मुल्तानी माती (Multani Mitti) ही भारतीय सौंदर्य प्रसाधनांमध्ये पिढ्यानुपिढ्या वापरली जाणारी एक नैसर्गिक देणगी आहे. चेहऱ्याच्या त्वचेसाठी मुल्तानी माती अत्यंत गुणकारी मानली जाते आणि या मातीच्या नियमित वापरानं त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. (How To Use Multani Mitti On Face)
मुल्तानी माती चेहऱ्यावर कशी लावावी?
मुल्तानी माती वापरण्याची पद्धत खूपच सोपी आहे. पण योग्य मिश्रणामुळे तिचे फायदे अधिक वाढतात. एका स्वच्छ वाटीत २ ते ३ चमचे मुल्तानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी मिसळा. जर त्वचा कोरडी असेल तर दूध किंवा दह्यामध्ये मिसळा. यामुळे त्वचा मऊ राहते. मिश्रण चांगले ढवळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर हळूवार लावा. डोळ्यांभोवतीची त्वचा तशीच सोडून द्या. साधारण १५ ते २० मिनिटं ही पेस्ट चेहऱ्यावर सुकू द्या. ती पूर्णपणे कडक झाल्यावर चेहरा थंड पाण्यानं धुवा. चेहरा घासण्याऐवजी हळूवारपणे मसाज करून ती पेस्ट काढून टाका.
मुल्तानी माती त्वचेसाठी एक नैसर्गिक उपचार आहे आणि ती वापरण्याचेही अनेक फायदे आहेत. मुल्तानी मातीमध्ये असलेले मॅग्नेशियम क्लोराईड तेलकट त्वचेतून अतिरिक्त तेल शोषून घेते. ज्यामुळे त्वचा तेलमुक्त राहते आणि मुरूमं तसंच पुटकुळ्या तयार होण्याची शक्यता कमी होते.
तेल कमी झाल्यामुळे त्वचेची जळजळही शांत होते तसंच ही माती त्वचेतील छिद्रांमध्ये साचलेली घाण आणि अशुद्धी बाहेर काढते ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होतात. मुल्तानी माती चेहऱ्यावर लावून सुकल्यावर ती ताणली जाते. ज्यामुळे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि त्वचा नितळ दिसते. नियमितपणे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मुल्तानी मातीचा वापर केल्यास तुमची त्वचा नक्कीच चमकदार होईल.
तेलकट त्वचा असलेल्यांसाठी मुल्तानी माती वरदान आहे कारण ती अतिरिक्त सिबम प्रभावीपणे शोषून घेते. कोरड्या त्वचेवर मुल्तानी माती जास्त ठेवल्यास ती कोरडी होऊ शकते. म्हणून मॉईश्चराईजिंग घटक मिसळणं आवश्यक आहे.
