नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घ्यायची असेल तर घरगुती उपाय करणंच सोयीचं आहे. त्यात काही रसायन नसतं आणि इतरही काही हानिकारक गोष्टी नसतात. असे अनेक उपाय आहेत त्यापैकीच एक म्हणजे बेसन. आहारात बेसन आवडीने घेतले जाते. भजी, वडा, पापडी आदी पदार्थ आवडीने केले जातात. मात्र हेच बेसन त्वचेसाठीही फार फायद्याचे असते. (Natural skincare remedy, homemade face pack, glowing skin tips, use besan for skin )बेसनाचा लेप हा अत्यंत सोपा आणि परिणामकारक उपाय मानला जातो. पूर्वीपासून लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगी त्वचा उजळण्यासाठी बेसनाचा वापर केला जातो. बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते, मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला स्वच्छ व तजेलदार करते.
बेसनाचा लेप लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार बेसनात वेगवेगळे घटक मिसळून पेस्ट तयार करावी. कोरडी त्वचा असल्यास बेसनात दूध, साय किंवा थोडे मध घातल्यास त्वचेला ओलावा मिळतो. तेलकट त्वचेसाठी गुलाबपाणी आणि चिमूटभर हळद उत्तम ठरते. उन्हामुळे झालेले टॅनिंग कमी करण्यासाठी असेल तर दही आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळता येतो. पिंपल्सचा त्रास असल्यास नीम पावडर किंवा चंदन घालून लेप तयार करता येतो.
तयार केलेला लेप चेहऱ्यावर आणि मानेवर समान प्रमाणात लावा. डोळ्यांभोवतीच्या नाजूक भागाला लावताना काळजी घ्या. साधारण दहा ते पंधरा मिनिटे लेप वाळू द्यावा आणि नंतर कोमट किंवा साध्या पाण्याने हलक्या हाताने चोळत धुवून काढावा. खूप जोरात घासू नये, कारण त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. हा लेप आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावणे पुरेसे असते. नियमित वापरामुळे त्वचेवरील तेलकटपणा कमी होतो, रोमछिद्रे स्वच्छ राहतात आणि चेहरा उजळ दिसतो. मृत त्वचा निघाल्यामुळे त्वचा मऊ आणि सुंदर होते. तसेच हलकी टॅनिंग आणि किरकोळ डाग कमी होण्यास मदत मिळू शकते.
मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे लेप लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. त्वचेला खाज जाणवल्यास वापर थांबवावा. योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात वापरल्यास बेसनाचा लेप हा त्वचेसाठी सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकतो. बेसन फक्त खायला नाही त्याचा या पद्धतीनेही उपयोग करता येतो. त्वचेसाठी बेसन फार लाभदायक ठरते.
