प्रत्येकाला डागविरहीत, स्वच्छ, सुंदर चेहरा हवा असतो. त्यासाठी आपण दैनंदिन जीवनात त्वचेची काळजी कशी घेतो हे फार महत्वाचं असतं. खासकरून चेहरा स्वच्छ ठेवणं खूप आव्हानात्मक असतं. कारण धूळ, माती, प्रदूषणामुळे चेहऱ्यावर काळपटपणा येतो तर कधी पिंपल्स येतात. चेहरा स्वच्छ करण्याचे अनेक मार्ग आहे. या पद्धतीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार काय (Skin Type) आहे हे माहीत असायला हवं. जर त्वचेच्या प्रकारानुसार चेहरा स्वच्छ केला गेला तर तो स्वच्छ होण्याबरोबरच चमकदार दिसतो.
यासंदर्भात सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसेन म्हणतात, ''बाजारात फेस वॉशसाठी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु ही सर्व उत्पादने सर्व प्रकारच्या त्वचेवर वापरता येत नाहीत. कोणालाही त्यांची त्वचा कशी आहे, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. जेणेकरून ते त्याच्या त्वचेवर योग्य उत्पादने वापरू शकतात आणि त्वचा स्वच्छ करू शकतात.'' सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसेन यांनी तेलकट, कोरडी आणि संमिश्र त्वचा चांगली ठेवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
1) सामान्य, कोरडी त्वचा 'अशी' स्वच्छ करावी
जर तुमची त्वचा सामान्य किंवा खूप कोरडी असेल तर तुम्ही जेल किंवा क्रिम बेस्ड स्वच्छता उत्पादने वापरावीत. शहनाज हुसेन म्हणतात की, "सामान्य त्वचा असलेल्यांसाठी जेल-बेस्ड उत्पादने आणि कोरडी त्वचा असलेल्यांसाठी क्रीम- बेस्ड उत्पादने वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करत क्लींजर लावा आणि कापसाच्या बोळ्याने स्वच्छ करा.' सामान्य किंवा कोरड्या त्वचेचे लोक चेहऱ्यावर कोरफड जेल असलेली उत्पादने वापरू शकतात, यामुळे त्वचा मऊ आणि मॉइस्चराइज राहते.''
होममेड फेस क्लिंजर तयार करण्याची पद्धत
साहित्य
१ चमचा थंड दूध
२ थेंब ऑलिव ऑयल
कृती
वरील दोन्ही साहित्य एका वाडग्यात मिसळा आणि कॉटन पॅडच्या मदतीने चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. जर तुम्ही हे घरगुती क्लिंजर रोज वापराल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.आपण रोज या मिश्रणानं चेहरा स्वच्छ करू शकता आणि 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता.
2) तेलकट त्वचा कशी स्वच्छ करायची?
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला त्वचेच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण धूळ आणि माती सहज तेलकट त्वचेला चिकटतात आणि त्याचे कण त्वचेच्या छिद्रांमध्ये स्थिरावतात. अशा परिस्थितीत, त्वचा योग्यरित्या स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे.
शहनाज हुसेन म्हणतात,''तेलकट त्वचा असलेल्यांनी दिवसातून सुमारे २-३ वेळा चेहरा स्वच्छ करावा, पण यासाठी प्रत्येक वेळी साबण वापरणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश वापरावा.'' शहनाज तेलकट त्वचा असलेल्यांसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून चंदन, तुळस आणि कडुलिंब असलेले फेस वॉश करण्याची शिफारस करतात. एवढेच नाही तर त्या म्हणतात, ''तेलकट त्वचा असलेल्यांनी आठवड्यातून दोनदा फेस स्क्रबचा वापर करावा. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये लपलेली घाण साफ होते आणि मुरुमे आणि ब्लॅकहेड्सची समस्याही दूर होते.''
3) तेलकट आणि कोरड्या त्वचेचं कॉम्बिनेशन असल्यास त्वचा कशी स्वच्छ ठेवावी?
जर तुमच्या त्वचेचा प्रकार संमिश्र असेल तर तुम्ही ग्लिसरीन असलेली उत्पादने वापरावीत. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन असलेले साबण वापरू शकता. एवढेच नाही तर तुम्ही क्लींजिंग मिल्कसह चेहरा स्वच्छ करू शकता. शहनाज हुसेन म्हणतात, ''संमिश्र त्वचा असलेल्या लोकांसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे की त्यांनी त्यांच्या त्वचेच्या अशा भागांची खोल स्वच्छता करणे आवश्यक आहे जे भाग तेलकट आहेत. यासाठी एक सौम्य स्क्रब देखील वापरला जाऊ शकतो. संमिश्र त्वचा असलेल्या लोकांची हनुवटी, टी-प्वाइंट, जबड्याची रेषा, टी- पॉईंटजवळ तेल जमा होतं. ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि पुळ्या येतात.'' अशा त्वचेसाठी शहनाज यांनी होममेड फेसपॅक सांगितला आहे.
साहित्य
1/4 लहान चमचा लिंबाचा रस
1 चमचा काकडीचा रस
1 चमला थंड दूध
कृती
या तिन्ही सामग्रींना एका वाटग्यात एकत्र करा. नंतर कापसाच्या मदतीनं हे मिश्रण त्वचेवर लावा आणि १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. रोज हा उपाय केल्यानं तुमचा चेहरा आधीपेक्षा जास्त स्वच्छ आणि चमकदार दिसेल.