कडीपत्ता हा पदार्थ आपण आमटी, वरण, भाजी, चटणी सगळ्याच्या फोडणीसाठी वापरतो. त्याचा सुगंध पदार्थाची चव वाढवते. कडीपत्ता आपल्या स्वयंपाकघरात फक्त फोडणीपुरताच मर्यादित राहतो, पण प्रत्यक्षात तो आरोग्य आणि सौंदर्यासाठी एक अमूल्य औषधी वनस्पती आहे. (The aroma of curry leaves is good but leaves are good for health as well, tonic for skin and hair - see its uses)आयुर्वेदात कडीपत्याला विशेष महत्त्व दिले आहे. केस, त्वचा, पचन आणि एकूणच शरीरासाठी कडीपत्ता अनेक प्रकारे उपयोगी ठरतो, फक्त त्याचा योग्य वापर कसा करायचा हे माहित असणे गरजेचे आहे.
कडीपत्यामध्ये भरपूर पोषणद्रव्ये असतात. त्यात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात. तसेच व्हिटॅमिन ए, बी, सी आणि इ, अँटी ऑक्सिडंट्स आणि फायबरही मुबलक प्रमाणात असते. या पोषणामुळे कडीपत्ता रक्तवर्धक, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आणि शरीरातील विषारी घटक कमी करणारा मानला जातो. त्याची चटणी आहारात असेल तर आहाराचे पोषण वाढवते. त्यामुळे कडीपत्ता विविध माध्यामांनी आहारात असावा.
केसांसाठी कडीपत्ता अतिशय गुणकारी आहे. कडीपत्त्यापासून केसांसाठी तेल घरीच तयार करता येते. ताजा कडीपत्ता धुऊन वाळवून घ्यावा. कढईत खोबरेल तेल किंवा तीळ तेल गरम करुन त्यात कडीपत्ता टाकावा. तो कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर उकळवा. तेल थंड झाल्यावर गाळून बाटलीत साठवावे. हे तेल नियमितपणे केसांच्या मुळांना लावल्यास केसगळती कमी होते, कोंडा कमी होतो आणि केसांना नैसर्गिक चमक येते. अकाली पांढरे होणारे केस रोखण्यासही कडीपत्ता मदत करतो. त्वचेसाठीही कडीपत्ता उपयोगी ठरतो. कडीपत्त्याची पेस्ट करुन ती पिंपल्स, पुरळ किंवा त्वचेवरील डागांवर लावल्यास जंतुसंसर्ग कमी होतो. कडीपत्त्यातील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म त्वचा स्वच्छ ठेवतात. कडीपत्त्याचे पाणी तयार करुन ते थंड झाल्यावर चेहरा धुतल्यास त्वचेचा तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा ताजीतवानी दिसते.
कडीपत्ता केवळ बाहेरुनच नव्हे तर आहारातूनही उपयोगी ठरतो. रोज सकाळी ५–६ ताजे कडीपत्त्याची पाने चघळून खाल्ल्यास पचन सुधारते, अॅसिडिटी कमी होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. कडीपत्त्याची चटणी, पावडर किंवा भाजीमध्ये वापर केल्यास त्याचे औषधी गुणधर्म शरीराला मिळतात. एकूणच, कडीपत्ता हा स्वयंपाकघरातील साधा घटक नसून आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना आहे. फक्त फोडणीपुरता वापर न करता त्याचा तेल करण्यासाठी त्वचेसाठी आणि आहारात योग्य प्रकारे वापर केल्यास शरीराला नैसर्गिक आणि सुरक्षित पोषण मिळू शकते.
