त्वचेवरील नकोसे केस काढण्यासाठी अनेक जण स्वस्त किंवा साधा रेझर वापरून शेव्हिंग करतात. ही पद्धत पटकन, सोपी आणि वेदनारहित वाटत असली तरी चुकीच्या रेझरचा वापर किंवा योग्य काळजी न घेतल्यास त्वचेवर काही दुष्परिणाम दिसू शकतात. (Removing skin hair with a razor? Infections can cost a lot, see what happens to skin because of razor )स्वस्त किंवा कमी दर्जाच्या रेझरने शेव्ह केल्यावर सर्वात आधी त्वचेवर कट्स आणि जखमा होण्याची शक्यता जास्त असते. अशा रेझरची पाती फार धारदार असतात आणि स्वच्छ नसतात. त्यामुळे त्वचेवर सूक्ष्म जखमा होऊ शकतात. या जखमांमुळे जळजळ, लालसरपणा आणि वेदना जाणवू शकतात. विशेषतः संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांमध्ये हा त्रास अधिक दिसून येतो.
अनेक वेळा रेझरमुळे रेझर बर्न होतो. म्हणजे शेव्ह केल्यानंतर त्वचा लाल होणे, खाज येणे, लहान पुरळ किंवा चट्टे उठणे आदी त्रास होतात. याचे कारण म्हणजे रेझरची धार नीट नसणे किंवा एकाच जागेवर वारंवार रेझर फिरवणे. यामुळे त्वचेचा नैसर्गिक संरक्षणात्मक थर खराब होतो आणि त्वचा कोरडी व्हायला लागते.
स्वच्छता न राखल्यास किंवा जुना रेझर वापरल्यास इन्फेक्शनचा धोका देखील वाढतो. रेझरवर जंतू साचलेले असू शकतात. शेव्ह करताना सूक्ष्म जखमांमधून हे जंतू त्वचेत शिरु शकतात आणि फोड, पुळ्या किंवा सूज येऊ शकते. शेव्ह केल्यावर केस कसे येतात याबाबत अनेकांना असे वाटते की केस जाड, काळे आणि जास्त प्रमाणात येतात. प्रत्यक्षात मात्र हा एक गैरसमज आहे. शेव्ह करताना केस मुळापासून काढले जात नाहीत, तर फक्त त्वचेच्या पृष्ठभागावरुन कापले जातात. त्यामुळे जेव्हा केस पुन्हा वाढतात तेव्हा त्यांची टोकं बोथट असतात. ही बोथट टोकं त्वचेवर बाहेर येताना जाड आणि कठीण वाटतात.
शेव्ह केल्यानंतर केस साधारणपणे लवकर पुन्हा येतात. दोन दिवसांत वाढायला लागतात. कारण केस मुळापासून निघाले नसतात ते तिथेच असतात आणि वाढतच राहतात. वॅक्सिंग किंवा इतर उपायांप्रमाणे मुळापासून केस निघत नसल्यामुळे शेव्हचा परिणाम कमी दिवस टिकतो. त्यामुळे काही दिवसांतच केस पुन्हा दिसू लागतात. योग्य रेझर न वापरल्यास किंवा ड्राय शेव्हिंग केल्यास इनग्रोन हेअर म्हणजेच केस त्वचेच्या आत वाढण्याचा त्रासही होऊ शकतो. असे केस त्वचेखाली अडकतात, ज्यामुळे काळे डाग, सूज किंवा वेदनादायक पुळ्या येतात.
रेझर वापरणे टाळणे खरे तर योग्य आहे. तरी तुम्ही करतच असाल तर त्यासाठी चांगल्या दर्जाचा आणि महिलांसाठी खास मिळतो तसाच रेझर वापरा. कोणताही दहा - वीस रुपयांचा रेझर वापरु नका. त्वचेसाठी तो फार त्रासदायक ठरतो.
