तेलकट त्वचा आणि स्काल्प असलेल्या व्यक्तींनी केसांना तेल लावावे का? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. खरं तर, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात तेल लावल्यास, ते केसांच्या आणि स्काल्पच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (Sticky hair and oily skin, 5 things you should never do, skin care and hair care tips )वर्षानुवर्षे महिला केसांना तेल लावत आल्या आहेत. घरगुती तेल वापरले जायचे आजकाल अनेक प्रकारची तेल मिळतात. काय चांगले काय वाईट ओळखा आणि मगच तेल वापरा. तेल लावताना मात्र काळजी घ्यायला हवी कारण चुकीच्या पद्धतीने किंवा अति प्रमाणात तेल लावल्यास, त्वचेच्या आणि केसांच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.
तेलकट त्वचा आणि स्काल्प असलेल्या लोकांनी हलकं आणि नॉन-कॉमेडोजेनिक तेल वापरणं योग्य ठरेल. जड तेलं किंवा सिलिकॉनयुक्त प्रॉडक्ट्स वापरणे टाळा. कारण ती स्काल्पवर जास्त तेलकटपणा निर्माण करू शकतात. केसांना तेल लावताना, तेल थेट स्काल्पवर लावण्याऐवजी, केसांच्या टोकांवर लावणे जास्त योग्य ठरेल. तेल लावल्यानंतर २-३ तासांनी सौम्य शॅम्पूने केस धुणं आवश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी तेल लावून झोपल्यास, तेल चेहऱ्यावर लागून मुरुमांची समस्या वाढू शकते. मुळातच त्वचा तेलकट असल्याने रात्रभर तेल लावून ठेवणे त्वचेसाठी चांगले नाही.
तेलकट त्वचा आणि स्काल्पच्या समस्यांवर उपाय म्हणून, सौम्य आणि सल्फेट-मुक्त शॅम्पूचा वापर करावा. नैसर्गिक पदार्थ वापरावेत. रिठा, कोरफड, जास्वंद अशा गोष्टींचा वापर करा. चहा झाडाच्या तेलासारख्या नैसर्गिक घटकांनी युक्त शॅम्पू स्काल्पमधील ओला कोंडा जास्त वाढू देत नाही. त्याची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. केस धुतल्यानंतर, कंडिशनर फक्त केसांच्या टोकांवर लावावा, स्काल्पवर नाही. यामुळे स्काल्पवर अतिरिक्त तेलकटपणा टाळता येतो.
त्वचा तेलकट असेल तर कोणते प्रॉडक्ट्स वापरत आहात त्याची पूर्ण माहिती घ्या. दैनंदिन वापरासाठी सौम्य फेसवॉशने दिवसातून दोनदा चेहरा धुणं, ऑइल-फ्री आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझरचा वापर करणं फायद्याचं ठेरल. तेलकट त्वचा असल्यावर सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषण्यासाठी ब्लॉटिंग पेपर्सचा वापर करता येतो. तसेच, चेहर्याला सतत हात लावण्याची सवय असेल तर तसे करु नका. कारण त्यामुळे त्वचेवर तेल आणि घाण जमा होऊ शकते.
तेलकट त्वचा आणि स्काल्पच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, योग्य प्रॉडक्ट्स वापरणे गरजेचे आहे. नियमित स्वच्छता राखा. आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणं आवश्यक आहे. योग्य सवयी आणि काळजी घेतल्यास, या समस्यांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकते.