हिवाळ्यात हवेतला ओलावा कमी होतो, थंड वारे आणि कोरडी हवा यांचा थेट परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो, त्वचा कोरडी, खरखरीत आणि नाजूक होते. अनेकांना ओठ फुटणे, हात-पायांना भेगा पडणे, खाज येणे किंवा त्वचा ताणणे असे त्रास जाणवतात. (Skin will look soft and beautiful even in winter. 5 simple habits will keep your skin youthful.)या काळात त्वचेला केवळ बाह्य काळजीच नाही तर योग्य पोषणाचीही गरज असते. पुरेसे फॅट्स, जीवनसत्त्वे, अँटी ऑक्सिडंट्स आणि पाणी मिळाले तरच त्वचा आतून निरोगी राहते. हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या उपयुक्त विंटर टिप्स नक्की मदत करतात.
१. त्वचेला खोलवर ओलावा देणे. थंडीत साबण किंवा फेसवॉश जास्त कोरडेपणा वाढवतात, त्यामुळे सौम्य आणि मॉइश्चरायझिंग क्लेन्झर वापरणे फायदेशीर ठरते. आंघोळीनंतर त्वचा किंचित ओलसर असतानाच मॉइश्चरायझर, बॉडी लोशन किंवा खोबरेल तेल लावल्यास ओलावा त्वचेत मुरतो आणि कोरडेपणा कमी होतो.
२. दुसरी टिप म्हणजे त्वचेला योग्य पोषण देणारा आहार घेणे. हिवाळ्यात त्वचेला ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, व्हिटॅमिन ए, सी आणि ई यांची जास्त गरज असते. बदाम, अक्रोड, तीळ, जवस, गाजर, हिरव्या पालेभाज्या आणि आवळा यांचा आहारात समावेश केल्यास त्वचा आतून चांगली राहते आणि कोरडेपणा कमी होतो.
३. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी आणि उबदार द्रव पदार्थ. थंडीत तहान कमी लागते, पण शरीराची पाण्याची गरज कमी होत नाही. पुरेसे पाणी, कोमट पाणी, सूप, हर्बल चहा घेतल्यास त्वचा आतून हायड्रेट राहते आणि कोरडेपणा उद्भवत नाही. यामुळे ओठ फुटणे आणि त्वचेची खाजही कमी होते.
४. चौथी टिप म्हणजे त्वचेला अतिथंडीपासून संरक्षण देणे. थंड वारे आणि थेट थंडीचा संपर्क त्वचेला अधिक नाजूक करतो. बाहेर जाताना स्कार्फ, हातमोजे आणि पूर्ण बाहीचे कपडे वापरल्यास त्वचा सुरक्षित राहते. चेहऱ्यावर हलके मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावून बाहेर पडल्यास थंडीचा परिणाम कमी होतो.
५. जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. खूप गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते आणि कोरडेपणा वाढवते. कोमट पाण्याने अंघोळ करणे आणि अंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावणे ही सवय ठेवल्यास हिवाळ्यातही त्वचा मऊ, निरोगी आणि तेजस्वी राहते.
थोडी काळजी, योग्य पोषण आणि रोजच्या सवयींमध्ये छोटे बदल केल्यास थंडीतही त्वचा सुंदर आणि निरोगी राहते. घरीच करा सोपे उपाय.
