Diwali Glow Face Pack: दिवाळी म्हटलं की, सणासुदीचा काळ. आपल्याला घराची साफसफाई, फटाके, फराळ आणि सजावट याची आठवण येते. पण या सगळ्यात आपण स्वत:कडे लक्ष द्यायला विसरतो. साफसफाई करताना धुळीमुळे आपला चेहरा निस्तेज दिसू लागतो. धूळ, प्रदूषण, झोपेचा ताण आणि सततच्या घरकामामुळे त्वचा निस्तेज, कोरडी आणि थकलेली दिसू लागते.
या काळात आपल्याला साध्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल किंवा इतर गोष्टी देखील करता येत नाही. त्वचा उजळवण्यासाठी आपण अनेकदा महागड्या क्रीम्सचा वापर करतो. परंतु, यामुळे त्वचा उजळण्याऐवजी तो अधिक निस्तेज दिसू लागतो. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्वचा उजळण्यास मदत होईल. काही घरगुती आणि नैसर्गिक पदार्थ त्वचेला उजळ बनवण्यास मदत करतील. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग असतील तर गुलाबाच्या पाकळ्यांचा हा सोपा घरगुती उपाय करुन बघा.
आपल्याला बेसन, दूध पावडर, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि तांदळाचे पीठ लागेल. हे सर्व साहित्य समप्रमाणात घेऊन त्याचे पीठ तयार करा. हे पीठ हवाबंद डब्यात भरा. आपल्याला हवं तेव्हा ही चमचाभर पावडर पाण्यात मिसळा. चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. ३ ते ५ मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
यात असणारे बेसन त्वचेला नैसर्गिक उजळण्यास मदत करते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते. ज्यामुळे आपला चेहरा अधिक फ्रेश वाटतो. दूध पावडरमध्ये लॅक्टिक अॅसिडचे प्रमाण चांगले असते. जे त्वचेला मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. ही पावडर कोरड्या आणि निस्तेज त्वचेपासून आपले रक्षण करते. त्वचेला आतून मॉइश्चरायझ करते.
गुलाबाच्या पाकळ्या त्वचेसाठी बहुगुणी ठरतात. यात असणारे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा स्वच्छ आणि संतुलित ठेवण्यास मदत करतात. गुलाबाच्या पाकळ्या चेहऱ्यावर येणारा लालसरपणा, जळजळ आणि पुरळ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच चेहऱ्यावर असणाऱ्या बरीक सुरकुत्या, डाग ही कमी करतात.