केस गळणे ही जशी वाढती समस्या आहे तशीच आणखी एक वाढती समस्या म्हणजे विरळ केस. केस विरळ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की अनुवंशिकता, आरोग्याच्या समस्या, आहारातील कमतरता तसेच दैनंदिन जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयी केस विरळ होण्याला कारणीभूत ठरतात. सुरुवातीला ही समस्या फारशी जाणवत नाही मात्र एकदा केस विरळ व्हायला लागले की काही दिवसातच टक्कल पडल्यासारखे दिसायला लागते. (thinning hair can cause baldness, before trying out remedies learn about reasons )अनुवंशिकता हे केस विरळ होण्यामागचं एक कारण आहे. घरात आधीच्या पिढीत विरळ केस असणारे असले की पुढच्या पिढीतही ही समस्या होण्याची शक्यता अधिक असते. पुरुषांमध्ये 'मेल पॅटर्न बाल्डनेस' आणि स्त्रियांच्या बाबतीत 'फीमेल पॅटर्न थिनिंग' ही अनुवंशिक स्वरूपाची लक्षणं दिसून येतात.
ताण-तणाव ही केसांच्या आरोग्यावर परिणाम करणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे. दीर्घकाळ तणावात राहिल्यास शरीरातील 'कोर्टिसोल' नावाचे हार्मोन वाढते, जे केसांच्या वाढीच्या नैसर्गिक चक्रात अडथळा निर्माण करते. यामुळे केस लवकर गळू लागतात आणि नवीन केसांची वाढ मंदावते. आहारातील कमतरताही केस विरळ होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. प्रथिने, लोह, झिंक, बायोटिन, जीवनसत्त्व 'डी' आणि इतर आवश्यक पोषणद्रव्यांची कमतरता असल्यावर केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळत नाही. प्रोसेस्ड फूड्स, साखर, सॉफ्ट ड्रिंक्स आणि फास्ट फूड यांचा केसांच्या आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो.
झोपेचा अभाव म्हणजे फक्त आरोग्याचीच नाही तर केसांची आणि त्वचेचीपण वाट लागते. झोप कमी झाल्यामुळे शरीरातील अनेक प्रक्रिया व्यवस्थित होत नाहीत. रात्रीच्या झोपेवेळी अनेक शारीरिक प्रक्रिया असतात ज्या झोप न झाल्यामुळे पार पाडल्या जात नाहीत.
याशिवाय केसांची काळजी न घेणे हे देखील एक कारण ठरते. रोज केस धुण्यासाठी गरम पाणी वापरणे, केस ओले असतानाच जोरात विंचरणे, सतत स्ट्रेटनिंग किंवा कलरिंगसारख्या केमिकल प्रक्रियांचा अतिरेक करणे यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहोचते. केस मुळांपासून कमकुवत होतात आणि सहज गळू लागतात.
या सगळ्या कारणांचा विचार करा आणि जीवनशैलीत बदल करा. केस पुन्हा पूर्ववत व्हायला वेळ लागेल मात्र एकदा झालेला चांगला बदल कायम स्वरुपी असतो. तरीही जर केस विरळच होत असतील तर एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.