स्ट्रेच मार्क्स म्हणजे त्वचेवर येणारे लांबट, जांभळट- पांढर्या रंगाचे डाग किंवा चट्टे. जे त्वचेची लवचिकता कमी झाल्यामुळे तयार होतात. (Skincare tips, 3 remedies to reduce stretch marks on thighs, buttocks and stomach, skin is stretched due to 'these' reasons)हे खूप सामान्य असून महिलांमध्ये आणि पुरुषांमध्येही दिसून येतात. महिलांमध्ये गर्भधारणेवेळी अचानक वजन वाढल्यावर किंवा कमी झाल्यावर स्ट्रेच मार्क्स येतात. तसेच किशोरवयीन बदलांमध्ये स्ट्रेच मार्क्स होण्याची शक्यता जास्त असते. जाड-बारीक तसेच सावळ्या-गोऱ्या सगळ्यांना स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात.
स्ट्रेच मार्क्स होण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन नावाच्या प्रथिनांमधील समतोल कमी होतो. जेव्हा त्वचा जास्त ताणली जाते तेव्हा ही प्रथिने ताण सहन करू शकत नाहीत. त्यामुळे त्वचेवर चट्टे येतात. महिलांमध्ये पोट, छाती, मांड्या आणि दंड या भागांवर हे चट्टे जास्त दिसून येतात. लठ्ठपणा, हार्मोनल बदल, स्टेरॉईडचा अति वापर, कधीकधी आनुवंशिक कारणे आणि कोणत्याही कारणास्तव घेतले जाणारे सप्लिमेंट्स हे देखील स्ट्रेच मार्क्सचे कारण असू शकतात.
स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे नाहीसे होणे तसे कठीणच आहे. पण त्यांची तीव्रता कमी करता येऊ शकते. यासाठी नियमित त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. कोरफड लावणे फार फायद्याचे ठरते. कोरफड थंड असून त्वचेला आर्द्रता पुरवते आणि लवचिकता वाढवते. तसेच कोको बटर, शिया बटर आणि जीवनसत्त्व 'ई' असलेल्या लोशनचा वापर नियमित केल्याने त्वचेवरील डाग कमी होतात. चट्टे फिके होण्यास मदत होते. लेझर थेरपी, मायक्रो डर्मॅब्रेशन आणि केमिकल पील्स यांसारख्या त्वचारोग तज्ज्ञांकडून केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीने स्ट्रेच मार्क्सचे परिणाम कमी करता येतात. त्यासाठी विविध ट्रिटमेंट्स असतात. त्याची माहिती ओळखीतल्या त्वचा तज्ज्ञांकडून मिळता येईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण आणि संतुलित आहार घेणे. झिंक, प्रोटीन, आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त आहार त्वचेच्या आरोग्यास पोषक ठरतो. व्यायामामुळे त्वचेवरील चट्टे कमी होतात. त्वचेला मॉइश्चराइज करणे खूप गरजेचे आहे. काही साध्या सोप्या गोष्टी नियमित केल्याने हे चट्टे कमी होतात.
बरेच उपाय केल्यानंतरही अनेक महिलांचे स्ट्रेच मार्क्स कमी होत नाहीत. अशावेळी ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि शारीरिक त्रास होत नसेल तर त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.