How Sleeping Position Affects Face: अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी चेहऱ्यावर कमी वयातच वाढत्या वयाचा प्रभाव किंवा लक्षणं दिसू लागतात. म्हणजेच काय तर लवकरच म्हातारे झाल्याचं दिसू लागतं. याची कारणं वेगवेगळी असतात. अशात बरेच लोक चेहऱ्यावर दिसणारी ही वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी स्किनकेअर प्रॉडक्ट्स, ट्रीटमेंट आणि डाएट या गोष्टी करतात. पण एका गोष्टीवर फार कमी चर्चा केली जाते. ती म्हणजे आपली झोपण्याची पद्धत.
चेहरा लवकर म्हातारा दिसण्यामागे आपली झोपण्याची पद्धतही कारणीभूत असते. आपल्यालाही सकाळी झोपेतून उठून आरशात पाहिल्यावर चेहऱ्यावर लाइन्स किंवा डोळ्यांच्या आजूबाजूला सूज दिसली असेल. सुरूवातीला तर या लाइन्स किंवा सूज काही वेळाने दूर होतात. पण जर या गोष्टी रोज होत असतील, तर हळूहळू त्वचेची लवचिकता आणि चेहऱ्याची बनावट यात फरक पडतो. अशात आपल्या नक्कीच प्रश्न पडला असेल की, कोणत्या पोजिशनमध्ये जास्तवेळ झोपलं तर सुरकुत्या होतात आणि त्वचा सैल होते? चला तेच पाहुयात.
एक्सपर्टचं मत
फिजिओथेरपिस्ट डॉ. लक्ष्य भक्त्यानी यांनी The Indian Express ला सांगितलं की, काही स्लीप पोजिशन खरंच स्किन एजिंग वाढवू शकतात. एका बाजूने किंवा पोटावर झोपल्याने चेहरा उशीवर दाबला जातो. ज्यामुळे त्वचेवर घर्षण आणि दबाव निर्माण होतो. नेहमीच जर या पद्धतीने झोपत असाल तर स्लीप लाइन्स कायम राहतात आणि पुढे जाऊन त्या स्थायी सुरकुत्यांमध्ये बदलतात. या सुरकुत्या सामान्यपणे गाल, कपाळ आणि हनुवटीच्या आजूबाजूला बघायला मिळतात. इतकंच नाही तर एका कुसेवर झोपल्यानं ग्रॅव्हिटीमुळे जबडा आणि मानेच्या आजूबाजूची त्वचा देखील सैल पडण्याची भीती असते.
त्वचेचं होतं नुकसान
अनेकदा झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर सूज किंवा क्रीज दिसतात. सामान्यपणे सूज किंवा क्रीज कायमस्वरूपी नसतात. झोपण्यादरम्यान दबाव आणि फ्लूइड रिटेंशनमुळे असं होतं. पण झोपण्याची ही पद्धत जर नेहमीच तशी राहत असेल तर त्वचेतील कोलेजन स्ट्रक्चर आणि लवचिकता हळूहळू प्रभावित होऊ शकते. सतत चेहऱ्यावर सूज दिसत असेल तर हे लिम्फॅटिक ड्रेनेजची कमतरता किंवा शरीरातील एखाद्या समस्येचा संकेत असू शकते. पण जास्तीत जास्त केसेसमध्ये झोपण्यादरम्यान दबाव पडल्यानं असं होतं.
काय कराल उपाय?
त्वचेचं नुकसान होण्यापासून बचाव करण्यासाठी योग्य उशी आणि कापड्याची निवड महत्वाची ठरते. डॉक्टर सांगतात की, सिल्क किंवा सॅटनचे उशीचे कव्हर कॉटनच्या तुलनेत कमी घर्षण निर्माण करतात. ज्यामुळे त्वचेवर कमी लाइन्स पडतात. ऑर्थोपेडिक किंवा मेमोरी फोम पिलो चांगला सपोर्ट देतात. चेहऱ्यावर दबाव कमी करतात. आता स्लीप पोजिशनबाबत सांगायचं तर सरळ पाठीवर झोपणं सगळ्यात सुरक्षित मानलं जातं. यामुळे चेहऱ्यावर थेट दबाव पडत नाही. चेहरा उशीवर दाबला जात नाही. डोकं थोडं उंचीवर ठेवून झोपल्यास डोळ्याच्या आजूबाजूला फ्लूइड जमा होण्याचा धोकाही टाळला येतो. ज्यामुळे सकाळी चेहऱ्यावर सूज दिसत नाही.
