सोशल मीडियावरील 'ग्लास स्किन' आणि 'अँटी-एजिंग' ट्रेंड्समुळे सध्या टीनएजर्समध्ये त्वचेची काळजी घेण्याबाबत मोठी 'क्रेझ' पाहायला मिळत आहे. मात्र हे करत असताना ते नकळत काही चुका करतात ज्यामुळे त्यांच्या त्वचेला त्याचा फटका बसू शकतो. प्रौढांसाठी असलेल्या शक्तिशाली प्रोडक्टचा वापर केल्यामुळे आता टीनएजर्सच्या त्वचेला कायमस्वरूपी नुकसान पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अमेरिका आणि युरोपमधील डर्मेटोलॉजिस्टने या गंभीर समस्येबद्दल चिंता व्यक्त केली असून यामुळे अनेक मुलांना कायमस्वरूपी त्वचेचे आजार होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. अनेक टीनएजर्स सोशल मीडियावरील 'ब्यूटी इन्फ्लूएन्सर्स'चं अनुकरण करत त्यांच्या नाजूक त्वचेसाठी अनावश्यक असलेले 'ॲक्टिव्ह' घटक असलेले प्रॉडक्ट्स वापरत आहेत.
हाय-स्ट्रेंथ रेटिनॉल हे सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रौढांसाठी वापरलं जातं. ग्लायकोलिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी सीरमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या घटकांचा अतिवापर केल्याने त्वचेचा नैसर्गिक संरक्षक स्तर कमकुवत होत आहे. एका डर्मेटोलॉजिस्टच्या मते, "टीनएजर्सची त्वचा विकसित होत असते. या वयात हे असे घटक असलेले प्रोडक्ट वापरल्यास त्वचेचा थर फाटतो, ज्यामुळे जळजळ होते आणि सूज येते."
चुकीच्या आणि जास्त उत्पादनांच्या वापरामुळे लहान वयातच त्यांना तीव्र जळजळ, लालसरपणा, खाज येणे, एलर्जी आणि एक्झिमासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. इतकंच नाही, तर काही प्रकरणांमध्ये या चुकीच्या रूटीनमुळे त्वचेवर कायमस्वरूपी डाग, खड्डे पडण्याची शक्यता असून, यामुळे त्वचेमध्ये अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसू लागतात.
डर्मेटोलॉजिस्टने दिलेल्या माहितीनुसार, टीनएजर्सची त्वचा अधिक संवेदनशील असते आणि त्यांना 'अँटी-एजिंग' उत्पादनांची कोणतीही गरज नसते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत साधं आणि सोपं रूटीन पुरेसे आहे.
सौम्य क्लीन्झर - दिवसातून दोनदा चेहरा धुण्यासाठी सौम्य (Mild) क्लीन्झर वापरा.
हलकं मॉइश्चरायझर - त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी ऑइल-फ्री (Oil-free) आणि हलकं मॉइश्चरायझर वापरा.
ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन - हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करणं आवश्यक आहे.
तज्ज्ञांनी असं आवाहन केलं आहे की, जर पिंपल्सची समस्या जास्त असेल, तर पालकांनी मुलांना थेट 'ॲक्टिव्ह' प्रॉडक्ट्स देण्याऐवजी, योग्य वैद्यकीय उपचारांसाठी डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. कोणत्याही 'ॲक्टिव्ह' प्रॉडक्टचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.
