आपल्यापैकी प्रत्येकीलाच आपली त्वचा उजळ, मऊमुलायम आणि चमकदार असावी असं वाटतं. यासाठीच, अशी सुंदर व देखणी त्वचा दिसण्यासाठी 'हायड्रा फेशियल'ची (HydraFacial) सध्या प्रचंड क्रेझ आहे. सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण इन्स्टंट ग्लोसाठी असं 'हायड्रा फेशियल' करणंच पसंत करतात. पण पार्लरमध्ये केले जाणारे हे फेशियल अनेकदा खूप महागडे असते, त्यामुळे प्रत्येकाला ते वारंवार करणे शक्य होत नाही. हे महागडं फेशियल पार्लरमध्ये करण्यासाठी एका सिटिंगसाठी हजारो रुपये मोजावे लागतात. मग काय करायचं? सौंदर्य जपण्यासाठी दरवेळी पार्लरमध्ये जाणं शक्य नसेल, तर काळजी करू नका...(parlor like hydra facial at home in easy steps).
पार्लरसारखंच हायड्रा फेशियल किचनमधील (hydra facial for glowing and clear skin) काही नैसर्गिक पदार्थांच्याच मदतीने अगदी घरच्याघरीच कमी खर्चात देखील होऊ शकत. योग्य पद्धतीने केल्यास हे फेशियल त्वचेची खोलवर स्वच्छता करून, डेड स्किन काढून टाकतं आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतं. ज्या 'हायड्रेशन' आणि 'ग्लो'साठी आपण पार्लरमध्ये पैसे खर्च करतो, तोच परिणाम आपण किचनमधील नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने घरच्याघरीच मिळवू शकता. खिशाला परवडेल अशा कमी खर्चात (how to do hydra facial at home) त्वचेला डीप क्लेन्सिंग, हायड्रेशन आणि ग्लो देण्यासाठी सोप्या ५ स्टेप्समध्ये 'हायड्रा फेशियल' नेमकं कसं करायचं ते पाहूयात.
५ सोप्या स्टेप्समध्ये घरच्याघरीच 'हायड्रा ग्लो' येण्यासाठी काय करावं ?
स्टेप १ :- बर्फाच्या खड्याने मसाज करा (Ice Massage - Pre-Cleanse) :- हायड्रा फेशियलची सुरुवात करण्यासाठी बर्फाचा खडा अत्यंत फायदेशीर ठरतो. एका सुती पातळ कापडात बर्फाचा खडा गुंडाळून त्याने चेहऱ्यावर २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते, सूज कमी होते आणि उघड्या छिद्रांना घट्ट करण्यास मदत होते.
स्टेप २ :- क्लिंजिंग (Cleansing) :- त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यासाठी कच्चे दूध हा सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय आहे. कापसाचा बोळा कच्च्या दुधात भिजवून त्याने संपूर्ण चेहरा आणि मान स्वच्छ पुसून घ्या. दूध त्वचेतील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकते, ज्यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि मऊ होतो.
स्टेप ३ :- एक्सफोलिएशन (Exfoliation) :- हायड्रा फेशियलचा मुख्य भाग म्हणजे 'डेड स्किन' काढणे. यासाठी प्रत्येकी १ टेबलस्पून साखर, मध, कॉफी पावडर एकत्र करून मिश्रण तयार करा. हे तयार मिश्रण या अर्ध्या कापलेल्या टोमॅटोवर लावून त्याने ५ मिनिटे वर्तुळाकार पद्धतीने त्वचेवर मसाज करा. साखर, कॉफी पावडर नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते, तर मध त्वचेला हायड्रेट करते. यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स निघून जाण्यास मदत होते. एक्सफोलिएशन झाल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
स्टेप ४ :- हायड्रेटिंग फेसपॅक (Hydrating Face Pack) :- त्वचेला 'हायड्रा ग्लो' देण्यासाठी ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी प्रत्येकी १ टेबलस्पून दही, तांदुळाचे पीठ, कॉफी पावडर, मध यांचा एकत्रित फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावून हलकेच दाब देऊन मसाज करावा. मध त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो,ज्यामुळे चेहरा चमकदार दिसतो.
स्टेप ५ :- मॉइश्चरायझिंग (Moisturizing) :- त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फेशियलच्या सर्व स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर त्वचेला मॉइश्चराईझ करणे अत्यंत आवश्यक आहे. हायड्रा फेशियलमध्ये आपण त्वचेची छिद्रे खोलवर स्वच्छ करतो, अशा वेळी ती उघडी राहू नयेत आणि त्वचेचा मऊपणा टिकून राहावा यासाठी मॉइश्चरायझर हातावर घेऊन चेहऱ्यावर आणि मानेवर टॅपिंग करत लावा. जोपर्यंत ते त्वचेत पूर्णपणे शोषले जात नाही, तोपर्यंत हलक्या हाताने मसाज करा. मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही एलोवेरा जेल किंवा गुलाबपाण्याचा देखील वापर करु शकता.
