अंगावर अचानक पुरळ उठणे ही अनेकांना कधी ना कधी जाणवणारी समस्या आहे. कधी त्वचेवर लालसर ठिपके दिसतात, कधी बारीक दाण्यांसारखे पुरळ उठतात. कधी खाज येते आणि त्वचा सुजते. (Small pus-filled bumps in summer? Summer Heat Rash: Causes and Prevention)काही वेळा हे पुरळ काही तासांत कमी होते तर काही वेळा दिवसेंदिवस टिकून राहते. त्यामुळे या त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्यामागची कारणे समजून घेणे आणि योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
अंगावर पुरळ उठण्यामागे सर्वात सामान्य कारण म्हणजे त्वचेची अॅलर्जी. नवीन साबण, क्रीम, डिटर्जंट, परफ्यूम किंवा एखाद्या विशिष्ट कापडामुळे त्वचेवर पुरळ येऊ शकते. काही जणांना विशिष्ट अन्नपदार्थ, औषधे किंवा धूळ-परागकणांमुळेही पुरळ उठतात. अशा प्रकारच्या अवस्थेला वैद्यकीय भाषेत Urticaria असे म्हटले जाते. यात त्वचेवर लालसर डाग, खाज आणि सुज असे सगळेच होते. उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे किंवा त्वचेचे पोर्स बंद झाल्यामुळे येणाऱ्या घामोळ्यांना Prickly Heat असे म्हणतात. याशिवाय शरीरातील उष्णता वाढणे, पचनाचा त्रास, हार्मोन्समधील बदल किंवा अस्वच्छता यामुळेही पुरळ उठू शकते.
घरच्या घरी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करून हा त्रास कमी करता येतो. मुलतानी माती हा त्यापैकी एक प्रभावी उपाय आहे. मुलतानी माती थंड गुणधर्माची असल्यामुळे त्वचेवरील जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते. ती गुलाबपाण्यात किंवा साध्या पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून पुरळ असलेल्या भागावर लावावी आणि कोरडी झाल्यावर हलक्या हाताने धुवून टाकावी. चंदन देखील त्वचेसाठी अतिशय लाभदायक आहे. चंदनाची पेस्ट लावल्यास त्वचेचा दाह शांत होतो आणि खाज कमी होते. कोरफडीचे ताजे जेल त्वचेला नैसर्गिक थंडावा देते. पुरळावर हलक्या हाताने कोरफड लावल्यास त्वचा शांत होते आणि सूज कमी होते. हळद ही नैसर्गिक जंतुनाशक असल्यामुळे तिचा लेप लावल्यास संसर्गाची शक्यता कमी होते. कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेवरील जंतू कमी होण्यास मदत होते. खाज खूप असल्यास थंड पाण्याने शेक देणेही फायदेशीर ठरते.
यासोबतच काही सवयी बदलणेही महत्त्वाचे आहे. घट्ट आणि कृत्रिम कापडाचे कपडे वापरणे टाळावे, त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी, भरपूर पाणी प्यावे आणि अतितिखट किंवा तेलकट पदार्थ कमी प्रमाणात घ्यावेत. नवीन सौंदर्यप्रसाधने वापरण्यापूर्वी त्वचेवर छोट्या भागावर चाचणी करुन पाहणे योग्य ठरते. तरीही जर पुरळ वारंवार येत असेल, खूप सूज येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तापासारखी लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
