समजून घ्या. आपण जे प्रोडक्ट घेत आहोत त्यात समुद्री पर्यावरणाला घातक घटक नाही ना याची खात्री करून घ्या. 

- पॅरॅबिन फ्री असलेली उत्पादनं वापरण्यास सुरक्षित असतात.  त्यासाठी फिजिकल सनस्क्रीन वापरावं. सध्या केमिकल सनस्क्रीन मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. यात पॅरॅबिन हा घटक असतो.  फिजिकल सनस्क्रीनमधे टिटॅनिअम डिओक्सयाइड आणि झिंक ऑकसाईड हे समुद्री पर्यावरणास सुरक्षित घटक असतात.  सनस्क्रीन मधला पॅरॅबिन हा घटक हार्मोन्समधे अडथळा  आणतं. त्यामुळे ते मानव आणि समुद्री जीव या दोघांनाही घातक ठरतं. 

- फेनॉक्सयीइथेनॉल ,पॉलिथायलिन ग्लायकोलस हे रासायनिक घटक असेलेले किंवा  सिंथेटिक सुवासाची उत्पादनं वापरू नये. एकतर त्यात पेट्रोलियम घटक असतात आणि त्यांचं जैविक पद्धतीनं विघटन होत नाही. 

-त्वचेची काळजी घेण्यासाठी स्क्रबर किंवा फेसवॉश वापरले जातात. ज्यात मायक्रोबिडास असतात किंवा मेकअपसाठी ग्लिटर वापरले जातात ते वापरू नये.  कारण त्यात प्लास्टिक असतं. त्यापेक्षा मिका हे नैसर्गिक खनिज असलेलं उत्पादन वापरावं.

- कमीतकमी पॅकेजिंग असलेलं, कापडाचं किंवा कागदाचं पॅकेजिंग असलेलं उत्पादन वापरावं.पॅकेजिंग फ्री साबण किंवा शॅम्पूच्या साबण मिळतात, ते घेण्यास प्राधान्य द्यावं. 

- महागड्या क्रिमच्या खपासाठी ते क्रीम छोट्या बॉटल किंवा सॅशेमध्ये विकली जातात. पण या छोट्या बाटल्या, सॅशे हे कचऱ्यात विलग करणं , वेचणं आणि पुन्हा वापरणं अवघड असतं. छोट्या सॅशेमधील ब्युटी प्रोडक्टस वापरू नये. 

ही ब्ल्यू ब्युटी मुव्हमेण्ट आपल्या सौंदर्याबरोबरच समुद्री पर्यावरण जपण्याचं आव्हान करते. आपल्या त्वचेसाठी काय चांगलं यासोबतच आपल्या पर्यावरणासाठी काय घातक नाही याचा विचार करून उत्पादनं निवडा  अशी विनंती करते.  पर्यावरण जपता जपता आपलं सौंदर्य जपलं तर आपण अधिकच छान दिसू हा विचार जगभरातल्या महिला आणि मुलींमध्ये निर्माण करण्याचा या चळवळीचा उद्देश आहे. ही चळवळ ब्युटी प्रोडक्टसमुळे जगभरात निर्माण होणारे कार्बन फूट प्रिंट कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सौंदर्याप्रती जागरूक असणाऱ्या महिला आणि मुलींना ही ब्ल्यू ब्युटी चळवळ नक्कीच जवळची वाटेल.आपली वाटेल!

madhuripethkar29@gmail.com

Web Title: What is this Blue Beauty movement in the world of beauty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.