Fruit Peel For Skin : सामान्यपणे कुणीही फळं खाल्लीत की त्यांची साल कचऱ्यात फेकतात. ही सवय जवळपास सगळ्याच लोकांना असते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वेगवेगळ्या फळांच्या सालीचा उपयोग वेगेवगळ्या गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. इतकंत नाही तर काही फळांच्या साली तर त्वचेसाठी वरदान ठरतात. कारण या सालींमध्ये त्वचेसाठी फायदेशीर अनेक पोषक तत्व असतात. अशाच तीन सालींबाबत आपण पाहणार आहोत. तसेच त्यांचा वापर कसा करावा हेही समजून घेणार आहोत.
केळीची साल
केळीच्या सालीमध्ये अॅंटी-ऑक्सीडेंट, व्हिटामिन आणि पोटॅशिअमसारखे तत्व भरपूर असतात. हे तत्व त्वचेला पोषण देतात आणि त्वचा तरूण ठेवण्यास मदत करतात. यासाठी केळीची साल थेट चेहऱ्यावर घासायची आहे. ५ मिनिटं मसाज केल्यावर चेहरा पाण्यानं धुवायचा आहे. हवं तर केळीच्या सालीवरील पांढरा भाग काढूनही त्वचेवर घासू शकता. नियमितपणे हा उपाय कराल तर त्वचा आतून साफ होईल, चेहरा चमकदार आणि मुलायम होईल.
पपईची साल
पपईच्या गरासोबतच सालीमध्येही पपेन हे तत्व असतं. अशात पपईची साल चेहऱ्यावर घासणं फायदेशीर ठरू शकतं. ही साल त्वचेसाठी नॅचरल एक्सफोलिएटरसारखी काम करते. तसेच टॅन रिमूव्हल आणि स्किन टायटनरसारखी सुद्धा काम करते. जर त्वचा सैल पडली असेल तर पपईची साल त्वचा टाइट करण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.
संत्र्याची साल
संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटामिन सी आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असतात. ही साल त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. हवं तर आपण संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पावडर करून फेसपॅकही बनवू शकता. या सालीचा आणखी मोठा फायदा म्हणजे त्वचेची सफाई आतपर्यंत होते.