केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस गळणे, तुटणे, कोरडेपणा आणि टाळूच्या समस्या वाढू लागतात. अनेक वेळा आपण महागडी उत्पादने वापरतो, पण अंघोळ करतानाच काही चुकीच्या सवयी बाळगल्यामुळे केस खराब होतात. केस धुण्याची योग्य पद्धत अवलंबली तर केसांची मुळे मजबूत राहतात आणि केस निरोगी, दाट व चमकदार दिसतात. (These are the mistakes you make while washing your hair, know one of the main reasons for hair loss - your hair will remain beautiful)अंघोळ करताना फार गरम पाणी केसांसाठी घातक ठरते. गरम पाण्यामुळे टाळूवरील नैसर्गिक तेल निघून जाते, त्यामुळे केस कोरडे, राठ आणि तुटक होतात. शक्यतो कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवावेत. केस भिजवण्यापूर्वी ते हलक्या हाताने सोडवून घ्यावेत. ओले केस अतिशय नाजूक असतात, त्यामुळे गुंतलेले केस जोरात ओढल्यास मुळे कमकुवत होतात.
शाम्पू वापरताना तो थेट केसांच्या टोकांवर न लावता आधी टाळूवर लावावा. नखे वापरून टाळू खरवडणे टाळावे, कारण त्यामुळे टाळूला जखमा होऊ शकतात आणि कोंडा, खाज वाढू शकते. बोटांच्या पोटऱ्यांनी हलक्या हाताने गोलाकार हालचाली करत टाळू स्वच्छ करणे योग्य ठरते. खूप जास्त प्रमाणात शाम्पू वापरणे किंवा रोज केस धुणे टाळावे, कारण यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो. केस धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करणे महत्त्वाचे असते, पण ते चुकीच्या पद्धतीने लावल्यास केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते. कंडिशनर कधीही टाळूवर लावू नये. तो फक्त केसांच्या मधल्या भागापासून टोकांपर्यंत लावावा आणि दोन-तीन मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवावा. आठवड्यातून एकदा केसांना तेल लावून हलका मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुळे मजबूत होतात.
अंघोळीनंतर केस जोरात झटकून पुसणे, पिळणे किंवा टॉवेल डोक्यावर घट्ट गुंडाळणे टाळावे. यामुळे केस तुटतात आणि टोकांवर स्प्लिट एन्ड्स तयार होतात. मऊ टॉवेल किंवा सुती कपड्याने हलक्या हाताने केसांतील पाणी शोषून घ्यावे. ओले केस असतानाच कंगवा करणे टाळावे. केस थोडे सुकल्यानंतरच रुंद दातांच्या कंगव्याने हळूवार विंचरावे. नहाताना किंवा नंतर लगेच ओले केस बांधणे, घट्ट वेणी घालणे किंवा रबर बँड वापरणे टाळावे. यामुळे केसांच्या मुळांवर ताण येतो आणि केस गळण्याचे प्रमाण वाढते. तसेच गरम हवेचे हेअर ड्रायर रोज वापरणेही केसांसाठी हानिकारक ठरते. काही सोप्या सवयींचा अवलंब करा आणि केसांची काळजी घ्या.
