हिवाळ्याचा गुलाबी गारवा मनाला सुखावणारा असला, तरी तो आपल्या त्वचेसाठी मात्र आव्हानात्मक ठरतो. थंडीचे दिवस सुरू झाले की त्वचेच्या समस्या वाढू लागतात. थंड हवा, कोरडे वातावरण आणि गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा निघून जातो. याचा परिणाम म्हणून त्वचा कोरडी, खरखरीत होते आणि काहीवेळा तर त्वचा सोलवटून निघाल्यासारखी दिसते. विशेषतः हात, पाय, कोपर, गुडघे आणि चेहऱ्यावर कोरडेपणा जास्त जाणवतो. थंडीच्या दिवसांत कोरड्या आणि सोलवटलेल्या त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी आपण वेगवेगळे महागडे, फॅन्सी उपायही करुन पाहतो. महागडे लोशन्स आणि क्रीम्स लावल्यानंतरही काही वेळातच त्वचा पुन्हा कोरडी दिसू लागते. अशा परिस्थितीत, आयुर्वेदात सांगितलेला आणि निसर्गाशी जोडलेला सर्वात असरदार उपाय म्हणजे 'नैसर्गिक तेलांचा वापर'(mustard oil massage before bathing).
तेल केवळ त्वचेचा कोरडेपणा घालवत नाहीत, तर ती त्वचेच्या आतपर्यंत जाऊन पोषण देतात आणि एक संरक्षक कवच तयार करतात. यामुळे आपली त्वचा आतून खोलवर मॉइश्चराईझ होते. काही विशिष्ट प्रकारची तेल त्वचेला मऊ, मुलायम आणि चमकदार करण्याचे काम करतात. थंडीच्या दिवसांत योग्य वेळी योग्य तेल त्वचेला लावल्यास खोलवर पोषण देऊन ओलावा टिकवून ठेवते आणि थंडीमुळे होणारा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. पण, त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी नेमकं (how mustard oil massage helps reduce dry skin) कोणते तेल वापरावे आणि ते लावण्याची योग्य पद्धत काय ते पाहूयात...
मोहरीच्या तेलाने करा मसाज...
थंडीच्या दिवसांत त्वचा खूप कोरडी पडते. अशावेळी मोहरीचं तेल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. मोहरीच्या तेलामध्ये व्हिटॅमिन E, ओमेगा फॅटी अॅसिड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि ड्राय स्किनची समस्या कमी होते. मोहरीचं तेल नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखं काम करतं. नियमित मसाज केल्याने त्वचा मऊ, मुलायम होते, त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि सुरकुत्या किंवा फाइन लाईन्स लवकर येण्याचा धोका कमी होतो.
तुम्ही ५ गोष्टी करत नसाल तर कडक डाएट आणि भरमसाठ व्यायाम करुनही नाही होणार वेटलॉस!
आंघोळीपूर्वी मोहरीचं तेल कसं लावावं?
दररोज आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीरावर मोहोरीच्या तेलाने मसाज केल्यास त्वचेला उत्तम फायदे मिळतात. तेल लावताना हातांनी हलक्या दाबाने मसाज करा, त्यामुळे तेल त्वचेत चांगलं मुरतं. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेला उबही मिळते. तेल लावल्यानंतर साधारण १० ते १५ मिनिटं थांबा आणि नंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा अधिक निरोगी व चमकदार दिसू लागते.
थंडीच्या दिवसांत त्वचेसाठी मोहोरीचे तेल वापरण्याचे फायदे...
१. मोहरीचे तेल खूप घट्ट आणि ऊबदार असते. ते त्वचेवर एक संरक्षक थर तयार करते, ज्यामुळे हवेतील कोरडेपणामुळे त्वचा सोलवटत नाही आणि आर्द्रता टिकून राहते.
२. या तेलाचा गुणधर्म उष्ण असल्याने, हिवाळ्यात याने मसाज केल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
३. थंडीत त्वचेला भेगा पडल्यामुळे बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची भीती असते. मोहरीच्या तेलातील अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेचे रॅशेस आणि इन्फेक्शनपासून संरक्षण करतात.
४. कोरडे पडलेले ओठ आणि फाटलेल्या टाचांसाठी मोहरीचे तेल रामबाण उपाय आहे. रात्री झोपताना बेंबीत आणि टाचांना मोहरीचे तेल लावल्याने संपूर्ण त्वचा मऊ होते.
५. थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी, खरखरीत आणि निस्तेज होते. अशावेळी मोहोरीचे तेल त्वचेसाठी वरदान ठरते. मोहोरीचे तेल त्वचेला खोलवर पोषण देते आणि नैसर्गिक मॉइश्चर लॉक करून ठेवते. त्वचेसाठी मोहोरीच्या तेलाचा दररोज वापर केल्यास त्वचा मऊ, मुलायम आणि उजळ दिसू लागते. थंडीमुळे होणारी त्वचेला येणारी खाज, लालसरपणा आणि त्वचा सोलवटणे यांसारख्या समस्या कमी होतात.
