केस सुटे ठेवल्यावर फार सुंदर दिसतात यात काही वादच नाही. साडीवर मोकळे केस तसेच कोणत्याही ड्रेसवर सुटे केस अगदी मस्त दिसतात. मात्र सतत केस सुटे ठेवल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. (open hair might look good but styling can harm your hair, braids are best for hair see how to tie properly )विशेषत: गाडीवरुन फिरताना वाऱ्यामुळे केसांवर धूळ, प्रदूषण, घाम आणि उन्हाचा परिणाम जास्त होतो. त्यात जर ते सुटे असतील तर गुंता होतोच तसेच केस विरळही होतात. सतत मोकळे ठेवल्यामुळे केस कोरडे आणि कमकुवत होतात. टाळूवर तेलकटपणा, घाण जमा होते आणि केस गळती वाढते. सुटे केस वारंवार हाताळल्याने किंवा विंचरल्यानंतर त्यांच्या मुळांवर ताण येतो आणि ते अधिक नाजूक होतात.
शाळेत असताना वेणी बांधणे बंधनकारक असायचे. शाळेत त्या नियमाचा जरी राग येत असला तरी आता तो नियम कसा बरोबर आहे हे समजते. आई सारखी वेणी बांधायला का सांगायची हे गळत्या केसांकडे पाहिल्यावर जाणवते. केस वेणी घालून किंवा सैल बांधून ठेवले तर त्यांचे रक्षण अधिक चांगल्या पद्धतीने होते. वेणी बांधल्याने केसांची गाठ पडत नाही, तुटणे कमी होते आणि बाहेरील प्रदूषणाचा त्रास कमी होतो. केस जास्त ओढले जात नाहीत आणि त्यांच्या मुळांवर अनावश्यक ताण येत नाही. मात्र केस बांधताना खूप घट्ट वेणी बांधणे टाळावे, कारण त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि केसांची वाढ मंदावू शकते. रबरबँडच्या ऐवजी मऊ कापडी रबर किंवा स्रंची वापरा. केस ओले असताना त्यांना बांधू नये, कारण ओले केस जास्तच नाजूक असतात आणि त्यामुळे तुटण्याची शक्यता जास्त असते. केस वाळले की लगेच विंचरुन वेणी बांधा.
गाडीवरून प्रवास करताना डोक्यावर स्कार्फ, ओढणी किंवा टोपी घालणे फायदेशीर ठरते. यामुळे प्रकाश, धूळ आणि प्रदूषणापासून संरक्षण मिळते. केस नियमित धुणे, तेल लावणे आणि त्यांना नैसर्गिकरित्या सुकू देणेही तितकेच गरजेचे आहे. योग्य पद्धतीने बांधलेले केस मजबूत राहतात. वेणी बांधल्यामुळे गळणे कमी होते आणि त्यांची नैसर्गिक चमक टिकते. त्यामुळे मोकळे केस व्यक्तिमत्व वाढवतात हे खरे असले तरी त्यांचे आरोग्य जपायचे असेल तर वेळोवेळी वेणी बांधणे, सैल क्लिप्स वापरणे आवश्यक आहे. या सवयी अंगीकारल्यास केस मजबूत, सुंदर आणि दाट राहतात.