Join us  

चेहऱ्यावर चमक हवी तर करा १ ध्यान प्रकार, मन तर प्रसन्न होईलच चेहऱ्यावरही येईल शांत प्रसन्न नूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2023 6:45 PM

know how to achieve Inner Peace and Outer Beauty of skin with Meditation by dr. Hansaji Yogendra : व्यायाम किंवा योगाने मनासोबतच वाढते शरीराचे सौंदर्य...

आपले मन ही मोठी अजब गोष्ट असते. कधीच ताळ्यावर न राहणारे हे मन सतत कुठे ना कुठे धावत असते. हजारो विचार, सततचा ताण, विविध भावनांचा कल्लोळ असं सगळं या इवल्याशा मनात सातत्याने सुरू असतं. मन शांत ठेवावं असं आपल्याला सगळे सांगतात खरे पण ते करणं वाटतं तितकं सोपं नाही. अगदी ५ मिनिटं जरी आपण डोळे मिटून शांत बसलो तरी आपल्या डोक्यात शेकड्यानी विचार येऊन जातात आणि या मनाला सतत ताळ्यावर आणावं लागतं. ध्यान ही आपलं मन शांत होण्यासाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे हे प्रत्यक्ष ध्यान केल्याशिवाय आपल्या कधीच लक्षात येऊ शकत नाही (know how to achieve Inner Peace and Outer Beauty of skin with Meditation by dr Hansaji Yogendra ). 

मनच नाही तर ध्यानामुळे आपल्या चेहऱ्यावरही एक वेगळ्या प्रकारचा ग्लो नकळत यायला मदत होते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण मनाने फ्रेश, ताण विरहीत असलो की ते चेहऱ्यावर झळकते त्याचप्रमाणे ध्यानाचा चेहरा ग्लोईंग दिसण्यासाठी नक्कीच फायदा होतो. यामुळे आपल्याला महागडे क्रीम किंवा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस करण्याची नक्कीच आवश्यकता राहणार नाही. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र ध्यान आणि त्वचा यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो याविषयी काय सांगतात पाहूया... 

१. आपण जेव्हा ताणात किंवा एखाद्या भितीमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरातून स्ट्रेस हॉर्मोनची निर्मिती होते,  त्याचे नाव कोर्टीसोल असे आहे. ज्या हॉर्मोनमुळे स्ट्रेसशी निगडीत बऱ्याच समस्या निर्माण होतात. चेहऱ्यावर पुरळ येणे, त्वचा तेलकट होणे, एक्सिमा किंवा सोरायसिससारखी लक्षणेही दिसायला लागतात. पण तुम्ही ताण कमी केलात तर नकळत त्वचा छान दिसण्यास मदत होते. 

२. आपण जेव्हा आनंदी आणि रिलॅक्स असतो तेव्हा आपल्या शरीरात एंडोर्फिन नावाचा हॉर्मोन तयार होतो. यामुळे अंगावरची सूज कमी होण्यास मदत होते आणि आपण नकळत चांगले दिसतो. यासाठी अगदी साधा श्वासोच्छवास करणे आवश्यक असते.  यामुळे मन शांत होते, ताण कमी होतो आणि या सगळ्यामुळे नकळत त्वचा चांगली दिसण्यास मदत होते. 

ध्यान म्हणजे नेमके काय करायचे? 

आपल्याला सोयीच्या असलेल्या सुखासनात बसायचे किंवा शवासनात आडवे पडायचे. सावकाश डोळे मिटून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा. ४ आकड्यांत खोल श्वास आत घ्यायचा आणि सावकाशपणे ४ आकड्यात श्वास सोडायचा. काही मिनीटे श्वास आणि आकड्यांवर लक्ष केंद्रित करायचे आणि काही मिनिटे हा सराव सुरू ठेवायचा. मन दुसरीकडे गेले तर त्याला आणून पुन्हा श्वासावर खिळवण्याचा प्रयत्न करायचा. असे सलग काही मिनीटे केले तर नकळत तुम्हाला मनाने शांत आणि रिलॅक्स वाटण्यास मदत होईल. तसेच यामुळे त्वचेचे चांगल्या रितीने पोषण होण्यासही याची चांगली मदत होईल. श्वास बाहेर सोडताना तुमच्यातील ताण बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. या श्वासोच्छवासाचा थोडा सराव केल्यास आणि त्यात नियमितता ठेवल्यास मन आणि त्वचा दोन्ही शुद्ध होण्यास मदत होईल. म्हणजेच यामुळे तुम्ही आतून-बाहेरुन फ्रेश फिल कराल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसाधनायोगासने प्रकार व फायदे